Thursday, November 21, 2024

भगवान बिरसा मुंडा आणि अराजकवादी शक्ती. 

Share

भारतात जन्मलेले असंख्य महापुरुष भारताच्या एकतेचे आधार बनले आहेत. परंतु त्यांच्या चरित्राची तोडफोड करून त्यांना अराजक वादी दाखवायचे आणि त्यांच्या नावाने समाजात फूट पाडायची हा एक सतत चालत आलेला खेळ आहे. या महापुरुषांच्या साखळीतील एक महापुरुष म्हणजे धरती का आबा, भगवान  बिरसा मुंडा. 

१८२५ साली छोटा नागपूर क्षेत्रात बिरसा या बालकाचा जन्म झाला. जर्मन मिशनच्या शाळेत प्रवेश घेताना मिशनऱ्यांनी त्यांचे धर्मांतर करून त्यांचे नाव डेव्हिड ठेवले. ते शाळेत शिकत होते तो काळ इंग्रज सरकारविरुद्ध दरबारी लढाईचा काळ होता. इंग्रजांनी जे सावकार आणि जमीनदार आदिवासी क्षेत्रात घुसवले होते त्यांच्यामुळे आदिवासी नागवला जात होता. त्यामुळे संपूर्ण आदिवासी समाज इंग्रज सरकार विरुद्ध पेटून उठला. त्यांचा संघर्ष काही काळ यशस्वी झाला . परंतु इंग्रज सरकारच्या संघटित बळापुढे त्यांचा फार काळ टिकाव राहिला नाही. दरबारी लढाईतील काही पुढारी बिरसा ज्या शाळेत शिकत होता त्या शाळेच्या पाद्रीला भेटायला आले. आदिवासी समाजाला पाद्रीने मदत करावी अशी त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी भाषा समजावी म्हणून त्यांनी बिरसाला सोबत घेतले. पाद्रीने त्यांची बाजू. पूर्ण ऐकून न घेता त्यांच्यावर आगपाखड सुरू केली. मुंडा समाज चोर आहे असे विधान त्याने केले.. हे ऐकून बिरसा संतापला. खरे चोर तर तुम्हीच आहात. हा देश आमचा आहे, तुम्ही लुटारू आहात असे पाद्रीला सुनावून बिरसा तेथून बाहेर पडला. त्याने पांडे नावाच्या एका बुनकराकडे नोकरी सुरू केली आणि नोकरी करता करता आयुर्वेद आणि रामायणाचा अभ्यास सुरू केला.

पुरेसा अभ्यास झाल्यावर बिरसा त्यांच्या गावी परतले आणि त्यांनी आपल्या मुंडा बांधवांचे जागरण सुरू केले. ते जी औषधे रुग्णांना देत त्यामुळे रुग्ण लवकर बरे होत. त्यांचे परिसरात चांगले नाव झाले. त्यांनी केलेला रामायणाचा उपदेश लोकांना आवडू लागला. जी कुटुंबे धर्मांतर करून ख्रिश्चन झाली होती त्यांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करून पुन्हा पारंपरिक आदिवासी धर्माचा स्वीकार करायला सुरवात केली . सींगबोंगा म्हणजे सूर्य देवतेची उपासना ते पुन्हा करू लागले. यामुळे चिडलेल्या इंग्रजांनी बिरसांना अटक करून रांची येथील तुरुंगात नेऊन ठेवले. तिथे गेल्यावर इंग्रजांचे खरे स्वरूप बिरसांना कळून चुकले. पाद्री टोपीवाले आणि सैनिक टोपीवाले एकमेकांचे मित्र आहेत हे समजल्यामुळे टोपी टोपी एक हैं अशी घोषणा त्यांनी केली. त्यांनी तुरुंगात चांगले वर्तन ठेवून स्वतःची सुटका करून घेतली आणि ते गावी परत आले. 

त्यांनी चुटीया या मुंडा समाजाच्या इतिहासाशी संबंधित गावातून झऱ्याचे पाणी आणले,जगन्नाथ पुरीहून चंदन आणले, तुळशीचे रोप आणले . बिरसायत नावाचा नवा धार्मिक पंथ त्यांनी सुरू केला. या तीन वस्तू बिरसायत मधील पवित्र वस्तू ठरल्या. 

बिरसायत मध्ये सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी नऊ नियम त्यांनी बनवले. खोटे बोलायचे नाही, व्यसन करायचे नाही असे नियम त्यामध्ये होते. भक्त त्यांना धरती का आबा म्हणू लागले. त्यांनी सर्व भक्तांना पंथाच्या रक्षणासाठी आपले धनुष्यबाण वापरण्याचा उपदेश केला. हळू हळू सशत्र सेना तयार झाली आणि बिरसांनी उलगुलान नावाने इंग्रजांविरुद्ध सशस्त्र संघर्ष सुरू केला. अपना दिशुं अपना राज अशी त्यांची घोषणा होती. १८९७ ते १९०० अशी तीन वर्षे त्यांनी छोटा नागपूर भागातून इंग्रजांना पूर्णपणे हद्दपार केले. 

शेवटी इंग्रजांनी त्यांना पकडले आणि रांची तुरुंगात विषबाधा घडवून त्यांना मारले. त्यांच्या मृत्यूने इंग्रज विरुद्ध मुंडा भारतीय हा संघर्ष अधिकच पेटला आणि तो भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत धगधगत राहिला.

भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनाबद्दल संपूर्ण देशातील आदिवासी जनतेला आदर आणि कुतूहल आहे. याचाच फायदा घेऊन विभाजन वादी शक्तींनी सुरू केलेल्या आंदोलनात त्यांच्या नावाचा वापर सुरू केला. त्यांचे आंदोलन धर्माला धरून होते. त्यांच्या बिरसायत मध्ये धर्माविरुद्ध काहीच नव्हते. परंतु त्यांच्या नावाचा वापर करणाऱ्या बिरसा ब्रिगेडने आदिवासी हिंदू नाहीत हे सांगण्यासाठी त्यांच्या चरित्रात देश विरोधी गोष्टी घुसडल्या. त्यांचे आंदोलन इंग्रजांविरुद्ध नसून सावकारांविरुद्ध होते असा प्रचार सुरू केला. १९ व्या शतकातील बिरसा आणि लंकेचा राजा रावण यांच्यामध्ये काय दुवा असू शकतो? बिरसांच्या नावाने सुरू असलेल्या संघटनांनी रावण दहन हे आदिवासी विरोधी आहे असा अपप्रचार सुरू केला. सरकारी अधिकाऱ्यांना त्याबद्दल निवेदने दिली गेली. भगवान बिरसा यांनी जगन्नाथपुरीचे चंदन पवित्र मानले आहे. जगन्नाथ आणि विठ्ठल ही एकाच विष्णूची रूपे आहेत. बिरसा ब्रिगेड ने गावांत चालणाऱ्या विठोबाच्या भजनी मंडळांना विरोध सुरू केला. 

भजनी मंडळे हा गावातील आदिवासी समाज आणि अन्य समाजातील प्रेमाचा दुवा आहे, तो कापण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. असे करण्यामागे उद्देश काय आहे? आदिवासी गावातील भक्त पंढरपूरला यात्रेला जातात हा शेकडो वर्षांचा पायंडा आहे. क्रांतीवीर राघोजी भांगरे पंढरपूरला जात असत . पांडुरंगाची भक्ती हा समाजाला जोडणारा दुवा आहे, तो तोडणे हाच या विरोधामागील उद्देश आहे.  भारतीय संविधान सर्व भारतीयांमध्ये बंधुता असल्याची हमी देते, सर्वांना समान वागणूक आणि उपासनेच्या स्वातंत्र्याची हमी देते. परंतु ब्रिगेड या स्वातंत्र्य आणि बंधुतेवर घाला घालून संविधानाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करते. रावणदहन, वारकरी सांप्रदायिक भजनी मंडळे या मुद्द्यांवरून ब्रिगेड जे  जे वाद निर्माण करते त्यामुळे गावांत दोन गट पडतात, भांडणे उत्पन्न होतात आणि अराजकाची परिस्थिती निर्माण होते. यामध्ये काही ठिकाणी असे देखील पाहण्यात आले की शहरात राष्ट्रीय विचारांच्या संस्थेत काम करणारे शिक्षक शाळेत रावण दहन साजरे करतात आणि आदिवासी गावात जाऊन रावण दहनाला विरोध करतात. आपल्या नोकरीच्या ठिकाणी वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात सहभागी होतात आणि गावात भजनाला विरोध करतात. पेसा कायद्याने आदिवासी गावांना अनेक अधिकार दिले आहेत. परंतु अराजक पसरविणारे नेते त्यांना असे सांगतात की सरकारी अधिकाऱ्याला तुमच्या गावात प्रवेश द्यायचा की नाही हा तुमचा अधिकार आहे. हे खोटे आहे आणि आदिवासी लोकांची दिशाभूल करणारे आहे. यामुळे आदिवासींच्या विकासात बाधा उत्पन्न होते आणि अनागोंदी निर्माण होते. 

संविधानाने सर्वांना आपली उपासना करण्याचा अधिकार दिला आहे परंतु इतरांना सुद्धा तोच अधिकार दिला आहे. इतरांचा तो अधिकार हिरावून घेणे हा अराजकाचाच प्रकार आहे. जेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा रावण दहनाला विरोध खूप प्रमाणात झाला.  महायुतीचे सरकार येताच हा विरोध कमी झालेला दिसला. यावरून अशा अराजक आणि दुहीला कोण खतपाणी घालत असेल याचा अंदाज आपल्याला बांधता येतो. 

ReplyForwardAdd reaction

अन्य लेख

संबंधित लेख