Saturday, July 27, 2024

मतदानाचे कर्तव्य आम्ही कसे विसरू?

Share

टपाली मतदानाची प्रक्रिया जाणून घेण्यासारखी आहे. या प्रक्रियेत लष्कराबरोबरच सैनिक कल्याण मंडळ आणि निवडणूक आयोग यांचाही सहभाग असतो.


देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांकडे देशभक्तीचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून आपण पाहतो. कर्तव्यदक्ष, स्वयंशिस्त अशा या सैनिकांची देशासाठी सर्वोच्च बलिदानाची तयारी असते. असे सैनिक मतदानाच्या कर्तव्यात पाठीमागे पडले तरच नवल. ते टपाली मतदान करतात. या मतदानाची प्रक्रिया देखील जाणून घेण्यासारखी आहे.
या प्रक्रियेत लष्कराबरोबरच सैनिक कल्याण मंडळ आणि निवडणूक आयोग यांचाही सहभाग असतो. लष्करामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद सैनिक कल्याण मंडळाकडे असते. त्या व्यक्तीच्या स्थानिक पत्त्यावरून (होम टाऊन) त्याचा लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघ निश्चित केला जातो. त्यानंतर उमेदवार निश्चित झाल्यावर एका लिफाफ्यामध्ये मतपत्रिका सील करून तो लिफाफा त्या त्या रेजिमेंटमध्ये पाठवला जातो. तेथून तो लिफाफा ती व्यक्ती ज्या ठिकाणी प्रत्यक्ष कार्यरत आहे त्या ठिकाणी पाठवला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीच्या नावाने आलेला लिफाफा ती व्यक्ती फोडून त्यातील मतपत्रिका वाचते. आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोर टिक मार्क करते आणि उर्वरित नावांवर काट मारते. पुन्हा तो लिफाफा तसाच सीलबंद करून त्या त्या मतदान केंद्रांवर पाठवला जातो. ज्यावेळी त्या मतदारसंघात मतदान होत असते त्याच कालावधीमध्ये हा लिफाफा निवडणूक अधिकाऱ्यांकडे जातो. व प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी हा लिफाफा उघडून त्याचे मत ग्राह्य धरले जाते. यालाच पोस्टल मतदान असेही म्हणतात.

ही सगळी प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची आणि किचकट आहे. त्यातच ती निर्धारित वेळेत करावी लागते अन्यथा मत बाद होते. दिल्लीसारख्या मोठ्या शहरात कार्यरत असणाऱ्या सैनिका पासून ते सियाचीन सारख्या दुर्गम आणि प्रतिकूल भागात काम करणाऱ्या जवानांपर्यंत या मतपत्रिका वेळेत पोहोचतात. सर्वांना मतदान करण्याची संधी मिळते.
मुळात ही सर्व उठाठेव का करायची? देशाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असणाऱ्या सैनिकांना मतदान करण्याची आवश्यकता काय ? असेही काही प्रश्नही विचारले जातात. याचे उत्तर सुभेदार मेजर (निवृत्त) शशिकांत साळोखे अतिशय चपखलपणे देतात. ते सांगतात, युद्धाच्या प्रसंगात समोर मृत्यू दिसत असताना देखील सैनिक आपली जागा सोडत नाही. एक पाऊल मागे येत नाही. अशा कर्तव्यकठोर मनाची व्यक्ती मतदानाचे आपले कर्तव्य पार पडायला कशी विसरेल. सैन्यात काम करणारी व्यक्ती आपल्या अधिकारापेक्षा कर्तव्याप्रति अधिक बांधील असते. त्याच भावनेतून सैनिक मतदान करतात.

प्रतिनिधी
(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)

अन्य लेख

संबंधित लेख