सोलापूर : काँग्रेस पक्षाला सोलापूर (Solapur Congress) जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळणारे धवलसिंह मोहिते पाटील (Dhavalsinh Mohite Patil) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोलापूर काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
सोलापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी राजीनामा देताना ‘लेटर बॉम्ब’ टाकला आहे. त्यांनी राजीनामा देताना डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे. काँग्रेस पक्षापेक्षा सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे हे मोठे झाले आहे. सोलापूरची काँग्रेस ही शिंदे काँग्रेस झाली असल्याची घणाघाती टीकाही धवलसिंह मोहिते पाटील यांनी यावेळी केली आहे.
विधानसभा निवडणुकीत कोणालाही विश्वासात न घेता उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसला जिल्ह्यात एकही जागा मिळाली नाही, असा आरोप धवलसिंह मोहिते पाटलांनी केला. तसेच, शिंदे कुटुंबाकडून पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. या घडामोडींमुळे सोलापूर काँग्रेसमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.