Saturday, September 7, 2024

डॉ. हेडगेवार वरच्या पायरीवर कधीच दिसले नाहीत…

Share

वर्षप्रतिपदा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन. संघासारखी देशव्यापी संघटना उभी करणारे डॉ. हेडगेवार संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला आणि त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाला मित्राप्रमाणे वाटत, हा त्यांचा फार मोठा गुणविशेष होय. हा गुणविशेष अधोरेखित करणाऱ्या डॉक्टरांच्या या काही आठवणी.

८ फेब्रुवारी १९३५ : यवतमाळ येथे डॉ.भास्कर महादेव उपाख्य काकासाहेब टेंभे यांच्या मुलाच्या मौंजीबंधनाला डॉ. हेडगेवार उपस्थित होते. या प्रसंगाला आलेली मोठमोठी मंडळी एका मंडपात गाद्यातक्क्यांना टेकून बसली होती आणि मंडपाच्या एका बाजूला एका सतरंजीवर डॉ. हेडगेवार, आप्पाजी जोशी, यवतमाळ शाखेचे काही स्वयंसेवक आणि मंडपात इतस्तत: फिरणारी मुले बसली होती. कुणीतरी एक बडे पाहुणे नमस्कार करून डॉ.हेडगेवारांना म्हणाले, “डॉक्टर, अहो इकडे या ना. इकडे पोरासोरांत काय बसलात?” त्यावर हसतच डॉ. हेडगेवार म्हणाले, “मी नेहमीचाच लहान मुलांच्या संगतीतला आहे. मला अजून काही पोक्तपणा आला नाही. “नंतर डॉ. हेडगेवार मुलांना म्हणाले, “मुलांनो, तुम्ही माझ्यावर फार मोठा उपकार करता. तुमच्यात असले की मला वाटते आपण अजून तरुण आहोत.”

(वसंत सदाशिव बल्लाळ यांनी लिहिलेली आठवण, वसंतरावांचे वडील सदाशिव हणमंत बल्लाळ हे ‘लोकमत’ चे भूतपूर्व संपादक असून डॉक्टरांच्या १९३० च्या कारावासात त्यांच्यासोबत अकोला कारागृहात होते. )

वसंतराव पुढे लिहितात, “पुष्कळ मोठ्या लोकांची गोष्ट अशी असते की त्यांचे भक्तगण तर त्यांना मान देतातच पुढारी म्हणून. पण त्यांचे त्यांनाही वाटत असते की आपण या चार लोकांपेक्षा कुणीतरी मोठे आहोत. काही स्थानिक पुढाऱ्यांकडे मी यवतमाळला जात होतो. त्यांच्याकडे जाताना वाटे- आपण कसे बोलावे, काय बोलावे, चुकले तर ते काय म्हणतील? आणि खरोखरच चुकीबद्दल त्यांच्याकडून यथास्थित शब्दांचा मार मिळायचा. डॉक्टरांच्या घरी जायचे म्हणजे आपण एका मोठ्या संघटनेच्या संस्थापकाकडे जात आहोत असे मुळी वाटतच नसे. रामाने गोविंदाकडे ज्या मोकळेपणाने जावे त्याच मोकळेपणाने डॉक्टरांच्याकडे आम्ही जात असू. डॉक्टर काही कामात असतील, महत्त्वाची बोलणी चालली असतील, आपल्याशी कसे बोलतील हा विचारच मुळी मनात येत नसे. आणि खरेच पहावे तर डॉक्टर त्यांच्याकडे आलेल्या चारचौघा स्वयंसेवकांशी हसत हसत बोलत बसलेले. कधीकधी मला वाटे डॉक्टर संघटनेचे कार्य करतात, पण जेव्हा पहावे तेव्हा ते आपले आलेल्या माणसांशी हवापाण्यासारख्या मामुली गोष्टी करीत बसलेले. एखादे वेळेसच ते कृष्णराव मोहरीरांना एखाद्या पत्राचा मजकूर सांगत असलेले दिसत. मग ते कार्य काय करतात? डॉक्टरांचे सगळे कार्य तसेच आहे. संघाच्या कार्यक्रमातील प्रत्येक गोष्टही तशीच आहे. स्वयंसेवकांकडून आपण कोणी भिन्न आहोत हा विचार डॉक्टरांच्या मनात कधीच आला नाही. आपण कुणी तरी नेते आहोत आणि या स्वयंसेवकांना आपण चार शब्द सांगावेत अशी त्यांची भूमिकाच नव्हती आणि म्हणूनच ते स्वयंसेवकांच्या अंतःकरणात खोलखोल जाऊन बसले. त्यांच्या हवापाण्याच्या गोष्टीतसुद्धा संघाचे हवापाणीच खेळत होते. ते बोलतील तो संघ होता. एकदा चार स्वयंसेवक डॉक्टरांकडे आले आणि म्हणाले, “डॉक्टर आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. त्याबरोबर हसतच डॉक्टरांनी विचारले, “मग चंदन वगैरे काही मिळाले की नाही?”

वसंतराव पुढे लिहितात, “डॉक्टरांचे वैशिष्ट्य सांगताना कोणी म्हणतात त्यांनी प्रथम हिंदुस्थान हिंदूंचा ही भावना निर्माण केली. कुणी त्यांच्या चिकाटीची, कुणी संघटनाचातुर्याची प्रशंसा करतात. मला त्यांच्यात एकच गोष्ट विशेष वाटते आणि ती ही – राष्ट्राला हा महामंत्र दर्शविणारा हा दृष्टा मुनी सबंध आयुष्यभर सर्वसाधारण स्वयंसेवकाच्या वरच्या पायरीवर कधीच दिसला नाही. ते पुढारी वाटत नव्हते, महापुरुष वाटत नव्हते, नेता वाटत नव्हते. पण संघाच्या प्रत्येक स्वयंसेवकाला – त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येक स्वयंसेवकाला – ते मित्राप्रमाणेच वाटत होते हा त्यांचा विशेष आहे. याविषयीच मी एकदा एका बौद्धिक वर्गात बोलत होतो. संघाच्या तत्त्वज्ञानाने डॉक्टरांच्या रक्ताचा बिंदू-बिंदू कसा भरला आहे ते सांगून भावनेच्या भरात मी म्हणालो, “कमरेभोवती हिरवी शाल, अंगात खाकी गरम सदरा, वर स्वेटर आणि उशीवर पडून राहिलेल्या त्या महापुरुषाकडे पाहून असे वाटे की ईश्वराने यावेळेस किती किती साधा अवतार घेतला आहे.” बौद्धिक वर्ग आटोपल्यावर नंतर एका कार्यकर्त्याने मला सांगितले, “डॉक्टरांच्या विषयी असे काही बोलू नये. त्यांना ते आवडत नाही. ते तर अगदी साधे, साधारण प्रतीचे हिंदू आहेत.”

वसंतराव पुढे लिहितात, “परमपूजनीय केशव बळीराम हेडगेवारांचे हे आत्मन्! संघटनेचा महामंत्र डॉक्टरांच्या मुखाने तू आम्हाला दिलास. डॉक्टर आमच्यात होते, तोपर्यंत तू आम्हाला त्यांची किंमत कळू दिली नाहीस. शेवटपर्यंत आम्हाला असेच भासवत आलास की डॉ. हेडगेवार हा अगदी सर्वसाधारण मनुष्य आहे. तू आम्हाला तसे का फसविलेस कुणास ठाऊक. पण फसविलेस खरे! मित्राच्या नात्यानेच आम्ही डॉक्टरांना बघत होतो. त्यांच्या जिवंतपणे महापुरुष म्हणून तू त्यांच्या चरणांना आम्हाला कधीच वंदन करू दिले नाहीस. नेता म्हणून त्यांच्या गळ्यात कधीच हार घालू दिला नाहीस. संघकार्य ईश्वरी कार्य आहे आणि ते यशस्वी होणारच असे डॉक्टर आम्हाला नेहमी सांगत. पण डॉक्टरांच्या अंगातच ईश्वरी अंश आहे ही गोष्ट तू त्यांच्या निकटच्या सहवासात आलेल्यांच्या नजरेस येऊ दिली नाहीस.”

डॉ. हेडगेवार यांनीही वेळोवेळी जे विचार व्यक्त केले आहेत, त्यातूनही त्यांची मनोभूमिका अगदी छान स्पष्ट होते. डॉक्टर म्हणतात, “एकाच व्यक्तीला नेता आणि कार्यकर्ता दोन्हीही होता आले पाहिजे.”

पुणे येथील मुंबई प्रांताच्या संघचालकांच्या रात्रीच्या बैठकीत डॉक्टरांनी मांडलेला विचारही (दि. ३० एप्रिल १९३७) असाच आहे. डॉक्टर म्हणतात, “आमच्या पुढाऱ्यांना फक्त पुढारी होता येते, कार्यकर्ता नाही. हे आम्हाला नको आहे. आम्हाला एकाच माणसाला पुढारी व कार्यकर्ता होता आले पाहिजे असे हवे आहे.”

डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले
(लेखक डॉ. हेडगेवार यांच्या चरित्राचे गाढे अभ्यासक आहेत. युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार या विशेषांकाचे संपादनही त्यांनी केले आहे.)

अन्य लेख

संबंधित लेख