Wednesday, April 2, 2025

बांगलादेशातील हिंदूंपुढे अस्तित्वाचे संकट, संघाकडून तीव्र निषेध

Share

बांगला देशात धार्मिक संस्थांवर पद्धतशीर हल्ले करण्यात आले आहेत. क्रूर हत्याकांड, जबरदस्तीने धर्मांतर आणि हिंदूंच्या मालमत्तेचा नाश करण्यात आला आहे. हिंसाचाराच्या चक्रामुळे बांगलादेशातील हिंदू (Hindus in Bangladesh) समुदायासाठी अस्तित्वाचे संकट निर्माण झाले असून तेथील धार्मिक असहिष्णुता आणि मानवी हक्कांचे उल्लंघन याचा तीव्र निषेध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने संमत केलेल्या ठरावात करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि जागतिक समुदायाला निर्णायक कारवाई करण्याचे आवाहनही ठरावातून करण्यात आले आहे. बांगलादेशातील हिंदूंचे हक्क, प्रतिष्ठा आणि धार्मिक स्वातंत्र्य यांचे रक्षण करण्यासाठी संघ आपल्या कटिबद्धतेवर ठाम असल्याचेही संघाने म्हटले आहे.

बेंगळुरू येथे सुरू असलेल्या प्रतिनिधी सभेने संमत केलेल्या ठरावांची माहिती संघाचे सह सरकार्यवाह अरुण कुमारजी यांनी माध्यमांना दिली. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने संमत केलेल्या ‘बांगलादेशच्या हिंदू समाजासोबत एकता साधण्याचे आवाहन’ या शीर्षकाच्या ठरावाबाबत ते म्हणाले, कट्टरपंथी इस्लामी घटकांकडून बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांवर वाढता हिंसाचार, दडपशाही आणि लक्ष्यित छळाबद्दल संघ तीव्र चिंता व्यक्त करत आहे. बांगलादेशातील परिस्थितीवर अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने संमत केलेल्या ठरावात म्हटले आहे की, हिंसाचाराच्या चक्रामुळे बांगलादेशातील हिंदू समुदायासाठी अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. प्रतिनिधी सभेच्या ठरावात धार्मिक असहिष्णुता आणि मानवी हक्कांचे उल्लंघन अशा कृत्यांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे आणि जागतिक समुदायाला निर्णायक कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार

मठ, मंदिरांवरील हल्ले, देवतांची विटंबना, मालमत्तेची लूट आणि जबरदस्तीने धर्मांतर करणे हे निंदनीय आहे परंतु संस्थात्मक उदासीनता आणि सरकारच्या निष्क्रियतेमुळे या गुन्ह्यांमधील गुन्हेगारांना बळकटी मिळाली आहे, असे अरुण कुमारजी म्हणाले.

बांगलादेशातील हिंदू लोकसंख्येत सातत्याने घट होत असल्याचे सांगून अरुण कुमारजी म्हणाले, यातून या संकटाची तीव्रता दिसून येते. हिंदूंवर, विशेषतः अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये अत्याचार हा एक कायमचा मुद्दा आहे. तथापि, गेल्या वर्षभरातील संघटित हिंसाचाराची पातळी आणि सरकारचा निष्क्रिय प्रतिसाद अत्यंत चिंताजनक आहे.

प्रादेशिक स्थिरतेला वाढता धोका

बांगलादेशमधील वाढत्या भारतविरोधी वक्तव्याबद्दलही प्रतिनिधी सभेत चिंता व्यक्त करण्यात आली असून त्यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील ऐतिहासिकदृष्ट्या घनिष्ट संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे, असे अरुण कुमारजी म्हणाले. या ठरावात पाकिस्तानसह आंतरराष्ट्रीय शक्ती आणि डीप स्टेट घटकांच्या हस्तक्षेपाचा इशारा देण्यात आला असून सांप्रदायिक तणाव वाढवून आणि अविश्वास वाढवून या प्रदेशाला अस्थिर करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. भारत आणि त्याच्या शेजारी देशांमध्ये समान सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा असून या प्रदेशाच्या एका भागात कोणत्याही प्रकारचा सांप्रदायिक कलह संपूर्ण उपखंडावर परिणाम करतो, असे ठरावात नमूद करण्यात आले आहे.

हिंदू समाजाचा प्रशंसनीय प्रतिकार

बांगलादेशातील हिंदू तीव्र छळाला तोंड देत असूनही न्याय आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या संघर्षात त्यांनी उल्लेखनीय भूमिका निभावली आहे, असे अरुण कुमारजी म्हणाले. त्यांच्या शांततापूर्ण, सामूहिक आणि लोकशाही प्रतिकाराला भारतातील आणि जगभरातील हिंदूंकडून नैतिक आणि मानसिक पाठिंबा मिळाला आहे. भारत सरकारने बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभे राहण्याच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. बांगलादेश सरकारसोबत राजनैतिक प्रयत्न सुरू केले आहेत आणि अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा मुद्दा उपस्थित केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय संघटनांना आवाहन

प्रतिनिधी सभेच्या ठरावात संयुक्त राष्ट्रांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि जागतिक समुदायाला या अमानवी कृत्यांची गांभीर्याने दखल घेण्याचे आणि हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवरील हिंसाचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी बांगलादेश सरकारवर दबाव आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बांगलादेशातील हिंदूंचे हक्क, प्रतिष्ठा आणि धार्मिक स्वातंत्र्य यांचे रक्षण करण्यासाठी संघ आपल्या कटिबद्धतेवर ठाम असून या गंभीर मानवतावादी आणि अस्तित्वाच्या संकटाला तोंड देण्यासाठी त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती अरुण कुमारजी यांनी केली.

अरुण कुमारजी म्हणाले…

बांगलादेशातील हिंदू लोकसंख्येत सातत्याने घट
१९५१ मध्ये २२ टक्के, आज ती ७.९५ टक्क्यांवर
सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांना बळकटी
बांगलादेशातील हिंसेला सरकारचा पाठिंबा
आंतरराष्ट्रीय संघटनांनी बांगलादेश सरकारवर दबाव आणावा

अन्य लेख

संबंधित लेख