Saturday, September 7, 2024

लोकसभा निवडणूकीचा चौथा टप्पा…महाराष्ट्रात चुरशीची लढत

Share

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज,(१३ मे रोजी) मतदान सुरू आहे. नऊ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या ९६ संसदीय मतदारसंघांचा चौथ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आंध्र प्रदेशातील २५, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, महाराष्ट्रातील ११, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी आठ जागा, बिहारमधील ५, झारखंड आणि ओडिशातील प्रत्येकी चार जागांसह जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील एका जागेचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील चित्र या प्रमाणे –
गेली दहा वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या या पुण्यातील मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, वंचितचे वसंत मोरे यांच्यात लढत होणार आहे. गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेली सव्वा वर्ष रिक्त असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी भाजपने सारी ताकद पणाला लावली आहे. सुमारे २१ लाख मतदार असलेल्या या मतदारसंघात पंतप्रधान मोठ्या नेत्यांच्या सभा पार पडल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएएमचे खासदार इम्तियाज जलील, शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि शिवसेना शिंदे गटाचे संदिपान भुमरे या तिघांमध्ये चुरशीची लढत होत आहे.

अहमदनगर मतदारसंघात महायुतीचे खासदार डॉ. सुजय विखे (भाजप) व महाविकास आघाडीचे माजी आमदार नीलेश लंके (शरद पवार गट) यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही त्यांची स्वत:ची यंत्रणा विखेंविरोधात नगरमध्ये उतरवली आहे. मतदारसंघ औद्योगिक विकास, रस्ते, दुष्काळ, रोजगार असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या मतदारसंघात १९ लाख ८१ हजार मतदार
आहेत.

भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रावेर मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत होत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी ही लढत महत्त्वाची आहे. या मतदारसंघात सुमारे १८ लाख मतदार आहेत.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि अजित पवार गटाचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात पुन्हा एकदा चुरशीची लढत शिरुरमध्ये होत आहे. गेल्या वेळी हेच दोघे परस्परांच्या विरोधात लढले होते. फरक एवढाच की यंदा आढळराव पाटील घड्याळ या चिन्हावर लढत आहेत. तर शिवसेना ठाकरे गट यंदा डॉ. कोल्हे यांच्याबरोबर आहे.

शिर्डीमधून खासदार सदाशिव लोखंडे (शिंदे गट) व महाविकास आघाडीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट) यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीकडे आलेल्या तिसऱ्या उमेदवार उत्कर्षा रूपवते किती मते खेचतात व त्याचा फटका कोणाला बसतो, यावरही
सारी गणिते अवलंबून आहेत.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून खासदार उमेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून भाजपला आव्हान दिले आहे. स्वत: पाटील हे रिंगणात नाहीत. त्यांचे समर्थक करण पवार हे ठाकरे गटाकडून निवडणूक लढवीत आहेत. भाजपने गेल्या वेळी जाहीर झालेली उमेदवारी रद्द केलेल्या स्मिता वाघ यांना संधी दिली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे यांच्यात जालनातून लढत होत आहे. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा जालना जिल्हा हा केंद्रबिंदू होता.

यंदाही बीडची लढत ही जातीय झाली आहे. भाजपच्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे बजरंग सोनावणे यांनी आव्हान दिले आहे. धनंजय मुंडे यांची साथ असणे ही पंकजा यांच्यासाठी जमेची बाजू.

नंदुरबारमधून रिंगणात उतरलेल्या भाजपच्या डॉ. हिना गावित यांच्यापुढे पक्षांतर्गत तसेच मित्रपक्षाचे आव्हान होते. काँग्रेसचे गोवाल पाडावी यांनी चांगली लढत दिली आहे. पाडावी हे काँग्रेसचे आमदार के. सी. पाडावी यांचे पुत्र. आदिवासीबहुल मतदारसंघावर भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सारी ताकद पणाला लावली आहे.

या सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होत आहे. महाराष्ट्रातील या ११ मतदार संघातील लढत चुरशीची आहे.

अन्य लेख

संबंधित लेख