Friday, September 13, 2024

पडघ्यातील NIA च्या कारवाईमुळेच मोठे षडयंत्र उघड

Share

९ डिसेंबर २०२३ ला सकाळी सर्व न्यूज चॅनेलवर एक ब्रेकिंग न्यूज झळकली. भिवंडी तालुक्यातील पडघा येथील बोरीवली या गावासह महाराष्ट्रातील ४४ ठिकाणी NIA च्या धाडी, अशी ती बातमी होती. भारतात अनेक ठिकाणी NIA च्या धाडी पडतच असतात. परंतु बोरीवली येथे धाड पडल्यानंतर अनेक धक्कादायक बातम्या बाहेर आल्या. बोरीवली येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, स्मार्टफोन, डिजिटल डिवाइस, रोख रक्कम, कागदपत्र सापडली. सर्वात धक्कादायक म्हणजे ४० ड्रोन सापडले. मुंबईवर ४० ठिकाणी ड्रोनद्वारे आतंकवादी हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती. त्याची तयारी पूर्ण झाली होती. परंतु NIA नी वेळीच कारवाई करून ती योजना हाणून पाडली.

या बातम्यांमध्ये देण्यात आलेली अन्य माहितीही धक्कादायक होती. बोरीवलीला आयएसआयची भारतातील राजधानीच बनवण्याची तयारी सुरू झाली होती. पडघा बोरीवली गावाचे नाव बदलून त्यांनी अल शाम असे नाव ठेवले होते. ज्याचा अर्थ आहे “LIBERATED ZONE.” सीरिया, जॉर्डन, फिलिस्तीन, तुर्की, कतार हे देश मिळून खलिफाचे एक राज्य बनवायचे आणि हे गाव त्या खलिफाच्या अखत्यारीतील गाव असेल म्हणून अल शाम हे नाव.

पडघा बोरीवली हे नाव बातम्यांमध्ये पहिल्यांदा झळकलेले नाही. याच्या अगोदरही अनेक वेळेला हे गाव बातम्यांमध्ये झळकले आहे. २००३ सालची घटना आहे. राकेश मारियांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र एटीएसने पडघा – बोरीवली या गावी साकिब नाचनला अटक करण्यासाठी धाड टाकली असता गावातील महिलांनी एटीएसच्या पथकावर दगडफेक करून हल्ला केला. एवढेच नाही तर पोलिसांवर महिला थुंकल्या आणि साकीबला पळून जाण्यास मदत केली. त्यावेळेसही पडघा ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रांचा साठा सापडला होता. एके 47 या बंदुका आणि आरडीएक्स स्फोटके सापडली होती. साकीबद्वारा वाहुलीच्या डोंगरावर आतंकवाद्यांना एके 47 बंदुकीचे प्रशिक्षण देण्यात येत होते. तेथील जंगलात फायरिंग रेंज उभी करण्यात आली होती.

बोरीवली हे भिवंडी तालुक्यातील साधारण 1000 लोकसंख्या असलेले मुस्लिम बहुल गाव आहे. आणि ह्याच गावामध्ये साकीब नाचन या नावाचा कुविख्यात अतिरेक राहतो. साकीबचा सहभाग हा अनेक प्रकारच्या अतिरेकी कारवायांमध्ये अगोदरही राहिला आहे. ११ ऑक्टोबर १९९२ ला साकीबला कनिष्क प्लेन क्रॅशच्या गुन्ह्यामध्ये सीबीआयने अटक केली होती. गुजरातच्या टेरर अटॅक केस मध्ये १९९१ मधे अटक झाली. त्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु सुप्रिम कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा कमी करून १० वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यावेळी तो स्टुडन्ट ऑफ इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी या आतंकवादी संस्थेचा महाराष्ट्राचा प्रेसिडेंट होता. सीमी या संघटनेवर सरकारने बंदी घातल्या नंतर सुद्धा बोरीवली गावामध्ये सिमी संघटनेचा फलक अनेक वर्ष झळकत होता. पोलीस प्रशासन त्यावर कारवाई करण्यास धजावत नव्हते.

सहा डिसेंबर २००२ रोजी मुंबई सेन्ट्रल रेल्वे स्टेशन येथे, २७ जानेवारी २००३ रोजी विलेपार्ले येथे बॉम्बस्फोट, १३ मार्च रोजी मुलुंड स्थानकावर कर्जतला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट, ज्यात ११ जणांचा मृत्यू झाला आणि ८२ जण जखमी झाले, अशा वेगवेगळ्या वेळी झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये त्याचा सहभाग होता. परंतु या गुन्ह्यात नाचनवर फक्त अनधिकृत शस्त्रांचा साठा ठेवण्याचाच गुन्हा सिद्ध होऊ शकला आणि त्याला दहा वर्षाची शिक्षा झाली. शिक्षा भोगून तो 2017 साली मुक्त झाला.

सकिब हा अन्य अनेक गुन्ह्यांमध्येही आरोपी होता. त्याचे वडील हमीद नाचन ह्यांच्या विरोधात कोर्टात लढणारे वकील सुभाष शेरेकरची हत्या, बोरीवलीचे सरपंच तारिक गुजर यांची हत्या, गोरक्षणाच्या केसेस लढणारे भिवंडी निवासी वकील ललित जैन यांची हत्या अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात सकीब मुख्य आरोपी होता. तसेच दोन डिसेंबर २००२ च्या घाटकोपर रेल्वे स्थानकावरील बॉम्बस्फोटात तो आरोपी होता. परंतु या सर्व गुन्ह्यात तो पुराव्याच्या अभावी आणि साक्षीदारांच्या घूमजाओमुळे दोष मुक्त झाला. २००१ ते २००३ या कालखंडामध्ये तो अनेक गुन्ह्यामध्ये होता आणि अनेक गुन्ह्यांमध्ये त्याच्यावर दोषारोप करण्यात आले होते हे लक्षात येते. पहिली घटना घडल्यावरच तातडीने तपास करून त्याला वेळीच अटक झाली असती तर अनेक गुन्हे घडवण्यापासून परावृत्त करणे शक्य झाले असते. परंतु आपल्या कमकुवत तपास यंत्रणा आणि कमकुवत कायदे यांच्या आधारे तो अटके पासून आणि दोष सिद्ध होण्यापासून वाचत आला आहे असे लक्षात येते.

साकिब कोर्टामध्ये वकीलाची मदत न घेता स्वतःचे प्रतिनिधित्व बहुतेक वेळा स्वतःच करतो, साक्षीदारांची उलट तपासणी स्वतःच घेतो तुरुंगामध्ये असताना त्याने कायद्यांचा अभ्यास केला आहे. त्याने अनेक वेळेला हिंदू संघटनांना न्यायालयात लक्ष्य केले आहे. “आम्ही अल्पसंख्यांक आहोत आणि आमच्या स्वातंत्र्यावर आणि धर्मावर घाला घालण्यासाठी आम्हाला लक्ष्य केले जाते.आम्हाला हिंदू आतंकवादी लक्ष्य करत आहेत” असले रडगाणे कोर्टात कायम गात असतो. तो कोर्टामध्ये साळसुदपणाचा आव आणून विक्टिम कार्ड खेळत न्यायव्यवस्थेवरत दबाव आणण्याचा प्रयत्न करतो.

साकिबची आर्थिक शक्ती
साकिब आपल्या टोळीतील मुलांकरवी आपली दहशत वापरून आजूबाजूच्या गोडाऊनच्या मालकांकडून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी घेणे, दादागिरी करून जमिनी हडपणे, जंगलातील लाकडे तोडून त्याची तस्करी करणे, गाईंची तस्करी करून मोठ्या प्रमाणावर पैसा जमा करणे, पाच्छापूर, खंबाळा, शिरोळी येथील खदानीतून बेकायदेशीर उत्खनन करणे, अशा विविध माध्यमातून प्रचंड पैसा कमावतो असे स्थानिक रविवाशांचे म्हणणे आहे. मुंबई नाशिक हायवेवरील पडघा टोल नाक्यावरील उत्पन्नाचा काही भाग साकीबला जातो असेही काही रहिवाशांचे म्हणणे आहे.

साकिबचा मुलगा शमील नाचन आणि पुतण्या आखिफ नाचन हे त्याला ह्या देशविरोधी कारवायात मदत करत असतात. शमील नाचन ह्याला NIA कडून ११ ऑगस्ट २०२३ ला ISIS चे नेटवर्क आरोपाखाली अटक झाली आहे. मध्यंतरी काही अतिरेक्यांनी “सर तन से जुदा” अशा घोषणा देत काही जणांना धमक्या दिल्या होत्या. अशाच एका राजस्थानमधील कन्हैयालाल खून प्रकरणात आखिफला राजस्थान एटीएसने अटक केली होती परंतु त्याला ह्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. अखीफ जामीन घेऊन मुंबई एअरपोर्टवर आला तेव्हा त्याचे तिथे भव्य स्वागत करण्यात आले आणि ठाणे ते पडघा या रस्त्यावर त्याची मिरवणूक काढण्यात आली. मोठ्या प्रमाणावर तरुण त्याच्या या मिरवणुकीत सामील होते. यावरून स्थानिकांचा त्याला किती पाठिंबा आहे लक्षात येते.

संपूर्ण भारतामध्ये साकिब ने ISIS चे अनेक स्लीपर सेल बनवले होते. सुशिक्षित तरुणांना भारता विरोधात भडकवून त्यांना इसीस मध्ये सहभागी करणे अशी अनेक कृत्य तो करत होता. खालीफाचे राज्य आणण्याची भाषा करत उघडपणे भारताविरोधात युध्द पुकारले होते. अशा भारतविरोधी शक्तींचा बंदबोस्त करण्यासाठी झिरो tolarance चे धोरण, कडक कायदे, उत्कृष्ट आणि जलद गतीने करणारी तपास यंत्रणा यांची आवश्यकता आहे. NIA ने साकिबला वेळीच अटक करून एक मोठे षडयंत्र उघड केले आहे. भारत सरकारने पारित केलेल्या नवीन भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणी नंतर साकिब सारखे आतंकवादी हे न्यायसंगत “आतंकवादी” या व्याखेत बसतील आणि त्यांना योग्य कडक शासन होईल हे नक्की.

राजेश कुंटे
(लेखक भिवंडी येथील उद्योजक असून रा. स्व. संघाच्या कोकण प्रांताचे धर्मजागरण प्रमुख म्हणून काम पाहतात.)

अन्य लेख

संबंधित लेख