Saturday, September 7, 2024

राममंदिर निर्माण: पुण्याच्या महिला अभियंत्याच्या संस्मरणीय आठवणी

Share

अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्यात काम करण्याची संधी पुण्यातील अश्विनी कविश्वर यांना मिळाली. या कार्यातील त्यांचे अनुभव खूप बोलके आहेत. या मंदिर निर्मितीमध्ये जेवढा व्यापक विचार होत होता, तेवढाच प्रत्येक बारकाव्याचाही विचार अगत्याने होत होता. अशा काही प्रेरणादायी अनुभवांची ही मालिका.

सुमारे ३२ वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करून मी डिझाईन इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी आणि तांत्रिक व प्रकल्प सल्लागार ह्या क्षेत्रामधील वाटचालीस सुरुवात केली. गेली २७ वर्षे देशातील अग्रणी कन्सल्टिंग कंपनी अर्थात टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स लिमिटेडमध्ये विविध पदांवर कार्यरत आहे. आतापर्यंत विविध प्रकारच्या प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाली. सल्लागार म्हणून काम करतानाची क्षेत्रं बदलत गेली, परंतु त्यात मुख्यत्वे करून देशातील विविध राज्यांमधल्या पायाभूत सुविधा निर्माण प्रकल्पांवर म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अशा प्रकारच्या प्रकल्पांवर काम केले. अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पेलण्याची संधी मिळाली.

टाटा ग्रुपने १५० वर्ष जपलेली ‘उत्तमता’ आणि ‘नैतिकता’ एक वेगळाच अनुभव दरवेळी देऊन जाते आणि पुढील प्रकल्पांकरिता हा अनुभव अधिक व्यापक दृष्टीही देऊन जातो. पायाभूत सुविधा प्रकल्प अर्थात इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे जेवढे इंजिनिअरिंग दृष्ट्या आव्हानात्मक असतात तितकेच ते समाजमनाचे विविध पैलू दर्शवणारे असतात. ह्या सर्व प्रकल्पांचा अंतिम उपभोक्ता हा समाज असतो आणि म्हणूनच मी जेव्हा इतक्या वर्षानंतर माझ्या कार्यक्षेत्राकडे बघते तेव्हा तांत्रिक आणि व्यावसायिकते पलिकडे जाऊन असं वाटतं की, प्रकल्प निर्माण अभियांत्रिकी हा एक नवनिर्मितीचा अखंड प्रवास आहे. ज्यात समाज रचनेचे आणि मानवी आशा-आकांक्षांचे पैलू आहेत, नवनिर्मितीची उत्सुकता आहे, हाती घेतलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण करण्याचा ध्यास आहे, निर्मितीच्या कळा आहेत आणि त्याच बरोबर आपल्या आसपास पसरलेल्या या अफाट अशा कॅनव्हास वर आपण काहीतरी रेखाटू शकतो याचे समाधानही नक्कीच आहे. निसर्गाच्या हातात हात घालून आणि आवश्यकता असेल तिथे त्याच्यावर मात करून योजना आखण्याचे धैर्य आहे. नावीन्याची ओढ तर आहेच परंतु तितकेच आपल्या भूमातेशी नाते बांधून ठेवण्याची प्रक्रियाही यात आहे.

माझ्यासाठी ही आनंदयात्रा
कधी कधी वाटते की निर्मितीतील आनंद मोठा का प्रकल्प सुपूर्त करण्यातला आनंद मोठा ? का ह्या दोन्ही मधल्या प्रवासाचाच आनंद मोठा ? असा हा अखंड चालू असलेला नवनिर्मितीचा प्रवास… तो २०२० साली मात्र एका वेगळ्याच टप्प्यावर येऊन पोचला. आतापर्यंतच्या प्रकल्पातल्या अनुभवांपेक्षा अतिशय वेगळे आणि आयुष्यभर लक्षात राहतील किंबहुना आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतील. असे अनेक अलौकिक अनुभव श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यात मिळाले. माझे व्यक्तीगत पातळीवरचे अनुभव सगळ्यांना आवर्जून सांगावेत आणि माझ्या ह्या आनंदयात्रेत सगळ्यांना सामावून घावे म्हणून हा लेखनाचा प्रपंच !!

हे मंदिर पुढील किमान एक हजार वर्षे टिकेल असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बांधकामाचे सर्व निकष या उद्दिष्टानुसार पडताळून पाहण्यात आले आहेत. ह्या प्रकल्पाशी श्री रामजन्म भूमी तीर्थक्षेत्र न्यासच्या वतीने अनेक संत महंत, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तर आहेतच आणि त्याच बरोबरीने राजकीय पक्ष, सरकारी यंत्रणा, देश पातळीवर काम करणारे अनेक नेते, कार्यकर्ते आणि ह्या विषयाशी आस्था असलेल्या संस्था प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निगडित आहेत. या भव्य श्री राममंदिर निर्माणाबरोबरच राष्ट्रमंदिर निर्माण कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली ह्याचे समाधान, अभिमान आहे आणि त्याच बरोबर जबाबदारीची जाणीव कायम ठेऊन हे काम अविरतपणे चालू आहे.

व्यक्तिगतरित्या माझ्या आयुष्यात या निर्माण कार्यात सहभागी होता येणे, हे खरोखरच परमोच्च शिखर आहे. अनेक समाजाभिमुख प्रकल्प केल्यानंतर देशसेवेची आणि पारमार्थिक सेवेची मिळालेली ही सर्वोत्तम संधी अशीच भावना कायम मनात आहे.

मंदिर आणि परिसर निर्माण दोन्हीचा आराखडा तयार करताना अनेक बाबींचा विचार करण्यात आला. अगदी छोट्यातले छोटे बारकावे पाहून त्यावरही अनेक वेळा चर्चा आणि अनेकांची मते विचारात घेऊन निर्णय घेतले गेले.

हे राष्ट्रमंदिर व्हावे…
श्रीराम मंदिर हे राष्ट्रमंदिर व्हावे आणि जगातील सर्व हिंदूंचे चेतना केंद्र किंवा आध्यात्मिक केंद्र होण्याच्या दृष्टीने वेदपाठशाळा, गोशाळा, यज्ञ शाळा ,सीता मंदिर, लक्ष्मण मंदिर, पुरातत्व संग्रहालय इत्यादी कामेही हाती घेण्यात आली आहेत. सर्व भाविकांना दर्शनाबरोबरच आवश्यक असलेल्या अन्य सर्व सुविधा उपलब्ध करण्याची व्यवस्थाही होत आहे. मंदिर परिसरात साधारणपणे रोज सव्वा लाख भक्तगण दर्शनाला येतील ह्या अंदाजानुसार सुमारे अकरा लाख लिटर पाण्याची गरज पाहता पाण्याचा पुनर्वापर करण्याचे नियोजन आहे. त्याच बरोबर कचऱ्यावरही प्रक्रिया करून खत ह्या स्वरूपात पुनर्वापराची योजना आहे. जास्तीत जास्त हरित उर्जेचा वापर व्हावा ह्या करता मंदिर परिसरात सौरउर्जेचाही उपयोग करण्यात आला आहे.

येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा विचार
ह्या सर्व योजनेकरता अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे किती दर्शनार्थी रोज येतील हे ठरवणे. चैत्र महिन्यातील रामाचे नवरात्र, रामनवमी, दिवाळी आणि कोजागरी पौर्णिमा हे विशेष गर्दीचे दिवस. विशेष महत्वाच्या दिवशी येणारे, सुट्ट्यांच्या दिवशी येणारे, उर्वरित दिवशी येणारे दर्शनार्थी याचे अंदाज बांधणे हे त्यात अंतर्भूत होते. असाच महत्त्वाचा विचारात घ्यावा लागलेला विषय म्हणजे अयोध्येमधील वर्षभरातील हवामानातील फरक, जितका उन्हाळा तीव्र तितकीच थंडी पण बोचरी, शरयू नदीच्याच्या काठावर असल्यामुळे वातावरण बरेचदा दमट, अर्थातच ह्या सगळ्याचा विचार व्हेंटिलेशन सिस्टिम, इमारतींच्या बांधकामाचे साहित्य आणि Construction finishes हे ठरवताना केला गेला. देशभरातील अक्षरशः कान्याकोपऱ्यातून विविध जाती पंथांचे येणारे भक्तजन आणि तितकेच दर्शनास उत्सुक असलेले परदेशी नागरिक. सर्व सेवा सुविधा, योजनांमध्ये ह्या विविधतेचाही विचार करणे आवश्यक होते.

याची विशेष काळजी घ्या…
एक अशीच आठवणीत राहिलेली चर्चा म्हणजे सर्व दर्शनार्थीना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे जवळचे सामान ठेवणे, पादत्राणे काढणे आणि तपासणी यंत्रणेकडून तपासणी करणे, त्याचबरोबर थोडी विश्रांती घेण्यासाठी लागणाऱ्या सोयी आणि स्वच्छतागृहे वगैरे असलेली सुविधा केंद्रे ह्या बिल्डिंगचा नकाशा वास्तुविशारद दाखवत होते. त्यात मोबाईल लॉकर, पादत्राणे लॉकर ही व्यवस्था कशी असेल, टिकेटिंग नंबर्स वगैरे कसे केले जाईल हा विषय चालू होता. विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे महासचिव मा. चंपत रायजी हे ऐकत असताना म्हणाले; हे सगळं ठीक आहे. ह्या सगळ्यामुळे शहरातील आणि परदेशातील दर्शनार्थींची नक्कीच सोय होईल, हे सगळं आवश्यकच आहे, परंतु आपल्या आसपासच्या खेडेगावातल्या दर्शनार्थीं करता, ज्यांच्या पायात पादत्राणे नाहीत आणि हातात मोबाईलही नाही, परंतु डोक्यावर फडक्यात बांधून आणलेली भाकरी आहे त्यांच्या करता काय विचार केला आहे ? हे सगळे भक्तगण वर्षानुवर्ष इथे दर्शनासाठी येतात. आपल्या ह्या सगळ्या नवीन सोयी सुविधांमुळे त्यांची कुठली गैरसोय होत नाहीये नां ह्याची विशेष काळजी घ्या, तो भक्त पण मला तेवढाच महत्त्वाचा आहे.

किती आत्मीयता असावी आणि किती संवेदनशील विचार असावेत ह्या संपूर्ण कार्याविषयी… !!

या प्रकल्पात काम करण्याचे निश्चित झाल्यानंतर माझ्या परिचितांकडून, मित्रमंडळींकडून, नातेवाईकांकडून, सहकाऱ्यांकडून काय काय प्रतिक्रिया आल्या, ते सारे संस्मरणीय अनुभव सांगते पुढील भागात.

अश्विनी कविश्वर
(लेखिका स्थापत्य अभियंता असून त्या वरिष्ठ उप महाव्यवस्थापक या पदावर काम करतात.)

अन्य लेख

संबंधित लेख