वनबंधू चैत्राम पवार (Chaitram Pawar) यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या राहणीमानातील, वागण्या-बोलण्यातील कमालीचा साधेपणा. एम. कॉम. पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गावातच राहून शेती करण्याचे ठरवले आणि ग्राम परिवर्तनाचा अध्याय सुरू झाला. चैत्राम पवार कधी स्वतःबद्दल बोलताना दिसणार नाहीत. स्वतःबद्दल न बोलता ते गावासाठी केलेल्या कामाबद्दलच योग्य ती माहिती देतात. त्यांच्या कार्याबद्दलचे प्रश्न त्यांना कोणी विचारले तर त्यातून खूप चांगली माहिती समजत जाते.
वनवासी क्षेत्रात अनेक वर्षे काम करत असल्यामुळे या कामातील बारकावे त्यांनी ओळखले आहेत. या कामाचा त्यांनी खूप अभ्यासही केलेला आहे. या सगळ्या कामाची माहिती स्वतःकडे काहीही राखून न ठेवता आणि कोणतीही आत्मप्रौढी न मिरवता ते देतात. त्यांचे आणखी एक विशेष म्हणजे या झालेल्या सगळ्या कामाचे श्रेय ते कधीही स्वतःकडे घेत नाहीत. हे संपूर्ण श्रेय ते गावकऱ्यांना आणि वनवासी कल्याण आश्रमाला देतात. त्यामुळे गावकरी आणि संस्था मोठी होते. अनेक मोठ्या समारंभांमध्येही त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाला दिलेले श्रेय हे त्यांच्या मोठेपणाचेच द्योतक आहे.
राहणीमानातील साधेपणा, गावकऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा स्वभाव, गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न अशी त्यांची अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.
हेही वाचा…
प्रतिनिधी : एनबी मराठी