Friday, September 20, 2024

बहिणी, युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासकीय योजनांच्या यशाची खरी पावती

Share

नंदुरबार : आज नंदुरबार शहरात आल्यानंतर शासनाचा प्रतिनिधी या नात्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणि ‘मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजने’च्या लाभार्थ्यांनी ज्या पद्धतीने माझे स्वागत केले, त्यामुळे मी अक्षरश: भारावून गेलो आहे. बहिणी आणि युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासकीय योजनांच्या यशाची खरी पावती असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती नियंत्रण, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.

ते आज शहरातील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ व मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या आदेश वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमशा पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, रतन पाडवी अभिजित मोरे, जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी, कृष्णा राठोड (जि.प.), कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले की, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेत भगिनींच्या खात्यात 14 ऑगस्टपासून पैसे जमा व्हायला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 61 हजार 997 महिला भगिनींच्या खात्यात येत्या 19 ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवशीपर्यंत जुलै व ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाचवेळी जमा होणार आहे. या भगिनींना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा” योजनेत वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. येणाऱ्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त 2 लाख 70 हजार 99 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेल्या लेक लाडकी योजनेत चालू वर्षात 1 हजार मुलींच्या बॅंक खात्यावर 5 हजार रूपयांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. तरुणांना खाजगी तसेच शासकीय आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा, म्हणुन सुरु केलेल्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेत जिल्ह्यात 2 हजार उमेदवारांना प्रथम टप्प्यामध्ये लाभ मिळणार असुन सध्या 617 उमेदवार या योजनेंतर्गत कामावर रुजू झालेले आहेत. आज 63 लोकांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीचे आदेश वाटप करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे. 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता 100 टक्के अर्थसहाय्य देणारी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ शासनाने सुरू केली आहे. दारिद्र्य रेषेखालील दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे या योजनेत खरेदी करता येणार आहेत, या सर्व योजना समाजातील सर्व घटकांसाठी असून या योजनांपासून जिल्ह्यातील एकही नागरीक वंचित राहणार नाही, असा विश्वासही यावेळी पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिला.

अन्य लेख

संबंधित लेख