दिवाळीचा मुहर्त साधत विविध पक्षांच्या नेत्यांची मतदार भेट घेतली. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.
भाऊबीज आणि दिवाळी सणाच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांनी मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांची पहाटेच्या वेळी भेट घेतली. आपण करत असलेल्या कामाची माहिती दिली तसेच भविष्यातील नियोजनाचा आलेख मांडला. सकाळच्या न्याहारीसह दिवाळी फराळाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. २८८ मतदारसंघांमध्ये एकंदर ७ हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत तर कोकणात उमेदवारांची संख्या अतिशय मर्यादित आहे.
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्याखालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात ९८, तर बीडमध्ये ९० उमेदवारांचे अर्ज वैध आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त ५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहीम आणि सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत प्रत्येकी ६, तर शिवडी आणि कुडाळमध्ये ७ उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत.