Friday, September 13, 2024

हिंदू समाजातील स्वत्वाची, स्वाभिमानाची जाणीव महत्त्वपूर्ण

Share

सर्वच क्षेत्रात देश विकास करत आहे हे नक्की. याचे कारण गेल्या ३० वर्षात निर्माण झालेली राष्ट्रीय प्रेरणा हे आहे आणि या राष्ट्रीय प्रेरणेचा मुख्य स्रोत भगवान श्रीरामाच्या जन्मस्थानावरील मंदिर निर्माणासाठी झालेले जनजागरण आणि त्यातून निर्माण झालेली राष्ट्रीय वृत्ती हे आहे.

अत्याधुनिक भौतिक साधनांनी युक्त, एक हजार वर्षांपेक्षा जास्त काळ टिकेल असा मजबूत पाया, भक्कम सागवानी लाकडाचे वरती सोन्याचा पत्रा लावलेले सुंदर पण मजबूत दरवाजे, भूकंप, वादळ, पूर अशा कोणत्याही नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन भक्कमपणे उभे राहील अशी स्थापत्याची कौशल्यपूर्ण बांधणी, मजबूत खांबांवर वेदकालीन व पौराणिक देवतांबरोबर भारतीय संस्कृतीचे सर्वांगीण दर्शन घडवणारी कालानुक्रमे केलेली कलात्मक मांडणी, मानवी जीवनातील विविध पैलूंचा अविष्कार करता येईल अशी मंडप रचना, बाहेरून केलेल्या प्रदक्षिणा मार्गावर जीवनात कोणत्याही प्रसंगात कशी मर्यादा घालून संयमाने आदर्श जीवन जगता येते हे कळण्यासाठी भगवंताचा मूर्ती रूपाने उभा केलेला भव्य जीवनपट, धर्माचे तत्त्वज्ञान सांगणारे, सामाजिक सुव्यवस्था निर्माण करून समाजाची धर्म विचारांवर आधारित बांधणी करणार्‍या ऋषीमुनींची आणि भक्तीच्या माध्यमातून देवत्व प्राप्त झालेल्या परमभक्तांची तेवढीच परिसरातील भव्य मंदिरे, २२ जानेवारी २०२४ रोजी अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्व धार्मिक विधींच्या आचार पद्धतीने विश्वनिर्मात्या परमेश्वराला आवाहन करून बालमूर्तीत प्राणरूपाने वास्तव्य करायची प्रार्थना करणारे कोट्यावधी हिंदू बांधव… अयोध्येत ४९२ वर्षांच्या हिंदूंच्या प्रखर संघर्षानंतर उभ्या राहिलेल्या भगवान श्रीरामांच्या जन्मस्थानावरील मंदिराचे सारांश रूपाने केलेले हे वर्णन आहे.

Ram Janmabhoomi

मूर्तिपूजा हे हिंदू धर्माचे ठळक वैशिष्ट्य आणि आपल्या आराध्य देवतेसाठी भव्य मंदिरे बांधून सगुण भक्तीच्या साधनेद्वारे सुख, शांती, समाधान व मोक्षप्राप्तीची इच्छा बाळगणार्‍या सहिष्णू धार्मिक हिंदूंनी जगभरात जिथे गेले तिथे शेकडो, हजारो मंदिरे बांधली, पण हजारो वर्षांची परंपरा असणारी, श्रद्धा केंद्र असणारी धार्मिक अधिष्ठान असणारी धर्मभावना टिकवून ठेवणारी, ऐक्य भावना निर्माण करणारी स्वत्व जागृत करणारी प्रेरणा देणारी, कसे जगावे हे शिकवणारी अशी काही मोजकी धर्मस्थाने भारतात आहेत.

अयोध्येतील भगवान श्रीरामाचे जन्मस्थान हे अशा सर्वार्थाने राष्ट्राला सचेतन ठेवणारे एक महत्त्वाचे स्थान. तेच नष्ट करून या राष्ट्राला व येथील जनतेला अपमानित करून तुम्ही आमचे गुलाम आहात हे दर्शवण्यासाठी स्वतःच्या नावाचे स्मारक उभारण्याच्या झालेल्या प्रयत्नाचा ४९२ वर्षांनी का होईना करोडो हिंदूंनी समूळ नाश करण्याचा प्रयत्न केला आणि राष्ट्रीय भावनेच्या अत्युच्च प्रेरणेने गुलामीचे चिन्ह नष्ट करून राष्ट्र वैभवाचे भव्य आणि दिव्य मंदिर उभारण्याचा संकल्प २२ जानेवारी २०२४ रोजी संपूर्ण हिंदू समाजाने पूर्ण केला आहे. ही घटना पुढील हजार वर्षे हे राष्ट्र जिवंत ठेवण्यासाठी सतत प्रेरणा, दिशा, सामर्थ्य प्रदान करेल यात शंका नाही.

एखाद्या विशिष्ट भूभागातील लोक राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेने प्रेरित झाले की ते राष्ट्र सर्व बाजूंनी सुसंपन्न होते, विकासाची कास धरते आणि अल्पावधीत बलाढ्य होऊन जगाला दिशा देण्याचे सामर्थ्य प्राप्त करते. आज भारत देश त्याच दिशेने वाटचाल करीत आहे. त्याला कारणीभूत अयोध्येतील मंदिर निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदेने केलेले ३५ वर्षाचे जनजागरण हे आहे. हजारो साधू संतांच्या पुढाकाराने, मार्गदर्शनाने, परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या विविध मार्गांवरील अथक प्रयत्नाने हिंदू समाजमन जागृत झाले. हिंदू बहुसंख्य असल्याने लोकशाही टिकून असलेल्या आपल्या देशात सनदशीर मार्गाने, धार्मिक भावनेला राष्ट्र प्रेमाची जोड देऊन परिषदेने जन्म स्थानावरील मंदिर निर्माणाचे आंदोलन उभे केले. त्यामुळे देशभर राष्ट्रीय चैतन्य जागृत होऊन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक दृष्ट्या देशात अभूतपूर्व विचारमंथन झाले. देश सर्व बाजूंनी ढवळून निघाला. राष्ट्रीय विचारांच्या ध्रुवीकरणाला सुरुवात झाली. त्यातून राष्ट्रप्रथम या उद्दिष्टाला प्राधान्य देणार्‍या राजकीय पक्षांच्या विचारांना पाठिंबा मिळत गेला आणि देशाच्या हिताचा विचार करणारे सरकार सत्तेवर येऊ शकले.

देशहिताचे निर्णय
राष्ट्रीय हिताला प्राधान्य देणार्‍या सरकारमुळे देशाची प्रगती सुरू होते आणि जनताही विश्वासाने सरकारला पाठिंबा देते. देशहिताचे निर्णय घेणे सरकारला सोपे जाते. असे सरकार देशातील जनतेच्या भावनांचा, श्रद्धांचा अधिक विचार करते. त्यामुळेच भारतात देशभक्त जनतेच्या विश्वासावर जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या आणि घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारलेल्या आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जागतिक दृष्ट्या आपल्या व्यक्तिगत प्रतिमेचा विचार न करता आत्मविश्वासाने व आत्मसन्मानाबरोबरच अतिव श्रद्धेने राष्ट्रीय सन्मानाचे प्रतीक असलेल्या श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनाबरोबरच प्राणप्रतिष्ठेचे यजमानपद स्वीकारून राष्ट्रीय भावना दृढीकरणाला चालनाच दिली. स्वातंत्र्योत्तर कालखंडातल्या गेल्या काही वर्षातील हा बदल श्रीराम मंदिराच्या आंदोलनामुळे निर्माण झाला आहे.

Vande Bharat inauguration

सर्व क्षेत्रात देशाचा विकास
त्याशिवाय अनेक सकारात्मक परिणाम दृष्टिक्षेपात येत आहेत. शिक्षणाचे स्वरूप बदलत आहे. मनुष्य विकासाबरोबरच देश विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून नवे शैक्षणिक धोरण आखले गेले आहे. स्वच्छ भारत अभियानातून व्यक्तिगत स्वच्छतेबरोबर सामाजिक स्वच्छतेचे भान भारतीय नागरिकांमध्ये वाढत आहे. भारतात निर्माण झालेल्या योगशास्त्राचा उपयोग आरोग्य रक्षणासाठी भारतासह जगभर केला जात आहे. चांद्रयान तीनच्या यशस्वीतेने विज्ञान तंत्रज्ञानातील भारताच्या प्रगतीने जग विस्मयचकीत झाले आहे. चीन, पाकिस्तान, बांगलादेश यासारखे शेजारील देश कुरापत काढताना शंभर वेळा विचार करत आहेत. आपल्याला जशास तसे उत्तर मिळेल याची खात्री झाल्याने सीमाभंग करण्याचे धाडस ते करीत नाहीत. भारतात घातपात करून अन्य देशात पळून गेलेल्या अतिरेक्यांना आता धास्ती वाटत आहे. भारताकडून आपल्याला कधीही शिक्षा होऊ शकते याची जाणीव त्यांना झाली आहे. भ्रष्टाचार करणारे कोणीही असो त्याला शासन होताना दिसत आहे. कृषीक्षेत्र, उद्योग क्षेत्र, सामाजिक सेवाक्षेत्र, दळणवळण, व्यापार, पर्यटन या क्षेत्रात भरीव वाढ होताना दिसत आहे. भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होऊन जगात पाचव्या स्थानावर आली आहे. रोजगार वाढत आहेत, त्यामुळे १४० कोटी लोकसंख्या होऊनही दारिद्य्ररेषेबाहेर येणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

Chandrayaan 3

जी २० सारखी जागतिक परिषद आपण प्रभावीपणे यशस्वी करून विकसित देशांनाही भारताबद्दलचे मत बदलायला लावले आहे. सर्वच क्षेत्रात देश विकास करतोय हे नक्की. याचे कारण गेल्या ३० वर्षात निर्माण झालेली राष्ट्रीय प्रेरणा हे आहे आणि या राष्ट्रीय प्रेरणेचे मुख्य स्रोत भगवान श्रीरामाच्या जन्मस्थानावरील मंदिर निर्माणासाठी झालेले जनजागरण आणि त्यातून निर्माण झालेली राष्ट्रीय वृत्ती हे आहे.

Atal Setu

समरसतेच्या दृष्टीने वाटचाल
भगवान श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम होते. असुरांचा नाश करण्यात आणि अपमानाचा बदला घेण्यात त्यांनी सर्व नीतीनियमांच्या आणि मर्यादांच्या आधारेच रावणाच्या संपूर्ण कुळाचा नाश करून असंख्य असुरांना यमसदनी पाठवले. हिंदू मुळातच सहिष्णू असल्याने नीती नियमांच्या मर्यादेत जीवन जगताना आपल्या अस्मितेचा, श्रद्धेचा, मानबिंदूंचा, माता-भगिनींचा होणारा अपमान त्याने स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही अनेक वर्ष सहन केला. पण आता तो समर्थपणे गर्व से कहो हम हिंदू है ! असे म्हणत प्रतिकारला सिद्ध होत आहे. हिंदू धर्मात मध्ययुगीन काळात निर्माण झालेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, रीतीरीवाज, जातीभेद, उच्चनीचता, अस्पृश्यता दूर व्हावी म्हणून हिंदू समाज स्वतःहून सामाजिक अभिसरणा बरोबरच समरसतेच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे. भगवान श्रीराम सगळ्यांचे होते-आहेत. रामाला मानणारी प्रत्येक व्यक्ती रामस्वरूप असेल तर मग भेद कुठला? त्यामुळे ‘सबके राम’ या तत्त्वावर हिंदू समाज जीवनाची वाटचाल सुरू झाली आहे हा जन्मस्थानावरील मंदिर निर्माणाचा प्रभाव आहे. हजार वर्षांच्या गुलामगिरीच्या मानसिकतेतून हिंदू समाज मुक्त होत आहे. त्याला स्वत्वाची, स्वाभिमानाची जाणीव होत आहे.

संजय मुद्राळे
(लेखक विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रदेश मंत्री आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख