Thursday, March 19, 2026

वाराणसीत गंगेच्या पात्रात इफ्तारची मेजवानी; चिकन बिर्याणी खाऊन हाडे नदीत फेकणारे १४ मुसलमान तरुण गजाआड

Share

वाराणसी (उत्तर प्रदेश) : हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या आणि अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या गंगा नदीच्या पात्रात नौकेवर इफ्तार मेजवानी आयोजित करून मांसाहार केल्याचा धक्कादायक प्रकार वाराणसीमध्ये समोर आला आहे. या मेजवानीनंतर चिकन बिर्याणीचे उरलेले अवशेष आणि हाडे कचऱ्याप्रमाणे थेट गंगा नदीत फेकण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली असून, पोलिसांनी याप्रकरणी १४ जणांना अटक केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगर अध्यक्ष रजत जायसवाल यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली. पवित्र गंगा नदीत अशा प्रकारे मांसाहार करून तिचे पावित्र्य भंग करणे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे, या कारणास्तव त्यांनी रीतसर तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेत तपास केला आणि या कृत्यात सहभागी असलेल्या १४ मुसलमान तरुणांना तातडीने अटक केली.

वाराणसी महानगरपालिकेनेही या घटनेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले की, “गंगेची शुचिता आणि पावित्र्य राखण्यासाठी स्पष्ट नियमावली आहे. घाटांवर किंवा नदीच्या मध्यभागी अशी कोणतीही कृती करणे, ज्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातील किंवा स्वच्छता धोक्यात येईल, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे.”

भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी गंगेच्या पात्रात आणि घाटांवर देखरेख अधिक कडक करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. या कारवाईमुळे धार्मिक स्थळांच्या पावित्र्याशी खेळ करणाऱ्यांना मोठा संदेश गेल्याचे बोलले जात आहे.

अन्य लेख

संबंधित लेख