Thursday, January 2, 2025

लाडकी बहीण योजना सतत सुरु राहणार, महिलांना टप्प्या-टप्प्याने मिळणार अधिक लाभ; मुख्यमंत्री शिंदे यांचा शब्द

Share

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinaga) येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’ अंतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

लाडकी बहीण योजनेचे प्रधानमंत्री यांच्याकडून कौतुक

‘महिलांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचा लाभ दिला जात आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यापूर्वी तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. गरिबीची जाणीव असल्याने या सरकारने गोरगरीब महिलांच्या संसाराला मदत करण्यासाठी ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. सुमारे अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. या योजनेतून मिळणाऱ्या रक्कमेतून काही महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय सुरु केले असून त्यामधून रोजगार आणि आर्थिक उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. या महिला स्वतःच्या पायावर उभा राहिल्या आहेत,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले आहे. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्राचे कार्य हे देशासाठी दिशादर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्य शासनाचे कौतुक केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी पुरेशी तरतूद केली असून ही योजना बंद होणार नाही, उलट भविष्यात लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कृषिपंपांसाठी शून्य वीज बिलामुळे शेतकऱ्यांना लाभ

‘शेतीसाठी साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. जवळपास ४५ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला असून त्यांचे वीज बिल शून्य झाले आहे. युवकांना रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. यामधून प्रशिक्षण काळात त्यांना सहा हजार ते दहा हजार रुपये विद्यावेतन दिले जात आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत असून यामधून उभा राहणाऱ्या उद्योगांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल. रोजगार निर्मिती होईल. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून वयोवृद्ध नागरिकांना विविध उपकरणे खरेदीसाठी तीन हजार रुपयेपर्यंत सहाय्य करण्यात येणार आहे,’ असे यावेळी ते म्हणाले.

शासनाच्या योजनांमुळे सर्वसामान्यांना आधार

प्रधानमंत्री मोदीजींनी ठाणे आणि मुंबईतल्या ३३ हजार कोटींपेक्षा जास्तीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली आहे. शेंद्राच्या ऑरिक सिटीचं नाव तर जगभर गाजायला सुरुवात झाली आहे. टोयाटो किर्लोस्करचा २० हजार कोटींचा प्रकल्प तिथे होत आहे. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुलीसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशा अनेक योजना सर्वसामान्यांना आधार देणाऱ्या ठरल्या असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

अन्य लेख

संबंधित लेख