Monday, June 24, 2024

राज ठाकरेंचा मोठा निर्णय; अभिजीत पानसे कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार नाहीत

Share

Vidhan Parishad Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार मैदानात उतरवला होता. या संदर्भातील पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशांनुसार प्रसिद्ध कऱण्यात आलं होतं. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे हे उमेदवारी दाखल करणार होते. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्ण तयारी केली होती. मात्र, त्याआधीच मनसेने कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेतली आहे. मनसेचे नेते अभिजीत पानसे (Abhijit Panse) हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, अशी माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

“देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीत त्यांनी राज ठाकरे यांना विनंती केली होती. त्यानंतर त्यांच्या विनंतीला मान देऊन अभिजीत पानसे हे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत, असा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला आहे. फक्त निरंजन डावखरे हे उमेदवार असतील, असं ठरलं आहे. देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्याकडे येऊन गेल्यानंतर पुन्हा एकदा ते दोनदा या विषयावर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे”, अशी माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

सकाळीच भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे आणि आमदार प्रसाद लाड यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर मनसेकडून पानसे यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. या नंतर प्रसाद लाड म्हणाले, “आजच्या या दिवशी राज साहेबांनी पाठिंबा दिला, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अभिजीत पानसेही इथे आहेत. मनसेचे खुप खुप आभार मानतो. त्यांनी जो पाठिंबा दिला आहे, त्यामुळे विजय आमचा होणार आहे. देवेंद्र फडणवीस हे ३ तारखेला भेटीला आले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला”, असे आमदार प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख