महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) बंदी घातलेली दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याच्या आरोपावरून मोहम्मद हसन अबू सरमद अख्तर (वय ३३) याला अटक केली आहे. खात्रीशीर माहितीच्या आधारे माहीम मेट्रो स्थानकाजवळ ही कारवाई करण्यात आली. सध्या तो ATS च्या कोठडीत आहे.
रॅपिडो रायडर आणि अत्तर विक्रेता
ATS च्या माहितीनुसार, आरोपी मुंबईत रॅपिडो रायडर म्हणून काम करत होता. तसेच तो अत्तर विक्रीचा व्यवसायही करत होता. या कामाच्या आडून तो कट्टरतावादी विचारांचा प्रसार करत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
पाकिस्तानी हँडलर्सशी टेलिग्राम संपर्क
तपासात असे समोर आले आहे की, आरोपी टेलिग्रामवर पाकिस्तानातील काही हँडलर्सच्या संपर्कात होता. त्यात एका गुप्तचर संस्थेच्या एजंटचाही समावेश आहे. या संपर्कांचे स्वरूप, त्यातून झालेली देवाणघेवाण आणि त्यामागील उद्देश याचा ATS तपास करत आहे.
अख्तर हा अशा एका गटाचा भाग होता, जो हिंदू मित्र असलेल्या मुस्लिम मुलींना लक्ष्य करत असे. याशिवाय सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यातील सुरक्षा त्रुटीची बातमी व्हायरल झाली होती. त्यावेळी आरोपीने सोशल मीडियावर “मोदींनाही इंदिरा गांधींसारखीच वागणूक द्यायला हवी” असा मेसेज केला आहे. आरोपीच्या इन्स्टाग्राम खात्यावरील हालचालींचीही तपासणी सुरू आहे.

आरोपीचे इतर साथीदार, देशातील संभाव्य संपर्क, आर्थिक व्यवहार आणि मोबाईल-डिजिटल उपकरणांमधील माहिती तपासली जात आहे.