Thursday, December 5, 2024

शरद पवारांच्या गटातील अस्थिरता; अजित पवारांच्या गटात इनकमिंग वाढते!

Share

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीने (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीला (MVA) हा निकाल मोठा धक्का देणारा ठरला आहे. निवडणुकीपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात नेत्यांची इनकमिंग झाली होती, मात्र आता निकालानंतर माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल जगताप अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करतील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतरही राहुल जगताप हे शरद पवारांच्या गटाशी एकनिष्ठ राहिले होते, परंतु श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात (Shrigonda Vidhan Sabha Election 2024) त्यांची उमेदवारी मिळाली नव्हती. या जागेवर महाविकास आघाडीने शिवसेना (ठाकरे गट) च्या अनुराधा नागवडे यांना संधी दिली होती. यामुळे जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्या मते, “माझी उमेदवारी ही मुंबईवरून नाही तर श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने ठरवली आहे,” असे म्हणत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती.

त्यामुळे श्रीगोंदा मतदारसंघात महायुतीचे विक्रम पाचपुते, महाविकास आघाडीची अनुराधा नागवडे आणि अपक्ष राहुल जगताप यांच्यात तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत महायुतीचे विक्रम पाचपुते विजयी झाले. निकालानंतर, राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. ते मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

तर दुसरीकडे, शिराळा मतदारसंघाचे माजी आमदार मानसिंग नाईक हेही अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर पोहोचले आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय नाट्याला आणखीनच वेग आला आहे.

अन्य लेख

संबंधित लेख