Saturday, July 27, 2024

पुण्यातील तुळशीबागेचा रामनवमी उत्सव

Share

गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या पुण्यातील तुळशीबागेतील श्रीरामनवमी उत्सवाचे यंदा २६४ वे वर्ष आहे. या मंदिरातील श्रीरामनवमीचा उत्सव प्रसिद्ध आहे.

भर मध्यानीच्या उन्हात सर्वत्र पसरणारा सुवासिक फुले आणि सुगंधी दवण्याचा दरवळ, ‘श्रीराम जय राम जय जय राम’चा गजर, ‘सियावर रामचंद्र की जय’च्या घोषणा, रामजन्माचे कीर्तन, चौघडावादनाच्या तालावर सुवासिनींनी म्हटलेला पाळणा, रामाच्या पोषाखाचे सूत प्रसाद म्हणून घेण्यासाठी भाविकांची उडालेली झुंबड अशा पारंपरिक उत्साहात पेशवेकालीन तुळशीबाग मंदिरात रामनवमी उत्सव साजरा केला जातो. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या उत्सवाचे यंदा २६४ वे वर्ष आहे. पुण्यात अनेक राम मंदिरे असली तरी तुळशीबाग राम मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.

जुन्या पुण्यातील महत्त्वाची खूण असलेले हे मंदिर १८व्या शतकातील असून या मंदिराचा कळस १५० फूट उंच आहे. पूर्वी या परिसरात तुळशीच्या बागा (तुळशीचे उद्यान) असल्याने या मंदिराला तुळशीबाग हे नाव पडले. मंदिराचे व्यवस्थापन ज्यांच्याकडे आहे त्या कुटुंबाचे तुळशीबागवाले असे आडनाव झाले. त्याकाळी पुण्याचे सुभेदार असलेल्या श्रीमंत नारो आप्पाजी खिरे यांनी पानिपताच्या लढाईनंतर पुणेकरांचे मनोधैर्य वाढावे या उद्देशाने १७६१ मध्ये राम मंदिराची स्थापना केली. १७६५ च्या नोव्हेंबरमध्ये राम-लक्ष्मण-सीता यांच्या मूर्ती उमाजीबाबा पंढरपूरकर यांनी घडविल्या त्याबद्दल त्यांना ३७२ रुपये देण्यात आले होते. मंदिराच्या आवारात भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि भालाकार भोपटकर अशा नामवंत व्यक्तींची प्रासंगिक व्याख्याने होत असत.

शांतता, पावित्र्याची अनुभूती
तुळशीबागेच्या गजबजलेल्या आणि काहीशा गोंगाटयुक्त बाजारपेठेत वसलेले हे मंदिर या सर्व गजबजाटापासून अलिप्त असून या मंदिराच्या आवारात शांततेची आणि पावित्र्याची अनुभूती येते. पेशवेकालीन वास्तुशैलीनुसार बांधलेल्या या मंदिराच्या आवारात मुख्य मंदिरासह इतर देवतांची छोटी देवळे आहेत. या मंदिराचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचे १५० फूट उंचीचे शिखर असून या शिखरावर अनेक देवदेवतांची आणि संतांची शिल्पे कोरलेली आहेत. शिखराच्या वरच्या भागावर सोन्याचा मुलामा दिलेला कळस बसविला आहे. नोव्हेंबर १७६५ मध्ये गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तीची स्थापना केली गेली. गाभाऱ्याच्या वरच्या बाजूला सुंदर कोरीवकाम केलेले सागवानी छत असून जमिनीवर तांब्याचा मुलामा दिलेले कासव आहे. १७६५ साली सभामंडपासमोर हनुमंतांची काळ्या पाषाणात घडवलेली मूर्ती स्थापन केली गेली. १७८१ मध्ये मंदिरात गणपती आणि पार्वतीच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली. मंदिरात विष्णू आणि गरुडाची मूर्तीही आहे.

शिखरावरचे आणि सभामंडपांचे काम नंदाराम नाईक यांनी १८८४ साली पूर्ण केले. मंदिराचा सभामंडप वीस फूट उंचीचा असून त्यात तीन दालने आहेत. मंडपाचे छत लाकडी असून त्यावर सुंदर नक्षीकाम आहे. मुख्य मंदिराभोवती गणपती, दत्त, विठ्ठल रुक्मिणी, महादेव, मारुती आणि शेषशायी विष्णू ही मंदिरे आहेत. याभोवताली प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्गावरून जाताना भाविकांना इतर देवतांचे दर्शन होते. मुख्य मंदिरातल्या देवतांचे दागिने सोने, चांदी, मोती आणि हिऱ्यांपासून घडविलेले आहेत. या मंदिराच्या प्रांगणात दोन मजली नगारखाना असून खर्ड्याची लढाई जिंकल्यानंतर श्रीमंत माधवराव पेशवे यांनी तो बांधून दिला होता. नगारखान्यांच्या खाली कमान असलेला मार्ग असून त्या मार्गावर रामायण या महाकाव्यातील कथांचे अंकन केलेले दिसते. हा मार्ग भाविकांना मंदिराच्या प्रशस्त प्रांगणाकडे घेऊन जातो. मंदिरातील रामनवमीचा उत्सव आजही प्रसिद्ध आहे. पेशवेकाळात अनेक मंदिरे उभारली गेली. परंतु, तुळशीबाग राम मंदिर आपली भव्यता टिकवून आहे.

मंदिराच्या भिंतीवर प्रभू रामचंद्रांच्या पराक्रमाची भित्तिचित्रे लावलेली आहेत. मंदिरात एक मोठा चौघडा असून सण-उत्सवादरम्यान त्याचे वादन करतात. श्री रामजी संस्थान तुळशीबाग न्यासातर्फे मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मंदिरात दररोज पहाटे साडेपाच वाजता सनई चौघडा वादन होते. तसेच सकाळी काकड आरती असते. सकाळी नऊ वाजता सकाळची आरती, दुपारी बारा वाजता महानैवेद्य, साडेसात वाजता सायंआरती आणि रात्री दहा वाजता शेजारती असा मंदिराचा दैनंदिन कार्यक्रम असतो.

असा आहे यंदाचा रामनवमी उत्सव
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने गुढीपाडव्यापासून (९ एप्रिल) ते २७ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामरक्षा, अथर्वशीर्ष पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम, श्रीसूक्त व पुरुषसूक्त पठण, महापूजा, पालखी, श्री कौसल्या माता डोहाळजेवण, श्रीरामजन्म सोहळा, श्रीरामराज्याभिषेक सोहळा अशा धार्मिक कार्यक्रमांबरोबरच रामायण वाचन, कीर्तन, सांगितीक कार्यक्रम अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रामनवमीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (१६ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता कौसल्या मातेचे डोहाळजेवण होणार आहे. बुधवारी (१७ एप्रिल) सकाळी साडेदहा वाजता दर्शनबुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन होणार असून अकरा वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा होणार आहे. सायंकाळी साडेसात वाजता श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक निघणार आहे. शुक्रवारी (१९ एप्रिल) रोजी सकाळी सात वाजता लळीत व पायघडीचे कीर्तन आणि तुळशीबागवाले परिवाराकडून श्रीरामराज्याभिषेक सोहळा होणार आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी (२३ एप्रिल) सकाळी सहा वाजता श्रीहनुमंतास रुद्राभिषेक आणि दर्शनबुवा वझे यांचे श्रीहनुमान जन्माचे कीर्तन होणार आहे. २७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीसत्यनारायण महापूजेने श्रीराम जन्मोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे.

जयश्री कुलकर्णी
(लेखिका सांस्कृतिक विषयांच्या अभ्यासक आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख