राज ठाकरे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर त्यांची काल ठाण्यात सभा पार पडली. शिवसेनेचे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची आज सभा पडली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरूवात केली” अशी टीका राज ठाकरे यांनी यावेळी केली. यावेळी त्यांनी संपूर्ण इतिहासच सांगितला.
राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला शरद पवारांनी सुरूवात केली. पवारांनी पहिल्यांदा काँग्रेस फोडली. मग पुलोद स्थापण केलं. 1977-78 साली गोष्ट असेल, महाराष्ट्रात पहिल्यांदा अशाप्रकारचं फोडाफोडीचं राजकारण झालं, या गोष्टीला शरद पवार यांनी सुरुवात केली. मग 1991, पुन्हा याच शरद पवारांनी छगन भुजबळांना फितवून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना पुन्हा फोडायला लावली. त्यावेळेला शिवसेनेचे आमदार फोडण्याचं काम याच शरद पवारांनी केलं होतं”, असा टीका राज ठाकरेंनी केली.