Wednesday, December 4, 2024

जरांगेंनी शस्त्र ठेवली खाली ??

Share

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ३ नोव्हेंबरला निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर २४ तास उलटण्यापूर्वीच, त्यांनी ४ नोव्हेंबरला सकाळी पत्रकार परिषदेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. मात्र त्याच वेळी त्यांनी असेही स्पष्ट केले की निवडणूक लढणार नसले तरी ते उमेदवारांना समर्थन देणार नाहीत.

जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचे काही ठोस कारणे दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार मराठा समाजाच्या उमेदवारांनी एकाच जातीच्या आधारावर विधानसभेत निवडून येणे कठीण आहे. एकाच जातीवर निवडणूक लढवून विजय मिळवणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महत्वाचे म्हणजे मागासवर्गीय व मुस्लिम समाजाकडून उमेदवारांची यादी ठरलेल्या वेळेत प्राप्त झाली नाही. त्यामुळे मागासवर्गीय व मुस्लिम समाजासोबत एकत्र निवडणूक लढवण्याचे त्यांचे प्रारंभिक प्रयत्न अपूर्ण राहिले.

याआधी झालेल्या चर्चेत १४ मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करायचा निर्धार करण्यात आला होता. परंतु मित्रपक्षांनी वेळेवर यादी न पाठवल्यामुळे उमेदवारांची घोषणा करता आली नाही. केवळ एका जातीवर निवडणूक लढवणे हे मराठा समाजाच्या हिताचे नाही, असे त्यांनी नमूद केले.मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, ते कोणालाही पाठिंबा देणार नाहीत. त्यांच्या मते महाविकास आघाडी असो वा महायुती, दोन्ही गटातील नेते मराठा समाजाच्या हिताची काळजी घेत नाहीत. त्यामुळे कोणालाही निवडून आणण्याची शिफारस ते करणार नाहीत आणि प्रचारसभांमध्येही सहभागी होणार नाहीत.

सर्व समाज बांधवांनी निवडणूक लढण्याऐवजी आपापले अर्ज मागे घ्यावेत. मतदानाच्या दिवशी शांतपणे मतदान करा आणि शांत राहा, असे आवाहन त्यांनी केले.दरम्यान मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरूच राहणार असून, समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कसोशिने प्रयत्न केले जातील असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख