महाराष्ट्र : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी जी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल बोलण्याची तुमची ती लायकी नाही,” असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांबाबत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. यावर बावनकुळे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांना चांगलेच सुनावले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…
“ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली.
बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजप उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारनं ‘नागरिकत्व दुरूस्ती विधेयक’ मंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती.
भाजपासाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही तर ती आमची श्रध्दा, प्राण आणि श्वास आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेली टीका तसेच कर्नाटक विधानसभेतून सावरकरांची प्रतिमा काढण्याचा काँग्रेस नेते उद्दामपणा करतानाही तुम्ही अवाक्षर काढले नाही,
यातूनच तुमची हिंदुत्ववादी तथाकथित निष्ठा समजते. तुम्हाला विश्र्वगुरू पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच पण तुमची ती लायकी देखील नाही.”