Saturday, September 7, 2024

काठीची राजवाडी होळी

Share

काठी (ता. अक्कलकुवा) येथील राजवाडी होळी हा एक वैशिष्ट्यपूर्ण सण आहे. सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यांत होळीचा हा सण पंधरा दिवस चालतो. होलिकोत्सवाचा शाही क्षण असणाऱ्या काठीच्या होळीला साडेसातशे वर्षांची परंपरा असून वनवासी आजही आपली ही परंपरा जपत आहेत.

पारंपरिक वेशभूषा, नृत्य, गीते आणि त्याला पारंपरिक वाद्यांची रात्रभर साथ लाभत असल्याने होळीच्या दिवशी सातपुड्यात वेगळ्याच चैतन्याची लाट पहायला मिळते. घुंगरू, मोरपिसांचा टोप, ढोलकी, मोठा ढोल, बासरी, शस्त्र असा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगांचे नक्षीकाम करून होलिकोत्सवात सामील झालेले वनवासी बांधव येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेतात. पंधरा दिवस चालणाऱ्या होलिकोत्सवात वनवासी बांधवांचे जीवन, संस्कृती आपल्याला अनुभवास येत असते.

हिंदू संस्कृतीत ज्याप्रमाणे दिवाळी या उत्सवाला विशेष महत्त्व आहे त्याचप्रमाणे वनवासींमध्ये होळीला विशेष महत्त्व आहे. विशेषत: सातपुड्यात वसलेल्या आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या काठी संस्थानची राजवाडी होळी प्रसिद्ध असून या होळीसाठी देशभरातील वनवासी बांधव एकत्र जमून होळी साजरी करतात.

सातपुड्यातील काठी संस्थानचे बाराव्या शतकातील राजे उमेदसिंह यांनी १२४६ पासून या ऐतिहासिक परंपरेला सुरुवात केली. ही परंपरा आजही टिकून आहे. काठी संस्थानचे वारस महेंद्रसिंग पाडवी आणि ग्रामस्थ ही परंपरा चालवीत असून सातपुडा परिसरात पारंपरिक पद्धतीने हा शाही सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. कुणालाही आमंत्रण दिले जात नाही की कुणाला मानसन्मान दिला जात नाही. तरी या काठीच्या होळी उत्सवाला हजारो वनवासी बांधव पारंपरिक वेशभूषेत सामील होतात. या काठीच्या होळीत आपापल्या कला पथकांसह सामील होण्यासाठी सातपुड्यात १५ दिवस आधीपासून वनवासी बांधवांनी तयारी केलेली असते. घुंगरू, टोप, ढोलकी, मोठा ढोल, मोरपिसांची बासरी, शस्त्र असा साज परिधान करून आणि अंगावर विविध रंगांचे नक्षीकाम करून ते होलिकोत्सवात सहभागी होतात. होळीसाठी नवस ठेवून खास बुध्या, बावा, घेर, मोरख्या, कहानडोखा, मोडवी, शिकारी आदि प्रकारच्या पांरपरिक होळीच्या प्रतिकांचा पेहराव वनवासी करतात. यासाठी होळीच्या सात दिवस आधीपासूनच व्रत धारण करावे लागते. खाट अथवा पलंगावर न झोपता जमिनीवर झोपूनच या कार्यकाळात होळीला वंदना दिली जाते.

होळीच्या दिवशी काठी येथील राजा उमेदसिंह हे सरकारच्या राजगादीची व शस्त्रास्त्रांची पूजाअर्चा करून, गादीची माती कपाळाला लावतात. सर्वप्रथम होळी मातेची पूजा वडाच्या वृक्षाखाली ढोल, ताशांच्या गजरात केली जाते. वनवासींच्या संस्कृतीप्रमाणे डोक्याला फेटा, डोळ्यांवर चष्मा, कमरेला डोले, हातात तलवार तर महिला गळ्यात चांदीचे दागिने, रंगीबेरंगी साड्या, पायात पैंजण असा साजशृंगार करतात. होळीसाठी नवस फेडणारे मोरबी बाबा, कहानका ढोको, शिकारी मोडवी आदी ढोलाच्या तालावर रममाण होऊन फेर धरतात. वनवासी संस्कृतीची लोकगीते, डफ, पावा, बासरी, तुतारी वाजवून आगळ्यावेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. त्यामुळे घुंगरांचा आवाज, ढोल, ताशांच्या गजराने सातपुड्यात वेगळेच चैतन्य पहायला मिळते. रात्रभर होळीचा गजर सुरू असतो. पहाटे पाचला काठी संस्थानच्या वारसाला होळी पेटविण्याचा मान दिला जातो. विविध रुपे धारण केलेले वनवासी काठी होळीनंतर तब्बल आठ ठिकाणची होळी पायी जाऊन आपला नवस फेडून होलिकात्सव साजरा करतात. पुढील अनेक दिवस मोलगी, तोरणमाळ, गौऱ्या, सुरवाणी, काकर्दे, जामली, जमाना, धनाजे, मांडवी, सुरवाणी, बुगवाडा अशा सातपुड्याच्या दऱ्या-खोऱ्यांत विविध ठिकाणी हा होळीचा उत्सव साजरा केला जातो.

अन्य लेख

संबंधित लेख