Saturday, July 27, 2024

‘हे’ नामांतर आवश्यकच होते

Share

राज्यातील महायुती सरकारने पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे ‘राजगड’ असे नामांतर केले आहे. हा निर्णय अलीकडेच घेण्यात आला. निवडणुकीच्या गदारोळात या निर्णयाकडे दुर्लक्ष झाले असले तरी हे पाऊल अभिमानास्पद आहे. राजगडाची महती काय सांगावी ? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ही कर्मभूमी. हिंदवी स्वराज्याची ही पहिली राजधानी. छत्रपती शिवाजी महाराजांनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ राजगडावर वास्तव्य केले. राजगडाची अशी महती आहे.

वेल्हा तालुक्याचे नाव ‘राजगड’ करावे, ही खरे तर जुनी मागणी. दुर्दैवाने, आत्मविस्मृती आणि धर्मनिरपेक्षतेने पछाडलेल्या सत्ताधाऱ्यांना या मागणीचे गांभीर्य समजले नाही. किंबहुना, या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. महायुती सरकारने हा निर्णय घेऊन देशभक्तीला प्रोत्साहन दिले आहे.‌ सुदैवाने, हिंदूद्वेशाचा डीएनए असलेले डावे आणि तथाकथित उदारमतवादीसुद्धा जनक्षोभाच्या भितीपोटी शांत आहेत.

राजगड नामांतरापूर्वी महायुती सरकारने अहमदनगरचे अहिल्यानगर, औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर‌‌ आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले आहे. मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे आता अस्सल देशी केली आहेत. अजूनही काही नावे बदलण्याची मागणी आहे. योग्य वेळी त्याचा निर्णय होईल, ही अपेक्षा.

प्रतिकात्मक निर्णय नाही, ही ‘स्व’ कडे वाटचाल
नामांतर हा केवळ एक प्रतिकात्मक निर्णय नाही. शतकानुशतके मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून ‘स्व’ कडे होणारी वाटचाल आहे. गेल्या दशकभरात मानसिक गुलामगिरीच्या शृंखलांतून मुक्त होण्याचे अनेक यशस्वी प्रयत्न झाले. महाराष्ट्रात त्याला अपवाद असू शकत नाही. नामांतराकडे ‘घड्याळाचे काटे उलटे फिरवणे’ या दृष्टिकोनातून बघणारे आहेत. पाश्चात्य विचारांकडून प्रेरणा घेणाऱ्या आणि मतपेढीसाठी लाचार झालेल्या समूहाकडून ‘आत्मभानाची’ अपेक्षा करणे व्यर्थ आहे. कारण आत्मभानाच्या प्रकाशापुढे हे समूह झाकोळून जाणार आहेत.

वास्तविक, हे निर्णय स्वातंत्र्यानंतर तातडीने होणे अपेक्षित होते. मात्र त्यासाठी सत्तर वर्षे वाट बघावी लागली. त्याचे अत्यंत गंभीर परिणाम देशाच्या मानसिकतेवर झाले आणि ही आजारलेली मानसिकता बाळगून आपण अंधारात चाचपडत पडलो. किंबहुना, मानसिक गुलामगिरीच्या या खुणा आपण अभिमानाने बाळगत होतो. आत्मग्लानी आणि आत्मविस्मृतीच्या खोल गर्तेत ढकलेल्या समाजात चैतन्याचा अभाव होता. त्याचा साहजिक परिणाम भौतिक प्रगतीवर आणि नैतिकतेवर झाला होता. याचे मूलभूत कारण होते. १५ ऑगस्टला आपण ब्रिटिशांकडून राजकीय स्वातंत्र्य संपादन केले. मात्र आपण ब्रिटिश प्रभावापासून दूर गेलो नाही. स्वातंत्र्य केवळ राजकीय स्वरूपाचे होते. ब्रिटिश गुलामगिरीमधून मुक्त झाल्याच्या नादात आपण गुलामगिरीत कधी गेलो, याचे विस्मरण झाले. मुहम्मद बिन कासिम आणि नंतरच्या आक्रमणांकडे लक्ष गेले नाही. ही आक्रमणे ब्रिटिशांपेक्षा अधिक खोल वार करणारी होती. ही आक्रमणे भारताच्या स्वातंत्र्यावर गदाच होती. त्याचे समाजावर गंभीर परिणाम झाले होते. ही आक्रमणे आजही चालूच आहेत. त्या अर्थाने भारत आजही स्वातंत्र्यासाठी झगडत आहे. देशाची फाळणी याच पराभूत मानसिकतेचा परिपाक होती.

हे निर्णय बदल घडवू शकतात
नामकरणासारखे निर्णय या पराभूत मानसिकतेमधे बदल घडवू शकतात. आत्मविस्मृत समाजाला आत्मभान देण्याचे सामर्थ्य या निर्णयांमध्ये आहे. हे निर्णय छोटे नाहीत. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या स्वातंत्र्य लढ्यातील मैलाचे दगड आहेत. देशभर ही प्रक्रिया चालू आहे आणि त्याचे दृश्य परिणाम दिसत आहेत. देशात नवे चैतन्य निर्माण झाले आहे. आत्मसन्मान जागृत असलेला समाजच सर्वांगीण प्रगती साध्य करू शकतो. नामकरण म्हणजे पिढ्यानपिढ्या डोक्यावर बाळगलेले ओझे फेकून देण्याची प्रक्रिया आहे.

सत्यजित जोशी
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

अन्य लेख

संबंधित लेख