Saturday, July 27, 2024

औद्योगिक क्षेत्रामुळे शिरूर मतदारसंघ सर्वच पक्षांसाठी महत्त्वाचा

Share

जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर या ग्रामीण भागातील चार तर, पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी- चिंचवडमधील भोसरी अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे. शिवसेनेचे शिवाजीराव-आढळराव पाटील यांनी या मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले.

सन २००९च्या पुनर्रचनेनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघानंतरचा हा ग्रामीण भागातील दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे. मावळ लोकसभा मतदारसंघा प्रमाणेच शिरूर लोकसभा मतदारसंघात ग्रामीण भागाबरोबरच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील काही भागाचा समावेश असल्याने हा मतदारसंघ महत्त्वाचा ठरला आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघातील बहुतांश भाग ग्रामीण असला तरी, खेड, चाकण, भोसरी आणि रांजणगाव येथील औद्योगिक कंपन्या, एमआयडीसी आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जाळे या मतदारसंघात असल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघ राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा ठरला असून त्यावर वर्चस्व राखण्याचे प्रयत्न सातत्यताने सुरू असतात.

जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर या ग्रामीण भागातील चार तर, पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी- चिंचवडमधील भोसरी अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश शिरूर लोकसभा मतदारसंघात आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अतुल बेनके आमदार आहेत. आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील करतात. आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून ते सलग सात वेळा विजयी झाले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत ते आहेत. खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते-पाटील आमदार आहेत. खेड-आळंदीमधून ते आमदार आहेत. तर शिरूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अशोक पवार यांच्याकडे आहे. हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाचे आमदार महेश लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

शिवाजीराव आढळराव तीन वेळा विजयी
विधानसभेचा विचार केला तर शिरूर लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अधोरेखीत होते. मात्र या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर सलग तीन वेळा शिवसेनेने लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व राखण्यात यश मिळवले आहे. शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि सध्या शरद पवार गटात असलेले डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले होते.

शिरूर लोकसभा मतदारसंघाची एकूण मतदार संख्या २४ लाख ७९ हजार ७४२ एवढी आहे. त्यामध्ये १३ लाख ५ हजार ५६४ पुरूष, ११ लाख ७३ हजार ९८५ स्त्री मतदार आहेत. १९३ तृतीयपंथी मतदार आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता शहरी भागातील हडपसर मतदारसंघातील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या अधिक आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या ३ लाख ८ हजार ४३९ एवढी आहे. त्यामध्ये १ लाख ५७ हजार ९१८ पुरूष, १ लाख ५० हजार ५१८ स्त्री मतदार आहेत. तर ३ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात १ लाख ५२ हजार ८३४ पुरूष, १ लाख ४५ हजार ७५६ स्त्री मतदार आहेत. ८ तृतीयपंथी मतदार आहेत. असे एकूण २ लाख ९८ हजार ५९८ मतदार आहेत. खेड-आळंदी मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या ३ लाख ४५ हजार ३५ आहे. त्यामध्ये १ लाख ७९ हजार १३ पुरूष मतदार आहेत. तसेच १ लाख ६६ हजार १५ स्त्री मतदार आहेत. ७ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

शिरूर विधानसभा मतदारसंघात २ लाख २४ हजार ५६२ पुरूष, २ लाख ५ हजार २३७ स्त्री मतदार आहेत. १९ तृतीय पंथी मतदार असे मिळून एकूण ४ लाख २९ हजार ८१८ अशी या मतदारसंघातील मतदारांची संख्या आहे.

पिंपरी-चिंचवडमधील भोसरी विधानसभा मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या ५ लाख ३५ हजार ६६६ एवढी आहे. त्यामध्ये २ लाख ९३ हजार ८०२ पुरूष मतदारांची नोंद आहे. तसेच २ लाख ४१ हजार ७७२ स्त्री मतदार आहेत. ९२ तृतीयपंथी मतदार आहेत.

हडपसरमध्ये सर्वाधिक मतदार
पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघात ५ लाख ६२ हजार १८६ मतदार असून २ लाख ९७ हजार ४३५ पुरूष २ लाख ६४ हजार ६८७ स्त्री तर ६४ तृतीयपंथी मतदारांची नोंद आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात एक संवेदनशील मतदान केंद्र असून ते आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख