Saturday, October 26, 2024

सरन्यायाधीश चंद्रचूड, रामजन्मभूमी आणि सेक्युलॅरिजम 

Share

काही दिवसांपूर्वी भारताचे सरन्यायाधीश चंद्रचूड एका सभेत बोलताना अयोध्येतील रामजन्मभूमीच्या न्यायदानाबद्दल बोलताना म्हणाले की “सतत तीन महिने या खटल्यावर आम्ही विचार करत होतो. शेकडो वर्षे ज्यावर तोडगा निघाला नव्हता, असे काम माझ्यासमोर आले होते आणि मला काय करावे हे सुचत नव्हते. तेव्हा मी  देवाला म्हटले की  तूच आता मला मार्ग दाखव. जर आपला विश्वास असेल, श्रद्धा असेल तर भगवानच आपल्याला मार्ग शोधून देतात.”

खरंतर हे विधान चंद्रचुडांनी गावातील देवीच्या दर्शनानंतर गावकऱ्यासमोर केले,पण काहींनी त्यावरूनही त्यांना झोडपणे सुरु केले. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंना झोडपणे आणि मुस्लिमांचे लांगूलचालन करणे, हा ज्यांचा एकमेव कार्यक्रम आहे ,त्यांनी आता भलतीच दिशाभूल करणारी विधाने करत भारताच्या सरन्यायाधीशांच्या अंगणातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. ‘सिद्धार्थ वरदराजन’ नावाच्या तथाकथित ‘विचारवंताने’ तर सरन्याधीशांच्या वक्तव्यावर टीका करताना ताळतंत्र सोडून बिनबुडाची विधाने करत आता भारतातील न्याय व्यवस्थेलाच वेठीला धरले आहे. आपण किती मुद्देसूद टीका करत आहोत हे दाखवण्यासाठी या माणसाने नुकताच एक लेख लिहून त्यात क्रमशः एक, दोन, तीन असे आकडे घालून पाच मुद्दे दिले आहेत. खरंतर यांची दाखल घेतली पाहिजे इतकी काही त्यांची लायकी नाही. पण ‘म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो’ हे  लक्षात घेता त्यांच्या मुद्यांचा थोडक्यात परामर्श घ्यावासा वाटला, म्हणून हे लेखन!   

खरेतर रामजन्मभूमीचा खटला सामंजस्याने सोडवला गेला, हे भारतातील न्याय व्यवस्थेचे खूप मोठे यश आहे. पण धर्म निरपेक्षतेची झूल अंगावर चढवलेल्या आपल्या फेक्युलर समाज माध्यमांना या निमित्ताने सरकारवर आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर आणि त्या अनुषंगाने सनातन धर्मावर कोरडे ओढण्याची संधी मिळाली. त्यामुळे या ‘खटल्याचा निकाल देण्यापूर्वी मी परमेश्वराला शरण गेलो’ या एका वाक्याने मिळणारी संधी साधायचा त्यांनी प्रयत्न केला. ‘जणूकाही देवानेच हा निर्णय दिला कारण ‘देवाला’ त्याचे मंदिर हवे होते.’ ‘एक मंदिर दिले की आपल्याला आणखी मंदिरे मिळतील असे देवाला वाटत असावे’; अशी अश्लाघ्य टीका हे गृहस्थ करतात. देव भावाचा भुकेला आहे, ही समस्त हिंदूंची श्रद्धा आहे, हे त्यांच्या खिजगणतीतही नसावे बहुदा. 

मुळात चंद्रचूड यांचे हे भाषण मराठीत होते. काय म्हणाले ते? ‘देवा मला मार्ग दाखव’. अनेकदा एखादी समस्या आपल्यासमोर आल्यावर ‘काय करावे?’ असा आपल्याला प्रश्न पडतो तेव्हा आपण शांतपणे डोळे मिटून बसतो. अशी शांतता देवघराशिवाय कुठे मिळणार? देवासमोर डोळे मिटून बसणे – आपण त्याला ध्यान लावणे म्हणतो. या ध्यानावस्थेत अनेक न सुटलेल्या कोड्यांची आपल्याला उत्तरे सापडतात,असा सनातन धर्माचे पालन करणाऱ्यांचा  अनुभव असतो. चंद्रचूड यांनी तेच केले. ते म्हणाले, ‘देवा मला मार्ग दाखव’. आता, ‘देवा मला मार्ग दाखव’ आणि ‘देवा तूच न्याय दे’ या वाक्यांमध्ये काही फरक आहे की नाही? मुळात मराठी नीट  समजत नाही आणि हिंदूंच्या देव-धर्माच्या कल्पना समजून न घेता त्या कल्पनांवर स्वतःला पुरोगामी ठरविण्यासाठी वाटेल तशी टीकेची झोड उठवून येथील सर्वसाधारण हिंदूंचा बुद्धिभेद करायचा हा यांचा आवडता कार्यक्रम आहे.चंद्रचूड यांचे हे भाषण म्हणजे सर्वांसाठी धोक्याची घंटी आहे, असे यांना वाटते. त्यासाठी त्यांनी पाच मुद्दे पुढे केले आहेत.  

फेक सेक्युलरिज्म 
आपल्या पहिल्या मुद्यात हे महाशय म्हणतात, ‘मुळात अयोध्या मामल्यावर त्यांना तोडगा सापडलाच नाही. त्यांनी न्याय दिला नाही, तर सगळ्यात शक्तिमान पक्षाने तेथील मशीद पाडून कायदा पायदळी तुडवला होता, त्याला मान्यता दिली होती. तिथे मुस्लीम प्रार्थना करत होते की नाही, हा वादाचा मुद्दाच नव्हता, एका व्यक्तीची किंवा समाजाची जागा बळजबरीने काबीज करायचा हा मुद्दा होता. त्यांना नंतर पाच एकर जागा देऊ करणे याला न्याय म्हणता येणार नाही. जमीन हडपण्यासाठी लुटारूंनी केलेले हे कारस्थान आहे.’

वास्तविकतः त्या ठिकाणी मुस्लिमांनी आक्रमण करून मंदिर पाडून मशीद बांधली हे पुराव्याने सिद्ध झाले आहे. मुस्लीम तेथे नमाज अदा करत नाहीत आणि हिंदू मात्र तेथे पूजा करण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी नियमित जातात; ही वस्तुस्थिती असताना हिंदूंनी मुसलमानांची जमीन हडपली असे धादांत खोटे विधान करून या नावापुरत्या सिद्धार्थ असणाऱ्या ‘ठगाला’ काय साधायचे आहे?

‘बळी तो कान पिळी’ हेच येथे सिद्ध झाले’ असे म्हणून हा माणूस हिंदूंच्या सहनशीलतेवर फक्त दुगाण्या झाडतो. तेथील मंदीर पाडून मशीद बांधणाऱ्या आक्रमकांना मात्र ‘बळी तो कान पिळी’ असे म्हणून त्यांनी येथील मूळ समाजावर अन्याय केला, असे याला वाटत नाही. अयोध्येत मशीद बांधायला काय दुसरी जागा नव्हती? आचरटासारखे मुद्दे उपस्थित करायचे आणि आपली शेखी मिरवायची हेच यांचे कर्तृत्व आहे, दुसरे काय? 

1991 चा कायदा 
दुसऱ्या मुद्यात हा माणूस १५ ऑगस्ट १९४७ मध्ये धार्मिक स्थळांची जी स्थिती होती तीच कायम ठेवण्यासाठी १९९१ मध्ये केलेल्या कायद्याचा उल्लेख करतो. ज्या देशाला हजारो वर्षांची धार्मिक परंपरा आहे, त्या देशातील नागरिकांसाठी असे बंधनकारक कायदे करणे व तेही १९४७ मध्ये भारताचे लचके तोडून वेगळे मुस्लीम राष्ट्र झाल्यावर, हाच येथील हिंदुंवर खरंतर मोठा अन्याय होता. या अन्यायाचे परिमार्जन तर दूरच राहिले उलट त्यांनाच ठग, लुटारू म्हणणे आणि जे मुळात ठग आहेत त्यांचे लांगुलचालन करणे; हाच यांच्या पुरोगामित्वाचा निकष असेल तर कोणताही विचारवंत – अगदी भारताचे सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती असले तरी त्याला विरोध करणारच! 

या निर्णयामुळे भारतातील असंख्य विनाशकारी हिंदू संघटनांना रान मोकळे मिळाले आहे असा या महाशयांचा आरोप आहे. त्यासाठी ते आता ‘त्यांचे देवच त्यांच्या मदतीला येतील’ असे कुत्सितपणे लिहितात. होय. आम्ही हिंदू आहोत आणि आमच्या देवावर आमची श्रद्धा आहे. आमची जी पवित्र मंदिरे या लोकांनी पाडून तेथे त्याच सामुग्रीतून स्वतःची प्रार्थना स्थळे बांधली, ती काही येथील हिंदूंना त्यांच्या धर्माची शिकवण देण्यासाठी नव्हे;तर  युद्धात पराभूत झालेल्या हिंदूंच्या अपमानावर आणि दुःखावर डागण्या देण्यासाठी हे कृत्य त्यांनी केले. आज हिंदू एकजूट झाला आहे, जागृत झाला आहे. हा विवाद फक्त मंदिर – मशिदीचा नाही तर भारताच्या उज्ज्वल भविष्याचा आहे आणि हे ज्यांना सहन होत नाही तेच फक्त नक्राश्रू ढाळून भारताच्या सर्वोच्च संस्थांवर असे हेत्वारोप करतात, हे आपण समजून घेणे आवश्यक आहे. 

बादरायण संबंध 
आपल्या तिसऱ्या मुद्द्यात हे महाशय म्हणतात की, ‘जो देव या खटल्यातील एक याचिकाकर्ता आहे, त्यालाच न्याय द्यायला सांगणे हा तर हितसंबंधातीलच संघर्ष आहे’.मंदिराच्या जागेचा विवाद आणि स्वतःला योग्य न्याय देता यावा म्हणून परमेश्वराला शरण जाणे; यातील फरकच यांना कळत नाही का , तर निश्चित कळतो. पण वेड पांघरून पेडगावला जायचे जर एखाद्याने ठरवलेच असेल तर त्याची ‘मूर्ख’ म्हणून संभावना करणेच क्रमप्राप्त आहे. पुढे हे महाशय लिहितात, ‘हेच जर उद्या एख्याद्या मुस्लीम न्यायाधीशाने समजा हिंदू मुस्लीम वादात मुसलमानांच्या बाजूने निकाल देताना अल्लाने सांगितले असे म्हटले तर हेच लोक त्यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करतील’.

याच्या इतका हास्यास्पद मुद्दा दुसरा नसेल. निर्णय देताना न्यायालयात सादर होणारे पुरावे तपासूनच न्यायाधीश न्याय देतात हे काय यांना माहित नाही? अयोध्या खटल्यात न्यायालयासमोर सर्व पुरावे सादर झालेले होते. पूर्वी तेथे राममंदिरच होते,याबद्दल कोणाच्याही मनात शंका नव्हती. मुद्दा फक्त सौहार्द्पूर्ण वातावरणात जमिनीचे हस्तांतरण होऊन मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करण्याचा होता. हे कसे साधता येईल याचाच चंद्रचूड विचार करत होते. 

तकलादू दलीले 
चौथा मुद्दा अधिकच तकलादू  आहे. ‘आपल्या निर्णयाची जबाबदारी चंद्रचूड यांना स्वीकारायची नव्हती म्हणून त्यांनी देवाचा आधार घेतला….त्यांनी आतातरी स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारावी…. अयोद्येचा प्रश्न हा कायद्यानुसार कच्चाच होता’ असे यांचे म्हणणे! मुळात अयोध्येचा इतिहास हे लोक वाचतात, तोच मुळी केवळ इंग्रजांनी लिहिलेला! हे सर्व इतिहास-लेखक डाव्या विचारसरणीने झपाटलेले. त्यामुळे त्याच काळात भारतात येऊन गेलेल्या इतर युरोपियन लोकांनी काय लिहिले आहे याच्याशी त्यांना देणेघेणे नसते. जर यांनी इतर युरोपीय लोकांनी किंवा चीनी प्रवाशांनी लिहिलेला भारताचा व विशेषतः उत्तर भारताचा इतिहास वाचला तर असे काही बोलण्याची आगळीक ते करणार नाहीत; अर्थातच ते प्रामाणिक असतील तर!

न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 
पण आपला अप्रामाणिक विचार प्रसृत करण्यासाठी त्यांनी पाचव्या मुद्यात येथील न्याय व्यवस्थेलाच भित्री ठरवून त्यांच्यात धैर्य नसल्याचे सांगून टाकले. असे करताना,चंद्रचूड यांनी अनेकदा मोदी सरकारच्या विरोधात जाऊन निर्णय दिले आहेत, याकडे त्यांनी जाणूनबुजून कानाडोळा केला. स्वतःचे मुद्दे स्पष्ट करण्यासाठी सीलेक्टीव अप्रोच स्वीकारायचा ही डाव्यांची रणनीतीच आहे. तीच येथेही दिसून आली .

मात्र याला आपण सुजाण नागरिकांनी बळी पडू नये, असे सांगावेसे वाटते – इतकेच!

डॉ. छाया नाईक 
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका
नागपूर

अन्य लेख

संबंधित लेख