मुंबई : श्रीमान उध्दव ठाकरे आणि संजय राऊतांना आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. त्यांनी लालबागच्या राजाची माफी मागावी, असे प्रत्युत्तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिले आहे. संजय राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका केली होती. यावरून आता आशिष शेलारांनी त्यांचा समाचार घेतला आहे.
आशिष शेलार म्हणाले की, “संजय राऊतांनी स्वत:च्या अज्ञानाचा सार्वजनिक कार्यक्रम बंद करायला हवा. लालगबागच्या दर्शनाला आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर टीका करताना त्यांची जीभ खूपच वळवळली, हे महाराष्ट्र बघतो आहे. अमित शाह गृहमंत्री नव्हते तेव्हापासून मोठ्या भक्तीभावाने मुंबईत येऊन लालबागच्या राजाचे दर्शनाला येत होतेत आणि सातत्याने येत आहे.”
ते पुढे म्हणाले कि, “उध्दव ठाकरे आणि संजय राऊत तुम्हाला आमच्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. आधी तुम्ही समस्त गणेशभक्त आणि लालबागच्या राजाची माफी मागा. जेव्हा उध्दव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवावर बंदी आणली होती. लालबागच्या राजाची ऐतिहासिक परंपरा खंडित केली. जेव्हा गणेशोत्सवाबाबत न्यायालयीन लढा लढायची वेळ आली तेव्हासुध्दा तुम्ही पाठ दाखवलीत. आम्ही ही लढाई न्यायालयात लढलो आणि १०० वर्षांहून अधिक मोठी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा अखंड ठेवण्यासाठी संघर्ष केला. लालबागच्या राजाचे दर्शन घेणाऱ्या आमच्या भाविकांना आणि गणेशोत्सव मंडळाला टाळं लावण्याचा कुहेतू उबाठा गटाचा होता. यावरून असलेला महाराष्ट्रातील जनतेचा राग अजूनही गेला नाही.”
“कोणाच्या डोक्यात काय चाललंय आणि कोणाच्या घरात काय चाललंय यात घुसण्याची सवय तुमची आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय चाललंय हे बघण्याची वृत्ती देवेंद्रजींनी नाही,” अशी खोचक टीका त्यांनी संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना केली.