Monday, November 17, 2025

“मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांचे कार्य विवेकानंदांसारखेच!” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Share

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते आज छत्रपती संभा़जीनगर येथे स्वामी रामानंद तीर्थ (Swami Ramanand Tirtha) यांचा पुतळा व केंद्र सरकार पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत कमल तलाव पुनरूज्जीवन कामाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वामी रामानंद तीर्थ यांचे जीवन म्हणजे एक अतिशय उत्कृष्ट विद्यार्थी आणि प्रखर शिक्षक याचे उदाहरण आहे. ज्याप्रकारे स्वामी विवेकानंद यांनी तरुणाईला जागृत केले, त्यांच्यात देशभक्ती संचारीत केली, त्याच प्रकारचे कार्य मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या माध्यमातून झाले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मराठवाड्याच्या मुक्तीसाठी केलेल्या संघर्षाचे वर्णन करताना सांगितले की, भारत जरी 1947 साली स्वतंत्र झाला असला, तरी मराठवाडा मुक्त होण्यासाठी जवळपास 13 महिन्यांचा अधिक कालावधी लागला. जेव्हा मराठवाडा निजामाच्या संस्थानाचा भाग होता, तेव्हा रजाकारांच्या अन्यायाची पराकाष्ठा झाली आणि त्याविरुद्ध एक मोठा रणसंग्राम सुरु झाला. या लढ्याचे स्वामी रामानंद तीर्थ यांनी नेतृत्व केले व या लढ्याला संघर्षात परिवर्तित केले. त्यांनी हैदराबाद व मराठवाड्यात स्वातंत्र्य संग्रामाची जी ज्याेत त्यांनी पेटवली, त्यातून अनेक महिला व तरुण रणसंग्रामात उतरले आणि निजामाच्या जोखडातून मराठवाड्याला मुक्त करण्यात आले.

मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांना अंधार कोठडीत देखील राहावे लागले होते. परंतु त्यांच्यामागे अशा अनेक नेत्यांची मांदियाळी होती ज्यांनी हे आंदोलन थांबू दिले नाही. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या मातब्बर गृहमंत्री यांनी त्यांच्या या स्वतंत्र संग्राम सेनानींच्या हाकेला प्रतिसाद देत कारवाई केली आणि त्याचा परिणाम म्हणून 17 सप्टेंबर 1948 ला मराठवाडा मुक्त झाला. म्हणून, जेव्हा जेव्हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जाईल, तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ यांचे स्मरण केले गेले पाहिजे, असे मुख्यमंत्री फडणवीस या लोकार्पण प्रसंगी म्हणाले.

अन्य लेख

संबंधित लेख