Thursday, March 26, 2026

कणेरी मठात ३१ मार्चपासून ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’

Share

कोल्हापूर : बारा बलुतेदारांच्या समृद्ध परंपरांना उजाळा देण्यासाठी आणि स्थानिक कारागिरांच्या कौशल्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी श्री सिद्धगिरी संस्थान मठ, कणेरी आणि पर्यटन मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत ‘सिद्धगिरी कारागीर महाकुंभ’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभात देशातील १७ राज्यांमधून राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर पारितोषिक प्राप्त २०० हून अधिक कलाकार सहभागी होणार आहेत, अशी माहिती प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हस्तकला आणि संस्कृतीचा संगम
या महाकुंभाचे मुख्य आकर्षण म्हणजे कारागिरांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री. यामध्ये खालील कलाप्रकार पाहायला मिळतील:

चित्रकला: पिंगुळी चित्रकला, आदिवासी भिल्ल कला, धागा चित्रकला.

हस्तकला: टेराकोटा, बांबू काम, कच्छची राबरी कला, ग्लास वर्क आणि मातीची आकर्षक खेळणी.

वस्त्रकला: महाराष्ट्राची शान पैठणी, बनारसी साड्या आणि बंजारा कला.

युवकांसाठी शिक्षणाची संधी
प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजींनी सांगितले की, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि कला शाखेतील युवक-युवतींना या प्रदर्शनासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. यामागील मुख्य उद्देश हा आहे की, तरुणांनी या प्राचीन कलांचे अध्ययन करून त्यांना आधुनिकतेची आणि तंत्रज्ञानाची जोड कशी देता येईल, याचा विचार करावा.

या महाकुंभाचे उद्घाटन ३१ मार्च रोजी सकाळी १०:०० वाजता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी सिद्धगिरी मठाचे कार्यकारी संचालक यशोवर्धन बारामतीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जी.पी. वढड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कोल्हापूरकर नागरिकांनी आपल्या मित्र-परिवारासह या कारागीर महाकुंभाला भेट देऊन देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या कलाकारांचा उत्साह वाढवावा आणि भारतीय संस्कृतीचा हा सोहळा डोळ्यांत साठवावा, असे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

अन्य लेख

संबंधित लेख