Sunday, October 20, 2024

जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीने केली ओसामा बिन लादेनची डॉ. अब्दुल कलाम यांच्याशी तुलना; ऋता आव्हाड यांनी उधळली मुक्ताफळे

Share

ठाणे, महाराष्ट्र – राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी दहशतवादी ओसामा बिन लादेनची तुलना भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी करून राजकीय वादाला तोंड फोडले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानसभा मतदारसंघातील मुंब्रा या मुस्लिम बहुल भागामध्ये एका शैक्षणिक कार्यक्रमात बोलताना रुता आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना ओसामा बिन लादेन याचे आत्मचरित्र वाचण्यास सुचविले. तसेच तो जन्मजात दहशतवादी नव्हता तर समाजाने त्याला दहशतवादी बनविले असेही तारे तोडले. सर्वात कहर म्हणजे ऋता आव्हाड यांनी चक्क ओसामाची तुलना डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी केली.

हे वादग्रस्त विधान त्वरीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरले. समाजातील अनेक घटकांकडून याचा निषेध व्यक्त करण्यात आला. भाजप नेते शेहजाद पूनावाला यांनी या टीकेवर हल्ला केला आणि त्यांची भारत विरोधी गट अशी तुलना करून दहशतवादाबद्दल सहानुभूती बाळगत असल्याचा आरोप केला. “ही फक्त जीभ घसरलेली नाही; ही विरोधी पक्षातील एक धोकादायक मानसिकता प्रतिबिंबित करते,” पूनावाला यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वरील पोस्ट मध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या.

गदारोळा नंतर ऋता आव्हाड यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असा दावा केला की त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यासाठी व्हिडीओ संपादित करण्यात आला होता. मला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करायचे होते असे त्यांनी एका व्हिडिओ संदेशात स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.


डॉक्टर कलाम यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वाला विज्ञान आणि शिक्षणातील त्यांच्या योगदानासाठी गौरवले जाते. मात्र आव्हाडां सारख्या राजकीय व्यक्तींच्या बेलगाम बोलण्यामुळे त्यांच्या कार्याचे अवमूल्यन होत आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप या विषयावर औपचारिकपणे भाष्य केलेले नाही. तसेच एरव्ही अशा विषयांवर विरोधकांना शिंगावर घेण्याची संधी न सोडणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतीत मात्र सोयीस्करपणे मौन राखणे पसंत केले आहे असे दिसते.

अन्य लेख

संबंधित लेख