मुंबई : शाळा अनुदानित असो वा विनाअनुदानित, सरकारी असो वा खासगी तेथे मराठी विषय शिकवलाच गेला पाहिजे. प्रत्येक शाळेत मराठी भाषा बंधनकारक (Marathi Language is Mandatory) आहे. प्रत्येक शाळेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. शाळा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhuse) यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात शालेय शिक्षण विभागाची आढावा बैठकीत दिले.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये (सीबीएसई) राज्यभाषा मराठी शिकविणे अनिवार्य आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास शिकविणे देखील बंधनकारक आहे. सर्व शिक्षकांनी याकडे लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक शाळेत राष्ट्रगीतानंतर राज्यगीत ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे म्हटले गेले पाहिजे. यासोबतच मराठी भाषा, अभिजात भाषा दर्जाबाबतही प्रत्येक शाळेत विविध उपक्रम राबविण्यात यावेत. विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच वृक्षारोपणाचे महत्त्व कळावे यासाठी शाळांमध्ये ‘एक पेड माँ के नाम’ हा उपक्रम सुरू करण्यात यावा. यासाठी प्रत्येक झाडाला क्यूआर कोड देऊन, झाडांचा वाढदिवस देखील साजरा करावा. अधिकाऱ्यांपासून विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकाला एका झाडाच्या संगोपनाची जाबाबदारी देण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थी त्या झाडाची काळजी घेतील.
मंत्री भुसे म्हणाले, पुढील वर्षांपासून इयत्ता चौथी आणि सातवीचे विद्यार्थी देखील शिष्यवृत्ती परीक्षेला बसू शकतील. शाळांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घ्यावी. शाळांमधील शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी विविध शासकीय योजनांद्वारे पायाभूत सुविधांचा विकास करावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा दत्तक घ्याव्यात. काही शाळांबाहेरील पानटपऱ्यांवर कारवाई करावी. यासोबतच आधार, अपार आयडी पडताळणी, निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम आदी विषयांचाही मंत्री भुसे यांना आढावा घेतला.