मुंबई : “केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत आहे. याच अनुषंगाने महिलांना सबलीकरणासाठी नवीन योजना राबवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारी (9 डिसेंबर) त्यांच्या हरियाणा दौर्यादरम्यान ‘विमा सखी योजना’ (Bima Sakhi Yojana) लाँच करतील. या योजनेद्वारे सरकारचे उद्दिष्ट महिलांचे सबलीकरण करणे आणि आर्थिक स्वावलंबी बनविणे हा उद्देश आहे.
पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात सांगितले आहे की ‘विमा सखी योजना’ ही भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC) या भारत सरकारच्या मालकीच्या विमा कंपनीकडून ही योजना राबवण्यात येत आहे. ही योजना पानिपतमध्ये लाँच केली जाईल. ‘विमा सखी योजना’’ अंतर्गत 10वी पास आणि 18 ते 70 वर्षे वयोगटातील महिलांना सबलीकरणाचा फायदा मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाणार आहे, ज्यामध्ये स्टायपेंडही मिळेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्या एलआयसीच्या एजंट म्हणून काम करू शकतील. पदवीधर महिलांना डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून नोकरीची संधी उपलब्ध होईल.
स्टायपेंडच्या बाबतीत, पहिल्या वर्षी महिलांना प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळतील, दुसऱ्या वर्षी हे 6000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 5000 रुपये असेल. आपले टार्गेट पूर्ण केल्यानंतर, त्यांना कमिशनही मिळेल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 35 हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी मिळेल, त्यानंतरच्या टप्प्यात आणखी 50 हजार महिलांना योजनेचा लाभ दिला जाईल.