Friday, October 18, 2024

१९५८ महाविद्यालयांचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रासाठी अर्ज दाखल – मंगल प्रभात लोढा

Share

मुंबई : राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची (Acharya Chanakya Skill Development Center) स्थापना करण्यात येणार असून, आतापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. येणाऱ्या काळात अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेणार असल्याचे, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

मंत्री लोढा म्हणाले की, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रावर ऑगस्टपासून प्रशिक्षण कार्यक्रम सुरु होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक-युवतींना महाविद्यालयांमध्येच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी “आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यातील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. प्रत्यक्षात १९५८ महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे अर्ज दाखल केले आहेत, ही बाब सकारात्मक आहे.

मंत्री लोढा म्हणाले की, प्रत्येक कौशल्य विकास केंद्रात प्रतिवर्षी साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे संपूर्ण राज्यात प्रतिवर्षी साधारण १,५०,००० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण मिळणार आहे. या योजनेसाठी १५ ते ४५ वयोगटातील सर्व युवक-युवती पात्र आहेत. कालसुसंगत तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षण महाविद्यालयीन युवक युवतींना देऊन त्यांना रोजगारासाठी सक्षम बनवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. रोजगार मागणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे युवक घडावेत, यासाठी राज्य आणि केंद्र सरकार काम करत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख