कर्नाटक सरकारने रमजान महिन्यासाठी राज्यातील उर्दू शाळांच्या वेळा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. हे बदल उर्दू माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये लागू केले जातील. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी २ फेब्रुवारी सांगितले की, या सरकारच्या निर्णयाला अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण म्हणणे चुकीचे आहे.
सरकारने एक परिपत्रक जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, हा निर्णय सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित उर्दू माध्यमांच्या शाळांना लागू असेल. विद्यमान आदेशांचा आढावा घेतल्यानंतर आणि कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षण संघटना (आर), बेंगळुरू यांनी सादर केलेल्या निवेदनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी, ३१ ऑक्टोबर २००२ रोजी जारी केलेल्या स्थायी आदेशाद्वारे, राज्यातील उर्दू माध्यमाच्या कनिष्ठ प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना फक्त सकाळी ८ ते दुपारी १२.४५ वाजेपर्यंत वर्ग घेण्याची परवानगी होती. त्या स्थायी आदेशातील तरतुदींचा आढावा घेऊन आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.”

उर्दूची पाळेमुळे हिंदुस्तानातच…
उर्दूच्या उत्पत्ती बद्दल आपल्या देशात अनेक मते मतांतरे आहेत. त्यापैकी एक म्हणजे, उर्दूचा जन्म १२ व्या शतकात दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झाला. ती ‘खडी बोली’ आणि पर्शियन (फारसी) भाषेच्या संगमातून निर्माण झाली असे मानले जाते. त्याचप्रमाणे दुसरी मान्यता म्हणजे “उर्दू” या शब्दाचा उर्दू भाषेत अर्थ होतो “लष्कर”. ही भाषा बाबर याच्याबरोबर भारतात आली. बाबर १५२६ मध्ये भारतात आला आणि त्याने पानिपतच्या पहिल्या लढाईत २१ एप्रिल १५२६ रोजी इब्राहिम लोदीचा पराभव करून भारतात मुघल साम्राज्याची स्थापना केली. बाबराचे सैनिक उत्तर भारतात विशेषतः मेरठ व आसपासच्या बाजारात गेल्यावर ज्या भाषेत बोलायचे त्याला स्थानिक हिंदुस्तानी मंडळी उर्दू (सैनिक) लोगों की भाषा म्हणायचे. पुढे त्या भाषेचे “उर्दू” भाषा एव्हढेच संक्षिप्त रूप राहिले. बाबराचे सैन्य अरबस्तान पर्शिया (आजचा इराण) असा प्रवास करून भारतात आलेले असल्यामुळे त्यांच्या मूळ भाषेवर अगोदरच अरबी आणि फारसी भाषेचे संस्कार झाले होते आणि १६ व्या शतकापासून आजपर्यंत गेल्या ५०० वर्षात हिंदुस्थानातील संस्कृत आणि हिंदी या दोन भाषांचा त्याच्यावर प्रचंड प्रभाव पडला. त्यामुळे आजची उर्दू ही मूळची उर्दू लोकांची भाषा अधिक अरेबिक फारसी संस्कृत आणि हिंदी यांची बेमालूम सरमिसळ आहे. अशी मान्यता आहे उर्दूची उर दू अशी फोड करून दोन (दू) उरांना जोडणारी भाषा. (इथे उर भरून येतो त्यातला उर) अशीही व्युत्पत्ती सांगितली जाते.
उर्दू भाषेत संस्कृत प्रचूर अनेक शब्द आहेत हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. उदाहरणे सांगायची झाली तर उर्दूत देवळाला “शिवाला” म्हणतात हा “शिवालय”चा अपभ्रंश आहे. मात्र आपण शंकराच्या देवळाला शिवालय म्हणतो परंतु उर्दूतील शिवाला हे कोणत्याही देवाचे देऊळ असू शकते. संस्कृतमधील शर्करापासून शक्कर, एकम वरून उर्दूत यकम अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.
मात्र उर्दू लिपी ही अरबी किंवा फारसी लिपीच्या जातकुळीतील. उजवीकडून डावीकडे लिहिली जाणारी लिपी असल्यामुळे लिहिलेली उर्दू आपल्याला कळत नाही आणि तिथेच गडबड होते. उदाहरण दाखल खाली दिलेला अप्रतिम शेर हा उर्दू लिपीत असल्यामुळे आपल्याला वाचता येत नाही आणि त्याचा आनंदही घेता येत नाही. परंतु, तोच शेर कोणी वाचून दाखवला तर तो हिंदीच वाटतो व आपल्याला त्याचा आनंद देखील घेता येतो.
موت کو کبھی دیکھا تو نہیں, لیکن وہ ضرور حسین ہونی چاہیے
جو بھی اُسے پہلی بار ملتا ہے, کمبخت جینا ہیں چھوڑ دیتا ہے
हाच शेर जर वाचून दाखवला तर तो असा आहे,
मौत को कभी देखा तो नहीं, लेकिन वह जरूर हसीन होनी चाहिए
जो भी उसे पहली बार मिलता है, कमबख्त जीना ही छोड़ छोड़ देता है।
साहित्य, काव्य आणि शेरोशायरी यांच्या बाबतीत उर्दू ही एक संपन्न भाषा आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल. हिंदी आणि उर्दू यांच्या मिश्रणाला हिंदुस्तानी जबान म्हणतात. हिंदुस्तानी जुबानमध्ये हिंदीची औपचारिकता आणि उर्दूची क्लिष्टता टाळून भाषा बोलली जाते. बॉलीवूडमध्ये जास्त करून हिंदुस्तानी जबानचा वापर होतो.
उर्दू भाषा… भौगोलिक की धार्मिक ओळख ?

जावेद अख्तर यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक आणि पटकथा लेखक उर्दू ही उत्तर हिंदुस्तानची भौगोलिक भाषा असल्याचे ठासून सांगतात. त्यांच्या मते, उर्दू ही केवळ एक भाषा नसून ती भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. उर्दू ही पाकिस्तानची भाषा नसून ती ‘हिंदुस्तानी’ भाषा आहे. फाळणीपूर्वी ही भाषा संपूर्ण भारताची (भारतीय उपखंडाची) होती आणि तिचा उगम भारतातच झाला आहे, असे त्यांचे ठाम मत आहे. संस्कृत ही जगातील सर्वात जुन्या भाषांपैकी एक आहे, तर उर्दू ही तुलनेने तरुण भाषा असून ती संस्कृतची ‘लहान बहीण’ आहे, असेही ते स्पष्टपणे सांगतात.
मात्र हिंदी ही जशी हिंदूंची भाषा नाही. कारण तामिळनाडू केरळच्या हिंदूला हिंदी बोलता येत नाही. त्याचप्रमाणे उर्दू ही फक्त मुसलमानांची भाषा नाही. अशी त्यांची मांडणी असते. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने देखील स्पष्ट केले आहे की, “भाषा ही समुदायाची आणि संस्कृतीची असते, धर्माची नाही”.

जावेद अख्तर यांच्या या दाव्याच्या पुष्ट्यर्थ सुप्रसिद्ध गीतकार गुलजार यांचे उदाहरण देता येईल. त्यांची अनेक काव्ये ही उर्दू लिपीत लिहिलेली आहेत. उदाहरणार्थ वर दिलेले “तुमसे नाराज नही जिंदगी हैरान हूं मै” हे त्यांचे सुप्रसिद्ध गीत त्यांच्याच हस्ताक्षरात परंतु उर्दू लिपीत आपण पाहू शकतो. म्हणजे गीताचे बोल हिंदी मात्र लिपी उर्दू.
प्रेमचंद, राजेंद्र सिंह बेदी आणि कुंवर महेंद्रनाथ सिंह यांसारख्या अनेक हिंदू लेखकांनी आणि कवींनी उर्दू साहित्यात मोलाची भर घातली आहे.
इसवी सन ७१२ च्या मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणापासून ते बाबरापासून १८५७ पर्यंत उत्तर भारतातील १,१०० वर्षांच्या विविध इस्लामी राजवटींमुळे अरबी फारसी व उर्दू भाषांबरोबर या जातकुळीतील उजवीकडून डावीकडे पहिल्या जाणाऱ्या लिपीचा देखील दबदबा वाढत गेला. विशेषतः पंजाबी भाषा ही भारतातला हिंदू व शिख बांधव गुरुमुखीमध्ये लिहितो. तर आजच्या इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधला पंजाबी मुसलमान हा उर्दू सदृश लिपीत लिहितो. त्याला शाहमुखी लिपी असे म्हणतात.

फाळणीच्या वेळी सिंधमधून आलेल्या आमच्या हिंदू सिंधी बांधवांची भाषा देवनागरी सोबतच उर्दू सदृश सिंधी लिपी देखील होती. पुढे हा समाज भारतातील जनजीवनात दुधात साखर विरघळावा तसा एकरूप झाला आणि देवनागरी हीच त्यांची सिंधी भाषा लिहिण्याची लिपी उरली. मात्र आजही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या सिंधमधील हिंदू सिंधी बंधू व मुसलमान सिंधी त्यांची सिंधी भाषा उर्दू सदृश सिंधी लिपीतच लिहितात. कराचीच्या सोल्जर बाजारमध्ये उभ्या असलेल्या मारुतीच्या देवळातील पंचमुखी हनुमानाच्या अवतारावर. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या “पाकिस्तान हिंदू पंचायत” संस्थेच्या प्रश्नमंजुषेत वापरलेली उर्दू लिपी बघितली की आपल्याला हे कोडे सुटते.
“अमन की आशा”चे मृगजळ…

आपल्याकडचा टाइम्स ग्रुप आणि रावी पलीकडचा जंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आणि काँग्रेस प्रणित UPA सरकारच्या आशिर्वादाने “अमन की आशा” नावाचे मृगजळ उभे करण्यात आले. दोन्ही देशांतील व्यापार मुक्तपणे व्हावा याचबरोबर. “कलेला धर्म किंवा देशाच्या सीमा नसतात” या फसव्या घोषणेनुसार दोन्ही देशांतील कलाकरांचे कार्यक्रम एक दुसऱ्यांच्या देशात होऊ लागले. आपल्याकडे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी कलाकारांच्या कव्वाली मैफिली जलसे मुशायरे जोरात झडू लागले “अमन की आशा” साठी व्हिसाचे निर्बंध सैल झाल्यामुळे इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानी साहित्यिक कलाकार सहजपणे भारतात येऊ लागले. अमन की आशा च्या पडद्याआड न जाणो “सरफरोश” मधल्या गुल्फामसारखे (नासिरुद्दीन शाह) किती गुल्फाम भारतात येऊन गेले असतील याची गणती नाही.
नुसत्या “आतंकवादाला धर्म नसतो असे नाही तर भाषेलाही धर्म नसतो” असे अमनची आशा आम्हाला सांगत होती. वेगवेगळ्या कलाकारांच्या तोंडून वेगवेगळ्या प्रकारे… (२०१४ ला मोदी सरकार केंद्रात स्थानापन्न झाल्यानंतर अमन की आशाचे चोचले बंद झाले आणि “ब्राम्होस की भाषा” कार्यक्रम सुरू झाला.
पण भारतातील हिंदू जनमानस मात्र हे मानायला तयार नव्हता. उर्दू ही मुसलमानांचीच भाषा आहे हे आमच्या मनावर पक्के ठसले आहे आणि याला कारण देखील मुस्लिम समाजाच आहे.

१४ ऑगस्ट १९४७ रोजी इतिहासात पहिल्यांदा आमच्या प्राणप्रिय मातृभूमीचे विभाजन झाले. आमचा धर्म वेगळा आमची पूजा पद्धती वेगळी आमचे रितीरिवाज वेगळे आमची संस्कृती वेगळी. आम्ही हिंदू समाजाबरोबर राहू शकत नाही म्हणून “द्विराष्ट्रवादा”च्या सिद्धांतावर हिंदुस्थानातल्या मुस्लिम समाजाने आपल्यासाठी वेगळी भूमी मागितली.
२३ मार्च १९४० रोजी रावी नदीच्या किनाऱ्यावरील लाहोर शहरात मुस्लिम लीगचे अधिवेशन झाले आणि पहिल्या प्रथम “पाकिस्तान” या शब्दाचा उच्चार न करता मुसलमानांकरता हिंदुस्थानातील वेगळी भूमी मागण्यात आली. पाकिस्तान निर्मितीसाठी कायदे आजम मोहम्मद अली जिनांनी जसा इस्लाम धर्माचा आधार घेतला होता. तसा त्यांनी “उर्दू” या भाषेचा देखील आधार घेतला होता. पुढे ७ वर्षांनी मुसलमानांना धर्माच्या आधारावर वेगळी भूमी मिळाली. इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची स्थापना झाली आणि पाकिस्तानची राष्ट्रभाषा म्हणून उर्दू जाहीर करण्यात आली… आजही इस्लामी रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची राष्ट्रभाषा उर्दू आहे…
इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीनंतर… मार्च १९४८ मध्ये ढाका येथे भाषण करताना त्यांनी ‘उर्दू हीच पाकिस्तानची एकमेव राष्ट्रभाषा असेल’ अशी अधिकृत घोषणा केली होती… १९७१ साली याच उर्दूने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचा घात केला… उजवीकडून डावीकडे उर्दू लिहिणारे पश्चिम इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानचे मुसलमान नागरिक डावीकडून उजवीकडे बंगाली भाषा लिहिणाऱ्या पूर्व इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या आपल्याच नागरिकांना अर्धे हिंदु समजत असत… शेवटी बंगाली अस्मितेने उर्दूच्या अस्मितेवर मात केली आणि देशाचे विभाजन झाले… वेगळा बंगाली भाषिक बांगलादेश निर्माण झाला…
मात्र इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये उर्दू भाषिक म्हणजे लिहू, बोलू व वाचू शकतात अशी जनसंख्या किती आहे? तर लोकसंख्येच्या केवळ ९% कोण आहेत हे उर्दू भाषिक? तर “अपनेवालों का देश” म्हणून मोठ्या आशेने भारतातून रावीपार गेलेले. कराची व आसपासच्या हैदराबाद सारख्या शहरांमध्ये वसलेले भुकेनंगे “मोहाजीर”. आजही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानमध्ये चौथ्या दर्जाचे नागरिक म्हणून गणले जाणारे भुकेनंगे “मोहाजीर”.
बाकी पाकिस्तानच्या चारही प्रांतात आपापली म्हणजे सिंधी, पंजाबी, बलुची व पश्तू भाषा बोलली जाते. त्यांच्यातील लिपी साधर्म्यामुळे आपल्याला ती उर्दू वाटते पण तो आपला गैरसमज आहे. जसे की मराठी, हिंदी, संस्कृत व नेपाळी या चार भाषा देवनागरी लिपीत लिहिल्या जातात. आपण नेपाळी वाचू शकतो पण त्याचा अर्थ आपल्याला कळणार नाही. तशाच इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान मधल्या या सगळ्या भाषा आहेत.
मात्र उर्दू ही इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानची ‘lingua franca लिंगुआ फ्रँका’ (संपर्क भाषा) असल्याने, त्या देशातील ७५% ते ८०% पेक्षा जास्त लोक ती बोलू आणि समजू शकतात.
जर इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या निर्मितीसाठी तुम्ही उर्दू या भाषेचा आधार घेतला असेल तर भारताचे सर्वोच्च न्यायालय किंवा जावेद अख्तर काहीही म्हणोत सकल हिंदू समाज “उर्दू” ही मुसलमानांची भाषा आहे हेच समजणार कारण त्याला अनुभवच तसा येतो.
साक्षात बॉलीवूडदेखील याला साक्षीदार आहे “उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे”

१९७७ साली “अमर अकबर अँथनी” नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातला “अकबर” (ऋषी कपूर) आपल्या प्रेयसीला (नीतू सिंग) गुप्त संदेश पाठविण्यासाठी एक चिठ्ठी लिहितो. इतर कोणालाही (म्हणजे काफीरांना) कळू नये म्हणून तो ती चिठ्ठी “उर्दूत” लिहितो. त्याचा डाव यशस्वी होतो. त्यावेळी थिएटरमध्ये टाळ्या शिट्ट्यांचा गजर होतो. आता जर अकबर “उर्दूत” चिठ्ठी लिहीत असेल तर बॉलिवूडनेच आम्हाला म्हणजे चित्रपट पाहायला बहुसंख्येने आलेल्या हिंदू प्रेक्षकांना सांगितले “उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे”.


मुंबईतून इन्किलाब नावाचे उर्दू वृत्तपत्र प्रसिद्ध होते. आठवड्याचे सहा दिवस या वृत्तपत्राचे इन्किलाब हे नाव निळ्या शाईत छापले जाते. शुक्रवारी मात्र ते हिरव्या शाईत छापलेले असते. उर्दूचा आणि इस्लामचा जर संबंध नसेल तर उर्दू इन्किलाबने दर शुक्रवारी आपल्या नावासाठी हिरवी शाई वापरण्याचे कारण काय? यातून सकल हिंदू समाज काय निष्कर्ष काढणार? “उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे” हाच ना…?
इतिहासाची साक्ष “उर्दू ही मुसलमानांची भाषा आहे”

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात फारसी व दख्खनी शब्दांना पर्याय म्हणून ‘राज्यव्यवहार कोश’ (१६७६ च्या सुमारास) तयार करवून भाषाशुद्धीची चळवळ राबवली. रघुनाथ पंडित यांनी तयार केलेल्या या कोशात १३८० पेक्षा जास्त अरेबिक उर्दू फारसी शब्दांना संस्कृत/मराठी प्रतिशब्द सुचवले होते. ज्यामुळे हिंदवी स्वराज्यात स्वभाषेचा (मराठी/संस्कृत) वापर वाढला आणि स्वराज्याला भाषिक स्वातंत्र्य मिळाले. म्हणजे अरेबिक उर्दू किंवा फारसी या आमच्या भाषा नाहीत. या इस्लामी सल्तनतींच्या पर्यायाने मुसलमानांच्या भाषा आहेत. हेच छत्रपतींनी दाखवून दिले नाही काय…?
आणि आता तर कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने रमजानच्या काळात राज्यातील उर्दू शाळांची वेळ बदलून “उर्दू ही मुसलमानांची भाषा” असल्याच्या सकल हिंदू समाजाच्या धारणेवर शिक्कामोर्तब केले आहे. (वर निर्लज्जपणे “सरकारच्या या निर्णयाला अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण म्हणणे चुकीचे आहे” अशी मखलाशी करणे फक्त काँग्रेसलाच शक्य आहे. खाई त्याला खवखवे)
उर्दू ही जर मुसलमानांची भाषा नसेल तर रमजानच्या काळात उर्दू शाळांची वेळ बदलण्याचे कारणच काय? काँग्रेसने जावेद अख्तर यांनी किंवा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने याचे उत्तर द्यावे…
सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है ।
न हाथी है ना घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना है ॥
– पराग नेरूरकर