Sunday, February 8, 2026

“निःस्वार्थी कामाच्या मागे समाज निश्चितपणे उभा राहतो”

Share

“समाजाच्या नेमक्या गरजा काय आहेत ते ओळखून त्यासाठी काम करणे आवश्यक आहे. एखाद्या संस्थेला किंवा एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या कार्यक्षेत्रात काम करायचे म्हणून नव्हे, तर समाजाच्या गरजांवर आधारित काम उभे केले पाहिजे. निःस्वार्थीपणे काम उभे करणाऱ्याच्या मागे समाज निश्चितपणे उभा राहतो,” असा विश्वास ज्येष्ठ कार्यकर्त्या साधिका प्रव्राजिका विशुद्धानंदा तथा भारतीताई ठाकूर यांनी व्यक्त केला. 

पुण्यात नातू फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात भारतीताई ठाकूर यांच्या हस्ते ‘महादेव बळवंत नातू पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. रायगडमधील प्रमोद आणि रंजना करंदीकर यांना ‘महादेव बळवंत नातू पुरस्कार’ तर मध्यप्रदेशमधील खरगोन जिल्ह्यातील दिग्विजयसिंह चौहान यांना ‘सुलोचना नातू सेवाव्रती कार्यकर्ता’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. नातू फाउंडेशनचे विश्वस्त चंद्रशेखर यार्दी, अभया टोळ आणि विवेक गिरिधारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या पुरस्कारांचे स्वरूप अनुक्रमे एक लाख एकावन्न हजार रुपये आणि पंचाहत्तर हजार रुपये, शाल व स्मृतीचिन्ह असे आहे.


भारतीताई ठाकूर म्हणाल्या, “सामाजिक कार्यकर्त्याच्या अंगी लोकसंग्रह करता येण्याचे कौशल्य असणे खूप गरजेचे आहे. कारण त्यातून कामासाठीचे प्रत्यक्ष गट तयार होणे शक्य होते. म्हणून लोकसंग्रह हा प्रत्येक कार्यकर्त्याने सर्वप्रथम शिकण्यासारखा गुण आहे. जितका लोकसंग्रह जास्त तितके सामाजिक काम वाढत जाते.” कोणत्याही सामाजिक संस्थेची समाजाला गरजच लागू नये इतका तो समाज पुढे जावा, उन्नत व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. वनवासी कल्याण आश्रम आणि नंतर शबरी सेवा समिती या माध्यमातून गेली ४४ वर्षे सेवा भावनेतून कार्य करणाऱ्या प्रमोद आणि रंजना करंदीकर या दांपत्याने वनवासी, जनजाती समाजात बालकांचे कुपोषण व बालमृत्यू थांबवण्यासाठी केलेल्या कामाची सविस्तर मांडणी केली. त्याचबरोबरीने आदिवासींचे सामूहिक विवाह, बालवाडी, अभ्यासिका, फळबाग लागवड, विहीर खोदाई आणि उपसा सिंचन योजना आदी विविधांगी उपक्रमांची तसेच कार्याचीही माहिती दिली. अभावग्रस्त जाती जमातींमधील आणि प्रामुख्याने गरीब मुलांसाठी निमाड अभ्युदय संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिग्विजयसिंह चौहान यांनी मनोगत व्यक्त करताना दिली.


विविध संस्थांनाही निधी प्रदानकार्यक्रमात नातू प्रतिष्ठानतर्फे छात्र प्रबोधन, पुणे (१० हजार), श्रीसमर्थ वाग्देवता मंदिर, धुळे (२० हजार), लोकसेवा परिवार, सातारा, काकासाहेब आठवले वसतिगृह, कोल्हापूर, विवेकानंद केंद्र, पिंपळद, जि. नाशिक, संस्कार संजीवनी फौंडेशन, सोलापूर (प्रत्येकी ५१ हजार) आणि वर्धिष्णू, जळगाव, साने गुरुजी रुग्णालय, किनवट, विदर्भ वनवासी कल्याण आश्रम, गडचिरोली, श्रीगुरुजी रुग्णालय, नाशिक (प्रत्येकी १ लक्ष) या संस्थांना अध्यक्षांच्या हस्ते समारंभपूर्वक निधी प्रदान करण्यात आला. प्रा. अभयाताई टोळ यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन विवेक गिरीधारी यांनी केले.  बँक ऑफ महाराष्ट्र ट्रस्टी कंपनीचे अमेय कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.

अन्य लेख

संबंधित लेख