पुण्यातील आयटीआय क्लस्टरसाठी २४१ कोटी रुपये आणि छत्रपती संभाजीनगर आयटीआय क्लस्टरसाठी सुमारे २३८ कोटी रुपयांची गुंतवणूक
‘पीएम-सेतू’ (PM-SETU) च्या राष्ट्रीय सुकाणू समितीची (NSC) सहावी बैठक काल पार पडली. या बैठकीत महाराष्ट्र, ओडिशा आणि जम्मू-काश्मीरमधील पाच ‘औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ (ITI) क्लस्टर्ससाठी सुमारे १,१९४ कोटी रुपयांच्या गुंतवणूक योजनांना मंजुरी देण्यात आली. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने (MSDE) दिलेल्या माहितीनुसार, या नवीन मंजुरीनंतर ‘प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयॅबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड आयटीआय’ (PM-SETU) अंतर्गत मंजूर झालेली एकूण गुंतवणूक ३,६८७ कोटी रुपयांच्या वर पोहोचली आहे. ‘पीएम-सेतू’ आराखड्यांतर्गत, या धोरणात्मक गुंतवणूक योजनांची अंमलबजावणी राज्य सरकारे, उद्योग भागीदार आणि संबंधित आयटीआय यांच्या सहकार्याने केली जाणार आहे.
राष्ट्रीय सुकाणू समितीने ओडिशातील आयटीआय क्लस्टरसाठी २४० कोटी ५० लाख रुपये, पुण्यातील आयटीआय क्लस्टरसाठी २४१ कोटी रुपये आणि महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आयटीआय क्लस्टरसाठी सुमारे २३८ कोटी रुपयांच्या धोरणात्मक गुंतवणूक योजनांना मंजुरी दिली आहे. त्याचप्रमाणे, जम्मू आयटीआय क्लस्टरसाठी २४० कोटी रुपये आणि श्रीनगर आयटीआय क्लस्टरसाठी सुमारे २३५ कोटी रुपयांच्या धोरणात्मक गुंतवणूक योजनांनाही मान्यता देण्यात आली आहे. बैठकीत बोलताना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या सचिव, देबाश्री मुखर्जी यांनी सांगितले की, या मंजुरीमुळे आयटीआय संस्था अधिक सक्षम होतील, प्रशिक्षणाचा दर्जा सुधारेल आणि उद्योगांचा सहभाग वाढेल. त्यांनी नमूद केले की, जम्मू-काश्मीरने केलेली प्रगती उत्साहवर्धक असून, ती या प्रदेशातील तरुणांसाठी कौशल्य विकास बळकट करण्याच्या आणि संधी विस्तारण्याच्या दृढ वचनबद्धतेचे प्रतिबिंब आहे. देबाश्री मुखर्जी म्हणाल्या की, प्रशिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि तरुणांना अशी कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करणे हा याचा मुख्य उद्देश आहे, ज्यामुळे त्यांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतील