Tuesday, March 17, 2026

पुण्यात २० मार्चपासून ‘गौ-टेक २०२६’ आंतरराष्ट्रीय परिषद

Share

पुणे : कृषी, आरोग्य आणि भारतीय संस्कृतीचा आधार असलेल्या देशी गोवंशाचे संवर्धन, संशोधन आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी पुण्यात ‘गौ-टेक २०२६’ या आंतरराष्ट्रीय शिखर परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २३ मार्च २०२६ या कालावधीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे.

राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. वल्लभभाई कथिरिया यांनी रविवारी (दि. १५ मार्च) प्रदर्शन स्थळाच्या भूमिपूजन प्रसंगी ही माहिती दिली. ते म्हणाले, गौ-आधारित उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, नवोन्मेष आणि उद्योजकतेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या आयोजनामागील उद्देश आहे. हे केवळ एक प्रदर्शन नसून गौ-आधारित अर्थव्यवस्था आणि समाजव्यवस्था यांना केंद्रस्थानी ठेवून भारताला आत्मनिर्भर अन् संस्कारित बनवण्याच्या दिशेने एक व्यापक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभियान आहे. ‘गौ-टेक २०२६’मध्ये देश-विदेशांतून मोठ्या संख्येने धोरणकर्ते, समाजसेवक, शास्त्रज्ञ, उद्योगपती, ‘स्टार्ट-अप्स’, गुंतवणूकदार, शेतकरी, गौशाळा, विद्यापिठे, संत समाज, महिला आणि युवक सहभागी होणार आहेत.

गो-आधारित उद्योगांचे प्रदर्शन
महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी यावेळी प्रदर्शनाच्या व्याप्तीबद्दल माहिती दिली. प्रदर्शनात गोशाळा संमेलन, सेंद्रिय शेती आणि उत्पादनांच्या विक्रीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. विशेष म्हणजे, शेणापासून तयार केलेला रंग, विटा, विविध कलावस्तू आणि अत्याधुनिक दुग्धजन्य प्रक्रिया यंत्रसामग्रीचे स्टॉल हे या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण असतील.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार गती
या प्रसंगी उपस्थित असलेल्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, “देशी गोवंश संगोपनामुळे केवळ शेतीच नाही तर ऊर्जा निर्मिती आणि प्रक्रिया उद्योगांनाही मोठी चालना मिळणार आहे. शहरी ग्राहक आणि ग्रामीण उत्पादक यांना जोडण्यासाठी ही परिषद मैलाचा दगड ठरेल.”

‘जीसीसीआय’ (GCCI) आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला उद्योजक कृष्णकुमार गोयल, अण्णा भरेकर, डॉ. नितीन मार्कंडेय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पशुपालकांसाठी आयोजित विशेष चर्चासत्रामुळे हे प्रदर्शन राज्यातील शेतकऱ्यांसाठी ज्ञानाची मोठी मेजवानी ठरणार आहे.

अन्य लेख

संबंधित लेख