Saturday, September 7, 2024

अहिल्यादेवी होळकर: मंदिरांच्या निर्मात्या, कुशल शासक

Share

अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाला येत्या ३१ मे रोजी प्रारंभ होत आहे. त्या एक कुशल शासक होत्या. त्यांची निष्पक्षता आणि उत्कृष्ट प्रशासनाची उदाहरणे आजही मार्गदर्शक आहेत. इतिहासात त्यांच्या पराक्रमाचा अमीट ठसा उमटलेला आहेच, तसाच ठसा त्यांनी भारतात हिंदू मंदिरांसाठी जे कार्य केले त्याचाही उमटलेला आहे.

राज्यातील महायुती सरकारने पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्याचे ‘राजगड’ असे नामांतर केले आहे. राजगड नामांतरापूर्वी महायुती सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर‌‌ आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर केले. संभाजीनगर आणि धाराशिव या नामांतराच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. न्यायालयाने हे नामांतर वैध असल्याचा निर्वाळा ८ मे रोजी दिला. विरोधात करण्यात आलेल्या याचिका गुणवत्तारहित असल्याचे सांगून न्यायालयाने त्या फेटाळल्या. नामांतराबाबत सरकारने काढलेल्या अधिसूचनेत कायदेशीर त्रुटी नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले. महायुती सरकारने हा निर्णय घेऊन देशभक्तीला, समाजभक्तीलाच प्रोत्साहन दिले आहे.

हा संदर्भ देण्याचे कारण असे की, राज्यात सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारने अहमदनगरचे नामांतर करण्याचाही निर्णय घेतला होता आणि नवे नाव अहिल्यादेवीनगर असे करण्यात आले आहे. सरकारने १३ मार्च २०२४ रोजी हा निर्णय घेतला. अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाला येत्या ३१ मे रोजी प्रारंभ होईल. या निमित्ताने अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक कार्य सर्वदूर पोहोचल्यास त्यांचे कर्तृत्व समाजमानसात रुजेल.

३१ मे १७२५ रोजी अहिल्यादेवीनगर मधील चौंडी या गावात माणकोजी शिंदे यांच्या पत्नीला कन्यारत्न झाले, ती कन्या म्हणजे अहिल्यादेवी. अहिल्यादेवी होळकर या शासक असताना त्यांनी हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यावर भर दिला. देशभरातील बारा ज्योतिर्लिंग व इतर मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम त्यांनी हाती घेतले आणि ते पूर्ण देखील केले. श्रीनगर, हरिद्वार, केदारनाथ, बद्रीनाथ, ऋषिकेश, प्रयाग, वाराणसी, नैमिषारण्य, पुरी, रामेश्वरम, सोमनाथ, नाशिक, ओंकारेश्वर, महाबळेश्वर, पुणे, इंदूर, श्रीशैलम, उडीपी, गोकर्ण, काठमांडू इत्यादी ठिकाणी मंदिरे बांधली. अहिल्यादेवी यांनी शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला.

निजाम आणि पेशव्यांमध्ये झालेल्या खर्ड्याच्या लढाईत अहिल्यादेवींनी होळकरांची कुमक पेशव्यांच्या सैन्यात पाठवली आणि ही लढाई पेशव्यांनी जिंकली होती.

अहिल्यादेवी होळकर: कुशल महिला शासक
अहिल्यादेवी होळकर यांची ओळख भारतीय इतिहासातील एक कुशल महिला शासक अशी आहे. ज्यांच्या निष्पक्षतेची आणि सुशासनाची अनेक उदाहरणे आहेत. त्यांनी आपल्या पराक्रमाने मैदान गाजवलेच आणि त्या बरोबरच देशभरातील हिंदू मंदिरांच्या आद्य, निर्मात्या आणि संरक्षक म्हणूनही कार्य केले.

