अशा प्रकारच्या प्रतिक्रियेबद्दल आपण नीट विचार करायला हवा.
अश्या योजना असाव्यात किंवा नाहीत याचा विचार करतांना या पत्रात ज्या असहिष्णूतेने लाडक्या बहिणीबद्दल विचार मांडलाय त्याचे समर्थन आपण कसे करणार? त्या आपल्या समाजाचाच भाग आहेत ना?
सरकारवर टिका करतांना आपण त्यांच्याबद्दल असे असंवेदनशील कसे होऊ शकतो??
विचारात घेण्याजोग्या काही गोष्टी –
- ज्यांना या योजनांचा लाभ मिळतोय तो वर्ग आपल्या पण घराघरात आहे, तो हा लाभ मिळाल्याने खरंच सरसकट बेफाम झालाय का?
- दोडकीला नोकरीवर जाण्यास जो त्रास होतो तो लाडकी पेक्षा वेगळा असला तरी दहा घरी काम करायला जातांना लाडकी काय चार्टरने जाते का?कि तिच्यासाठी सरकारने वेगळे रस्ते निर्माण केलेत?
- दोडकी जशी गरोदर राहू शकते तशी लाडकी पण कधीतरी राहतेच ना? यातल्या काही दोडक्यांना तरी नक्कीच मॅटर्निटी लिव्ह मिळते तशी या लाडकीला मिळते का?
- बोनस मिळालाच पाहीजे आणि तो मिळाला कि मनाजोगती पैठणी खरेदी करेन किंवा यावेळी एखादा दागिना खरेदी करेन असे दोडकीला वाटते तसे लाडकीला एखादे वेळी महागडी साडी घ्यावीशी वाटणे म्हणजे गुन्हा आहे का?
- दोडकीला 7वा वेतन आयोग, बोनस देणे हे सरकार चे कर्तव्यच आहे, तसे असंगठीत क्षेत्रातील लाडकीचे जीवनमान उंचावणे हे कर्तव्य नाही का? लाडकीमुळे सरकार वर बोजा पडतो तसे पेन्शनची मागणी करतांना पण पडतोच ना?
- सगळ्यांना न्याय मिळावा, सोयी सुविधा मिळाव्यात ही मागणी योग्यच आहे, पण ती मागतांना सरळ मागता येते त्याकरिता ‘लाडकी’ ला वेठीस का धरताय?
- लाडकीचे जीवन इतके सुखाचे वाटत असेल तर दोडकीला पण तसे जगायला कुणी मनाई केली आहे,असे म्हंटले तर चालेल का?
- आम्ही महाराष्ट्रातील काही लाभार्थ्यांच्या मुलाखती घेतल्यात. बहुतेकांनी त्यातून मुलांच्या फिया भरणे,प्रलंबित ट्रीटमेन्ट घेणे, अशाप्रकारची कामं केलीत. एकीने तर सांगीतले की तिच्या मुलीने तिला आग्रह करून तिला आता तरी तु यातून सॅनिटरी नॅपकीन घे असे म्हणून ते घ्यायला लावले. आणि ही सगळी उदाहरणं काल्पनिक नाहीत, याची पण नोंद घेतली पाहीजे.
- या सगळ्यात लाडकी विरुद्ध दोडकी अशी फूट यातून आपण समाजात जी पाडतो आहे तो अधिक गंभीर विषय आहे, हे परत एकदा लक्षात घेतले पाहिजे.
मनीषा कोठेकर