नमस्कार
आज एक सुखद बातमी, ज्या बातमीची अनेक दिवस अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक कान देवून वाट पाहत होते, ती बातमी अखेर आज झळकली.
आमच्या शहराचे/ जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर होण्याच्या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले. अहमद गेला अहिल्यादेवी आल्या.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी! कर्तृत्व , दातृत्च आणि नेतृत्वाचे प्रतीक! सांस्कृतिक राष्ट्रवादाचे जीते जागते उदाहरण!
भारतीय परंपरेत सती परंपरा नव्हती तर ती एक अपवादात्मक स्थिती होती हे ज्यांच्या जीवन चरित्रातून स्पष्ट होते त्या आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी.
आमच्या देशात , समाजात काही ठराविक जातींनाच फक्त शिक्षणाचा अधिकार होता असे विमर्श प्रस्थापित करणाऱ्यांना ज्यांच्या जीवन चरित्रातून खोटे स्थापित करता येते त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी.
हा देश एका विशिष्ट सांस्कृतिक धाग्याने बांधलेला होता आणि राजकीय सत्ता आणि त्यांच्या राज्य सींमा यांच्या पेक्षा तो धागा अधिक मजबूत आणि श्रेष्ठ होता हे ज्यांनी सिद्ध केले त्या आमच्या राजमाता अहिल्यादेवी !
आमच्या संस्कृतीत स्त्रीला असणारे महत्व अधोरेखित ज्यांनी केले आणि कर्तृत्वाची उंची पुढे ‘जात ‘.ही खूप छोटी गोष्ट आहे हे ज्यांनी सिद्ध केले त्या आमच्या राजमाता अहिल्यादेवी !
ज्यांच्या विवाहासाठी स्वतः बाजीराव पेशवे यांनी पुढाकार घेवून शनिवार वाडा समोर त्यांचा विवाह सुभेदार होळकर यांच्या मुलाशी लावून दिला हा इतिहास पेशवे , होळकर , छत्रपती यांच्या नावांचा जातीशी संबंध जोडून विद्वेष निर्माण करणाऱ्यांना सोयीचा नसल्याने त्यांना अहिल्यादेवी नको आहेत.
ज्यांना इंग्रज मंडळीनी निर्माण केलेले भारतीय स्त्री विषयक विमर्श पुढे न्यायचे आहेत त्या लुटियंस ना अहिल्यादेवी नाव नको आहे. अहिल्यादेवी यांच्या काळात जागतिक परिस्थिती महिलांची काय होती ? अशी कर्तृत्ववान महिलांची किती उदाहरणे युरोप मध्ये आहेत ?
राज्यकारभार करताना न्यायव्यवस्था , कृषी धोरण , धर्म कारण आणि उद्योग व्यवसायासाठी चालना ह्या सर्व आघाडीवर आपली छाप पाडणाऱ्या अहिल्यादेवी ह्या आमच्या खऱ्या आदर्श आहेत. पण आमच्या पूर्व समाज जीवनातील आदर्श नाकारायचे आहेत त्यांचा या नामांतराला विरोध आहे.
हिंदू समाज आणि हिंदू संस्कृती बद्दल खोटे विमर्श पसरविणारे , मुस्लिम मतांच्या लांगुन चालन करण्यासाठी मुस्लिम राजवटीचे कौतुक आणि भलावण करणारे आणि तरीही स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे हे स्वयंघोषित शाहू, फुले , आंबेडकर यांचे वारसदार गप्प झाले आहेत.
नाव शाहू , फुले आंबेडकरांचे आणि विचार मध्य्ययुगीन मुल्ला मौलवीं यांचे असे हे दुहेरी ढोंगी मंडळी आश्वासन देत आहेत . आम्हाला मते द्या आम्ही पुन्हा अहमदनगर करू ! आम्हाला मते द्या ,आम्ही पुन्हा औरंगाबाद करू ! जणू असे विषारी फुत्कार हे टाकत आहेत.
यवन सेनेने केलेला मंदिरांचा विध्वंस ज्या अहिल्यादेवी यांनी थांबवला आणि जीर्णोद्धार करून त्या मंदिरांच्या मध्ये जाणाऱ्या यात्रेकरू, श्रद्धाळू हिंदुंच्या साठी घाट आणि धर्मशाळा संपूर्ण भारत वर्षात बांधल्या त्या पुण्य श्लोक अहिल्यादेवी पेक्षा ह्या महाभागांना धर्मवीर संभाजी राजे याना हाल हाल करून मारणारा औरंगजेब प्रिय वाटावा ह्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकेल ?
संभाजी राजेंच्या नावांनी ब्रिगेड उभी करायची , हिंदू जातीत विद्वेष पसरावयाचा आणि औरंगजेबाच्या वारसांना मिठ्या मारायच्या आणि अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या एका विधवा , धनगर जातीत जन्माला येवून ही क्षात्र तेज दाखवणाऱ्या महिले पोटी आकस दाखवायचा ! वाह रे वाह ! कमाल आहे . ह्या मंडळींना अहिल्यादेवी यांचे नाव दिल्यामुळे आनंद निर्माण होणया पेक्षा अहमदाचे नाव गेले याचे दुःख आहे.
आपण कोण ?आपले पूर्वज कोण? आणि आपला वारसा काय? ह्या बाबतीत राजकीय स्वार्थामुळे संपूर्ण आत्मविस्मृत झालेली हीच मंडळी इतके दिवस छत्रपतींना आणि त्यांच्या कार्याला सन्मान देण्यास कचरत होते आणि आता महाराजांना धर्म निरपेक्ष ठरवू पाहत आहेत.
पण आता समाज परकियांच्या खुणा , गुलामगिरीची चिन्हे पुसून टाकण्यासाठी सिद्ध झालेला आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून ‘अहमद’ नगर चे अहिल्यानगर झाले आहे. हे एका रात्रीतून घडलेले नाही . अनेक संस्था , संघटना यांनी हे स्वप्न पाहिले आणि त्याचा न थकता पाठलाग केला त्यातून जो सामाजिक दबाव निर्माण झाला त्याचा हा परिणाम आहे आणि त्याच बरोबर राष्ट्रीय विचाराचे सरकार केंद्र आणि राज्यस्तरावर आहे ज्यामुळे हे शक्य झाले आहे.
आगामी काळात होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत कुणाला मतदान करायचे ? ह्या बाबतीत स्पष्ट निर्णय घेण्यासाठी गेल्या काही दिवसातले सरकारचे निर्णय पुरेसे आहेत. मग तो गोमाता – राजमाता निर्णय असो किंवा मराठी भाषा – अभिजात भाषा हा निर्णय असो नाही तर आजचा अहिल्यानगर नामकरणाचा निर्णय असो.
समजदार नागरिक ठरवतील दौलताबाद की देवगिरी ! अफजल की छत्रपती शिवराय ? अहमद की अहिल्या, संभाजी राजे की औरंगजेब आपल्याला भावी पिढ्यांना काय द्यायचे आहे ते !
अहिल्यानगर एक नाव नाही बदलले ! इतिहासाला योग्य दिशेने नेण्याच्या प्रक्रियेचे हे एक दमदार पाऊल नियतीने टाकले आहे. आम्हाला आमच्या पुढील पिढ्यांना आक्रमकांचा इतिहास नाही आम्हा मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास शिकवायचा आहे. गुलामगिरी नाही, स्वाभिमान शिकवायचा आहे. पराभव नाही, विजय सांगायचा आहे. अहिल्यानगर हे नामांतर त्यासाठी आहे. हे नामांतर मातृ शक्तीचा जागर करणारे आहे. पुढील पिढ्यांना ह्या दैदिप्यमान प्रकाशात आपली पराक्रमी वाटचाल करता यावी म्हणून हे नामांतर आहे. हा आत्मविस्मृत समाजाला झालेल आत्म साक्षात्कार आहे. त्याचे स्वागत करू या.
रवींद्र मुळे.
अहिल्या नगर.