सध्या भारतात काशी-विश्वनाथ आणि अनेक हिंदू मंदिरे आणि त्यांचा जीर्णोद्धार असे विविध मुद्दे चर्चेत आहेत. भारतीय इतिहासात ज्या राज्यकर्त्यांनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला त्यात अहिल्यादेवी होळकरांचा समावेश प्रामुख्याने होतो. त्यांनी आपली खासगी संपत्ती दानधर्म आणि मंदिरे-घाट बांधण्यात खर्च केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी भारतातील चारधाम स्थळांना रस्ता मार्गे जोडून, एक अर्थाने हिंदूंना जवळ आणले. पश्चिमेकडील सोमनाथ पासून, पूर्वेकडील काशी विश्वनाथ पर्यंत अहिल्यादेवींनी आपले जीवन त्या काळात विध्वंस झालेल्या किंवा मुस्लिम आक्रमकांकडून हल्ले व लूट झालेल्या मंदिरांच्या जीर्णोद्धार आणि पुनर्बांधणीसाठी समर्पित केले.

अहिल्यादेवींचे सामाजिक कार्य
आज संपूर्ण भारतामध्ये प्रचलित असलेली माहेश्वरी सिल्क ही देखील देखील अहिल्यादेवी होळकर यांचीच देणगी आहे. जनतेकडून कर स्वरूपात आलेले पैसे स्वतःसाठी महाल बांधण्यात न खर्च करता, त्यांनी त्या माध्यमातून रस्ते, तलाव, मंदिर बांधण्याला प्राधान्य दिले. तसेच त्यांनी काही ठिकाणी आश्रमशाळा बांधल्या तर काही ठिकाणी अन्नछत्र सुरू केले. काही मंदिरांसाठी त्यांनी घाट बांधून दिले आहेत. काही ठिकाणी कुंडे बांधून दिली आहेत.

अहिल्यादेवींचा काशी-विश्वनाथच्या मंदिराला हातभार
देशावर मुस्लिम आक्रमकांचे संकट असताना, हिंदू धर्मातील मानबिंदू पुन्हा उभारण्याचे काम अहिल्याबाईंनी हाती घेतले होते. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे काशी-विश्वनाथ मंदिर. मूळ नष्ट झालेल्या मंदिराच्या पुनर्बांधणीचे स्वप्न अनेक मराठा राज्यकर्त्यांनी पाहिले होते. परंतु, ते सत्यात उतरवण्याचे श्रेय अहिल्यादेवी होळकर यांना जाते.

१८ एप्रिल १६६९ रोजी मुस्लिम शासक औरंगजेबाने काशी-विश्वनाथचे मंदिर पाडण्याचा आदेश दिला. मुघल सम्राट औरंगजेबाच्या स्पष्ट आदेशानुसार, काशी-विश्वनाथ धाम, हिंदूंच्या पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेले लुटले गेले, आणि पाडले गेले. १६६९ मध्ये हे श्रद्धा स्थान ज्ञानवापी मशिदीत रूपांतरित केले गेले. पण अहिल्याबाईंनी या मशीदीशेजारीच नवे भव्य मंदिर उभारले. काशीचे मुख्य आकर्षण म्हणून प्रसिद्ध असलेला ‘मणिकर्णिका घाट’ बांधला. पुढे शीख राजा रणजीत सिंहाने या मंदिराच्या शिखरावर सोन्याचा पत्रा चढवला.

सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार
१७८३ साली अहिल्यादेवी यांनी सोमनाथच्या शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला. अहिल्याबाईंनी बांधलेले मंदिर आता ‘जुने सोमनाथ’ किंवा ‘अहिल्यादेवी मंदिर’ म्हणून ओळखले जाते आणि मुख्य सोमनाथ मंदिरापासून सुमारे २०० मीटर अंतरावर आहे.

विष्णुपद मंदिर, गया, बिहार
हे जगातील एकमेव असे मंदिर आहे, जिथे भगवान विष्णूच्या पावलांच्या ठशांची पूजा केली जाते. तिला धर्मशिला असेही म्हणतात. फाल्गु नदीच्या काठावर बांधलेले हे मंदिर अहिल्यादेवी यांनी १७८७ मध्ये पुन्हा बांधले होते.

अहिल्यादेवी होळकर यांचा ग्रंथसंग्रह
अहिल्यादेवींचा ग्रंथसंग्रह मोठा आणि दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मधुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणि, वाल्मीकि रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती होत्या.

गंगा नदी
हिंदू धर्म ग्रंथानुसार गंगा नदीला विशेष महत्त्व आहे. हिंदूंनी पवित्र मानलेली नदी प्राचीन ग्रंथ आणि कलेमध्ये देवी गंगा म्हणून अवतरली आहे. गंगा नदीचे पाणी पवित्र मानले जाते, धार्मिक स्नान हा हिंदू तीर्थक्षेत्राचा अविभाज्य भाग आहे. हे पाणी, ज्याला आदरपूर्वक गंगाजल म्हटले जाते, हिंदू मंदिरांमध्ये केल्या जाणाऱ्या विविध पूजांमध्ये देखील वापरले जात असे. गंगेचे महत्त्व समजून, अहिल्यादेवींनी, गंगेच्या उगमाचे म्हणजेच ‘गंगोत्री’चे पाणी भारतातील सर्व मंदिरांपर्यंत अगदी केरळ, तामिळनाडू व कर्नाटक पर्यंत पोहोचवण्याची सोय केली.

अहिल्यादेवींचे कार्य…

  • द्वारकेत पूजागृह बांधले.
  • रामेश्वरममध्ये राधाकृष्ण मंदिर, धर्मशाळा आणि विहिरी बांधल्या.
  • जगन्नाथपुरीत रामचंद्र मंदिर, धर्मशाळा आणि विहिरी बांधल्या.
  • ओंकारेश्वरातील ममलेश्वर आणि त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार करून शिवासाठी चांदीचा मुखवटा केला.
  • अयोध्येत राम मंदिर, चेताराम मंदिर, भैरव मंदिर, नागेश्वर मंदिर आणि इतर मंदिरे बांधली. शरयू घाट बांधला.
  • चिंतामण गणपती, जनार्दन मंदिर, लीला पुरुषोत्तम बालाजी मंदिर, घाट, तलाव, धर्मशाळा आणि पायऱ्या उज्जैनमध्ये बांधल्या.
  • चित्रकूटमध्ये श्री राम आणि इतर चार मूर्तींची स्थापना केली.
  • नाथद्वारामध्ये मंदिर, धर्मशाळा, विहीर आणि तलाव बांधले.
  • बेरूळ (कर्नाटक) येथे गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराजा आणि अग्निची मंदिरे बांधली.
  • प्रयागमध्ये विष्णू मंदिर, धर्मशाळा इत्यादी बांधले.
  • नाशिकमध्ये श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर आणि धर्मशाळा बांधली.
  • गयामध्ये श्री विष्णुपद मंदिर आणि सभा मंडप बांधला.
  • पुष्करमध्ये श्री विष्णू मंदिर, घाट आणि धर्मशाळा बांधली.
  • त्र्यंबकेश्वरमध्ये दोन मंदिरे व एक तलाव बांधला.
  • गंगोत्रीमध्ये विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैवर मंदिरे आणि सहा धर्मशाळा बांधल्या

अहिल्यादेवींच्या अथक प्रयत्नांमुळे या पवित्र स्थळांच्या स्थापत्य वारशाचे पुनरुज्जीवन आणि जतन करण्यास मदत झाली. आज भारतातील हिंदू धर्म आणि मंदिरे यामध्ये अहिल्यादेवींचा खूप मोलाचा वाटा आहे, हेच त्यांच्या जीवनचरित्रातून दिसून येते.

प्रतिनिधी
(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)

अन्य लेख

संबंधित लेख