Thursday, October 24, 2024

निलेश राणे यांच्या हाती धनुष्यबाण; कोकणात महायुतीची शक्ती वाढली

Share

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पार पडलेल्या महायुतीच्या महामेळाव्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृतपणे प्रवेश केला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हाती धनुष्यबाण देत त्यांचे पक्षात स्वागत केले. त्यांच्या येण्याने कोकणात शिवसेना अधिक भक्कम झाल्याचे मत याप्रसंगी शिंदे यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, शिवसेनेचे राजापूर मतदारसंघातील उमेदवार किरण सामंत, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे तसेच शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी आणि आरपीआय महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी एकनाथ शिंदे बोलतांना म्हणाले, “खासदार नारायण राणे यांनी निलेश यांच्या शिवसेना प्रवेशासाठी होकार दिल्याबद्दल आभार मानले, तसेच त्यांनी जिथून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली त्या शिवसेनेत निलेशचा प्रवेश झाल्याने एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशामुळे कोकणात महायुती अधिक भक्कम झाली असून ज्या कुडाळ शहराने राणे साहेबांना २६ हजारांचे मताधिक्य मिळवून दिले ते आता ५२ हजार झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास यासमयी व्यक्त केला.”

ते पुढे म्हणाले, “शिवसेना वाचवण्यासाठी दोन वर्षापूर्वी मी उठाव केला आणि त्याला ५० आमदारांनी साथ दिली आजही ते सर्व आमदार माझ्यासोबत असल्याचा सार्थ अभिमान असल्याचे मत व्यक्त यावेळी व्यक्त केले. आमच्यावर टीका करणारे आज मला मुख्यमंत्री करा करा म्हणत दारोदारी भटकत आहेत, मात्र यांचा चेहरा मित्रपक्षांना चालत नाही तो महाराष्ट्राला कसा चालेल,” असे मत व्यक्त केले.

“कोकणचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केला. कोकणात अनेक उद्योग आणले. दिघी बंदराच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक होत आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. तसेच कोकणातील प्रवास जलदगतीने व्हावा यासाठी मुंबई – सिंधुदुर्ग ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करत असून त्यांचा डीपीआर आणि टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचे याप्रसंगी सांगितले. त्यामुळे कोकणवासीयांच्या आयुष्यात सुखाचे क्षण यावे यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील,” असल्याचे यासमयी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे आगामी निवडणुकीत निलेश राणे, नितेश राणे, दीपक केसरकर आणि किरण सामंत या महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित कोकणवासीयांना केले.

अन्य लेख

संबंधित लेख