परळी : “माझे वडील गेल्यानंतर दादांनी मला कधीही वडील नसल्याची जाणीव होऊ दिली नाही. आज दादांच्या जाण्याने मी पुन्हा पोरका झालो आहे,” अशा अत्यंत हृदयद्रावक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांनी आपल्या लाडक्या ‘दादां’ना भावपूर्ण श्रद्धांजली वाहीली आहे.
“अजूनही वाटतंय दादांचा फोन येईल…”
धनंजय मुंडे यांनी ‘X’ (ट्विटर) वर पोस्ट करत आपल्या मनातील दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, “दादांचे अकाली निधन ही घटनाच हृदयाला न पटणारी आहे. आमचे राजकीय अस्तित्व दादांच्या जीवावर होते. अजूनही असं वाटतंय की आत्ता दादांचा फोन येईल आणि म्हणतील, ‘धनंजय वेळेवर ये बरका…’ त्यामुळे श्रद्धांजली हा शब्दच ओठावर येत नाहीये.”
विकासाचा दरारा आणि शिस्तीचा नेता
अजित पवारांच्या कार्यशैलीबद्दल बोलताना मुंडे म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाचे स्वप्न उराशी घेऊन झोपणार आणि भल्या पहाटे ती स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कामाला लागणारा हा नेता होता. वेळेचे नियोजन आणि शिस्त यातून त्यांनी विकासाचा एक वेगळा दरारा महाराष्ट्रात निर्माण केला होता.”
बीड जिल्ह्याची आणि वैयक्तिक हानी
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, “देशाची, राज्याची, पक्षाची, माझ्या बीड जिल्ह्याची आणि माझी कधीही भरून न निघणारी वैयक्तिक हानी आहे.”