Sunday, November 24, 2024

सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

Share

मुंबई : ‘स्वच्छता ही सेवा’ या राज्यस्तरीय अभियानाचा आज मुंबईतील (Mumbai) गिरगाव चौपाटीवर शुभारंभ पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वतः कचरा उचलून या अभियानात प्रत्यक्ष सहभाग घेतला. “सफाई कर्मचारी हा मुंबईचा खरा हिरो आहे,” असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि मुंबई महानगरपालिकेचे हजारो कर्मचारी उपस्थित होते.

आजपासून सूरु होत असलेले हे अभियान पुढील पंधरा दिवस चालणार असून २ ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी जयंतीला त्याचा समारोप होणार आहे. या अभियानात राज्यातील नागरी व ग्रामीण भागात ‘ स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता ‘ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.

“२०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू करून देशाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले होते. त्यानुसार मुंबईत डीप क्लिन ड्राइव्ह हा उपक्रम सुरू करून संपूर्ण शहर स्वच्छ करण्यात आले. मुंबईतील अनेक संस्था आणि संघटनांनी त्यात सहभाग घेतला. मुंबईसह राज्यातील वाढते तापमान आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्यात येत आहेत. आता सुरू होणाऱ्या ‘स्वच्छता ही सेवा’ हे अभियान एक चळवळ म्हणून हाती घेऊन संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल,” असे सांगून या मोहिमेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.

“स्वच्छता ही सेवा अभियानाच्या उपक्रमाद्वारे रेड्युस, रियूज, रिसायकल केंद्र उभारून पर्यटनस्थळावर शून्य कचरा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांअंतर्गत वृक्षारोपन आणि सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर नियमित स्वच्छ न होणारी ठिकाणे शोधण्यात आली असून, अशी ठिकाणे कायमस्वरूपी स्वच्छ राहतील याकरिता त्रिसूत्री नियोजन करण्यात आले आहे. यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.” असं त्यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, “स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही. या अभियानात महाराष्ट्राचा देशात पहिला नंबर लागला आहे. या अभियानांतर्गत मुंबई महानगरपालिकेने दीड लाख झाडे पावसाळ्यात लावली आहेत. या अभियानामध्ये 9359 कार्यक्रमाची नोंदणी झाली असून सीटीयू (क्लिनलीनेस टार्गेट युनिट) अंतर्गत 4520 ठिकाणे शोधली असून या ठिकाणचा कचरा उचलला जाणार आहे. याकरिता जनसहभागाचे 4111 कार्यक्रम राबविले जाणार आहेत,” असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अभियानांचा शुभारंभ झाल्यानंतर गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्र्यांनी स्वत: स्वच्छतेची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टर चालवून मशीनद्वारे कचरा संकलन केले. त्याचबरोबर ‘करूया वाईट विचार नष्ट, स्वच्छ करूया आपला महाराष्ट्र’ असा संदेश फलकावर लिहून त्याखाली स्वाक्षरी केली.

अन्य लेख

संबंधित लेख