Sunday, November 24, 2024

वसंतोत्सव आणि भारतीय परंपरा – भाग १

Share

वसंत म्हणजे निसर्गाचा उत्सवी आनंदसोहळा. या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते निसर्गातूनच. वसंतोत्सव आणि भारतीय परंपरा यांची ओळख करून देणारी ही लेखमाला.

वसंत म्हणजे ॠतूचक्रामधील सुरुवातीचा ऋतू ! शिशिरातील पानगळतीनंतर मोहोर, नवपालवी देणारा ऋतू – त्या अर्थाने चैतन्य, नव-जीवन आणणारा ऋतू. म्हणूनच तो सर्वकालीन सर्वप्रिय असावा. भारतासारख्या अतिविशाल देशात, प्राकृतिक वैविध्यामुळे, निरनिराळ्या दिनदर्शिकांनुसार वसंत ऋतूच्या कालमानात थोडा फरक दिसतो. काही ठिकाणी माघ – फाल्गुन, काही ठिकाणी फाल्गुन – चैत्र तर काही ठिकाणी चैत्र – वैशाख या महिन्यांमध्ये वसंत मानला जातो. असे असले तररही सर्वसाधारणपणे वसंताची चाहुल उत्तरायण सुरू झाल्यावर थोड्याच दिवसांनंतर, माघाच्या महिन्यापासूनच लागायला लागते. वसंत पंचमी म्हणजेच माघ शुद्ध पंचमी पासून वसंतोत्सव सुरू होतो याला मान्यता असल्याचे दिसते.

निसर्गाची रंगीत, लक्षेवधी रूपे
वसंत म्हणजे निसर्गाचा उत्सवी आनंदसोहळा. मुळातच उत्सवप्रिय असलेले आपण सण, उत्सव साजरे करण्यासाठी निमित्तच शोधत असतो म्हणा ना ! या काळात येणाऱ्या उत्सवी दिवसांची प्रेरणा मिळते निसर्गातूनच. सगळ्या आसमंतातच या दिवसांमध्ये निरनिराळ्या रंगांची उधळण झालेली दिसते. निसर्ग नेहेमीच सुंदर असतो पण या काळात, विशेषतः वसंत ऋतूच्या चाहुलीनंतर त्याची अनेक रंगीत आणि लक्षवेधी रूपे बघायला मिळतात. पळस, पांगारा, सावरी, शाल्मली या काळात फुलून येतात. केशरी, पिवळा, गुलाबी, लाल अशा अनेक रंगछटांनी जणू निसर्गाची रंगपंचमीच सुरू होते.

वसंत – नवीनतेचा, चैतन्याचा, यौवनाचा ऋतू !
सहाजिकच या काळात भारतभर अनेक उत्सव साजरे केले जातात. आणि ही परंपरा अगदी जुन्या काळापासूनची आहे. प्राचीन काळात मानव निसर्गाच्या अधिक सानिध्यात होता व सभोवतालच्या निसर्गक्रमाप्रमाणे, ऋतूचक्राप्रमाणे एकूणच सगळे व्यवहार चालत असल्याने, सर्व प्रकारची व्रते, सण, उत्सव या अनुषंगानेच आखण्यात आलेले दिसतात. वसंतोत्सव, मदनोत्सव, होळी, रंगपंचमी असे कितीतरी उत्सव या दिवसांमधे येतात. यातील बहुतेक उत्सवांची अधिष्ठात्री देवता म्हणजे मदन कामदेव! अर्थात, या उत्सवांमध्ये कृष्ण, सर्व कला विद्याची देवी सरस्वती, या देवतांचे महत्त्व आहेच. ज्याप्रमाणे वसंत पंचमीला मदन कामदेवाचा जन्म झाला अशी मान्यता आहे, त्याचप्रमाणे देवी सरस्वतीचा जन्मदिवस सुद्धा याच दिवशी असल्याचे मानतात. याच दिवसाला श्री पंचमी असेही म्हटले जाते. कारण श्री लक्ष्मीसुद्धा याच दिवशी प्रकट झाली. वसंतोत्सवाची सुरुवात करणारा हा दिवस त्यामुळेच अत्यंत शुभ मानला जातो. प्राचीन काळी या दिवशी ’सुवसंतक’ नावाचा उत्सव साजरा केला जात असे. या उत्सवाचा संदर्भ अगदी कामशास्त्र या ग्रंथातही येतो.

काही ठिकाणी वसंत पंचमीला नवान्नेष्टी करतात. नवीन आलेल्या धान्याच्या लोंब्या आणून घरी देवतांना वाहतात. देवतांना अर्पण करून नवीन धान्य, फळे वगैरे खाणे सुरू करतात. अर्थात नवान्नेष्टीचा हा कार्यक्रम देशाच्या निरनिराळ्या भागात तयार होणाऱ्या पिकांप्रमाणे व त्यांच्या उपलब्धीच्या वेळेप्रमाणे बदलतो.

आरती बि. कुलकर्णी
(लेखिका भारतीय विद्येच्या संशोधक आणि अभ्यासक आहेत)

अन्य लेख

संबंधित लेख