Saturday, September 7, 2024

विकासाच्या मुद्यावरील ‘राज’कीय निर्णय योग्यच

Share

राज ठाकरे यांचा मोदींना पाठिंबा अनपेक्षित नाही. मनसे आणि भाजप हे हिंदुत्त्वाने बांधले गेले आहेत. त्यामुळे हा पाठिंबा नैसर्गिक म्हणावा लागेल. कोणतीही अपेक्षा न बाळगता राज यांनी पाठिंबा जाहीर केला आहे, हेही महत्त्वाचे. खुर्चीसाठी हिंदुत्वाचा त्याग करून बाळासाहेबांच्या विचारांची कबर बांधणारे उद्धव आणि बिनशर्त पाठिंबा देणारे राज यांच्यातील फरक मतदारांना समजतो.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यामुळे बऱ्याच जणांचा तिळपापड झाला आहे. विशेषत: उद्धव सेनेला पोटशूळ उठणे अत्यंत साहजिक आहे. ठाकरे परिवारात आज उद्धव राजकीयदृष्ट्या एकाकी पडले आहेत. राज आणि उद्धव एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही, हे वास्तव या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. राज ठाकरे यांचा हा निर्णय मुळीच अनपेक्षित नाही. गेले काही महिने याचे संकेत मिळत होते‌.

गुढीपाडव्याला या निर्णयाची केवळ औपचारिक घोषणा झाली. विविध मुद्दे काढून राज यांना आता धारेवर धरले जात आहे. राजकीय धोरणातील सातत्याचा अभाव, हा त्यातील प्रमुख मुद्दा आहे. मनसेची स्थापना, प्रवास, यशापयश आणि राजकीय धोरण वगैरे विषयांवर चर्चा होऊ शकते‌. मात्र निवडणुकीच्या राजकारणात फारसे यश पदरात नसताना राज ठाकरे आपला दबदबा कायम राखून आहेत, हे वास्तव त्यांच्या टीकाकारांनासुद्धा मान्य करावे लागेल.

सर्वव्यापी नेतृत्वाला मान्यता

राज यांनी मोदींना पाठिंबा देताना अत्यंत मोजक्या शब्दांचा वापर केला. त्यातील दोन मुद्दे महत्त्वाचे. प्रथमतः हा पाठिंबा मोदींसाठी आहे. याचाच अर्थ मोदींचे नेतृत्व राज यांना मान्य आहे. मोदी यांनी काहीच भरीव केले नसते तर राज ठाकरे यांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले असते का ? खचितच नाही. याचाच अर्थ असा की, राज ठाकरे हे मोदी यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत. राज ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर करताना उपस्थित केलेला एक महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहिला. राज यांनी निःसंदिग्ध शब्दात सांगितले की, देशासमोरील भविष्यातील आव्हाने पेलण्याची ताकत फक्त मोदींमधेच आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, राहुल गांधी किंवा अन्य कोणत्याही नेत्यांमध्ये देशासमोरील आव्हाने पेलण्याची ‌क्षमता नाही. राज यांचे असे मत तयार होण्यासाठी विरोधकांची विचारसरणी आणि कृती कारणीभूत आहे. राज यांचा पाठिंबा म्हणजे मोदींच्या सर्वव्यापी नेतृत्वाला मिळालेली आणखी एक मान्यता आहे‌. मागील निवडणुकीत मोदींना विरोध करणारे अनेक जण आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावत आहेत. मोदीविरोधकांनी या वास्तवाचा विचार करणे आवश्यक आहे. तथापि, मोदीद्वेशाने पछाडलेल्यांना आत्मपरीक्षण टाळून स्वतःच्या मर्यादा मान्य करता येणार नाहीत.

हिंदुत्वाचा महत्त्वाचा धागा
राज यांचा पाठिंबा आणखी एका कारणासाठी अनपेक्षित नाही. राज हे बाळासाहेब ठाकरे यांचा वैचारिक वारसा सांगतात. बाळासाहेब ठाकरे आणि भाजप हिंदुत्वाच्या धाग्याने बांधले गेले होते. दोघांचाही डीएनए एकच आहे. त्यामुळेच राज यांचा मोदींना पाठिंबा नैसर्गिकच मानावा लागेल. विशेष बाब म्हणजे, राज यांनी मोदींना दिलेला पाठिंबा बिनशर्त आहे. त्यांनी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा कशाचीही अपेक्षा ठेवलेली नाही. खुर्चीसाठी हिंदुत्वाचा त्याग करून बाळासाहेबांच्या विचारांची कबर बांधणारे उद्धव आणि बिनशर्त पाठिंबा देणारे राज यांच्यातील फरक मतदारांना समजतो. राज यांचे राजकारण आणि समाजकारणही नेहमीच विकासाला पुढे नेणारे राहिले आहे. त्यांनी निवडणूक प्रचारातही विकासाचा मुद्दा आग्रहाने आणि वेळोवेळी मांडला आहे. त्यामुळेच त्यांनी या मुद्यावर दिलेला पाठिंबा महत्त्वाचा आहे.

सत्यजित जोशी

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख