Saturday, July 27, 2024

वैफल्यग्रस्त पवारांची पराभूत मानसिकता

Share

पवार यांना महाराष्ट्राच्या आणि राष्ट्रीय राजकारणात कायम overestimate केले गेले. आयुष्यभर केवळ political manipulations केल्यामुळे पवार यांच्यावर सध्या विपरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे केवळ पवार यांचेच नव्हे तर महाराष्ट्राचे नुकसान झाले. पन्नास वर्षे हा कालावधी मोठा आहे. या नुकसानीला जबाबदार कोण ?

गेल्या दोन दिवसांत समाज माध्यमांवर व्हायरल झालेला एक विनोद असा: पवारसाहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा सध्याच्या काही नेत्यांची वये अशी होती: योगी आदित्यनाथ – पाच वर्षे, अमित शाह – १३ वर्षे, जगन मोहन रेड्डी – पांच वर्षे, हिमांत विश्वास सरमा – आठ वर्षे. या सर्वांनी आपापल्या राज्यात काॅंग्रेस जवळपास संपविली आहे आणि पवारसाहेब आता पुन्हा काॅंग्रेस जॉइन करीत आहेत.

हा विनोद पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागेल. या विनोदातून पवार यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट होतात. परंतु पवार यांचा अहंकार या मर्यादा कधीही मान्य करणार नाही. पवार यांचे चेले त्यांच्या प्रत्येक चालीला वैचारीक मुलामा देण्यात मश्गुल असतात. पवार यांची प्रत्येक खेळी त्यांच्यासाठी master stroke असते. मात्र पाच दशकांची कारकीर्द भ्रमात गेली, हे वास्तव ते काहीही मान्य करणार नाहीत.

पवार यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केलेले मत म्हणजे त्यांची अगतिकता आणि असहाय्यता दाखविते. आगामी काळात प्रादेशिक पक्ष काॅंग्रेसमधे विलीन होतील, असे भाकीत पवार यांनी व्यक्त केले आहे. पवार यांनी या वेळी स्वतःच्या पक्षाचे नाव घेण्याचे टाळले आहे. परंतु याच विधानातून त्यांची पराभूत मानसिकता अधोरेखीत होते. ऐन निवडणुकीच्या मध्यावर पवार यांनी असे मत व्यक्त केले. त्यामुळे पवार यांच्या चाहत्यांनी आणि मतदारांनी मतदान करताना विचार करायला हवा. पवार हे सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भविष्यामुळे चिंतित झालेले दिसतात. सुप्रिया सुळे यांना सध्या पराभवाच्या भीतीने ग्रासले आहे. भविष्यात त्या राज्याच्या राजकारणात दिसतील, अशी कुजबूज आता सुरू झालेली आहे.

याचे कारण स्पष्ट आहे. पवार परिवारात उभी फूट झाल्यानंतर आणि पक्षाचे भविष्य अंध:कारमय झाल्यामुळे शरदरावांना गांधी-नेहरू यांच्या वैचारिक वारशाची आठवण झाली. पाच दशकांच्या राजकीय कारकीर्दीतीतील पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी काॅंग्रेस पक्षाच्या बाहेर काढला. पवार काॅंग्रेस पक्षात कधीही comfortable नव्हते. काॅंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वपदी कोणीही असले, तरी त्यांनी पवार यांच्याकडे कायम संशयानेच बघितले. याला स्वतः पवारच जबाबदार आहेत. पवार यांना उभ्या कारकिर्दीत `credibility crisis’ ने ग्रासून टाकले आहे. आज तर त्यांचे पुतणे अजित पवार आणि दीर्घ काळाचे सहकारी त्यांना रोज expose करीत आहेत. त्यातून त्यांच्यापुढे, विशेषतः, सुप्रिया सुळे यांच्यापुढे गंभीर राजकीय संकट निर्माण झाले आहे. पवार यांचे वर्णन ऐंशी वर्षांचा योद्धा वगैरे केले जाते. वास्तविक ही स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी चाललेली केविलवाणी धडपड आहे. राष्ट्रीय नेतृवावर राष्ट्रीय प्रचार करण्याऐवजी, पवार यांना आज गल्लीबोळात प्रचार करीत फिरावे लागत आहे. पक्षातील फूट, राष्ट्रीय पातळीवरील विश्वासाचा अभाव आणि भाजपचे आव्हान या कोंडीत पवार यांना पकडले आहे. त्यात भर म्हणजे वयोमान आणि प्रकृतीमुळे पवार यांना पूर्वीची उमेद राहिलेली नाही. उसने अवसान आणून फार काळ दिवस काढता येत नाही. परिणामी पवार यांना काॅंग्रेसमधे स्वतःचा पक्ष विलीन कण्यावयाचुन पर्याय राहिलेला नाही. मात्र त्यांनी संभावितपणे हा विचार इतर प्रादेशिक पक्षांच्या नावाने खपविला आहे.

पवार यांनी एकूण दोनवेळा काॅंग्रेस पक्षाचा त्याग केला. एकदा स्वतःचा पक्ष विलीन केला. तब्बल तीन दशके त्यांनी काॅंग्रेसबाहेर राजकीय जीवन व्यतीत केले. मात्र ते काॅंग्रेस च्या सावलीमधेच वावरले. सावलीत वृक्षाच्या वाढीला मर्यादा पडतात. पवार यांची अवस्था तशीच झाली आहे. जे धाडस ममता बॅनर्जी किंवा अन्य काॅंग्रेस नेत्यांनी दाखविले, ते पवार यांनी कधीच दाखविले नाही. पवार यांना महाराष्ट्रात साधे single largest party चे स्थान मिळवता आले नाही, हे वास्तव आहे.

पवार यांनी विलिनिकरणाचा विषय उपस्थित करताच त्यांच्या विश्वासाचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. त्यांच्या या प्रस्तावाला पक्षात कसा प्रतिसाद मिळतो, हे बघावे लागेल. सुप्रिया सुळे यांनी अत्यंत सावधपणे प्रतिसाद दिला आहे. उरल्यासुरल्या पक्षात सैरभैर वातावरण निर्माण होणे साहजिक आहे. काॅंग्रेस पक्ष पवार यांना पक्षात accommodate’ करण्यास किती उत्सूक आहे, हा स्वतंत्र विषय आहे. थोडक्यात, पवार यांना आयुष्याच्या या टप्प्यावर अप्रिय परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. विधानसभा निवडणुका काही महिन्यावर आल्यानंतर पवार यांचे मत पराभूत मानसिकतेचे प्रतीक मानावे लागेल.सह्याद्री’ ‘maratha strongman’ वगैरे बिरुदे लावणाऱ्या पवारांवर विपरीत परिस्थिती आली आहे. पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात कायम `overestimate’ केले गेले. अंगभूत मर्यादा आणि परिवारवादी राजकारण यांचा पवार बळी ठरले आहेत. ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ ही उक्ती काव्यामधे ठीक असते. राजकारणात नाही.

सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख