Monday, June 24, 2024

जैवविविधतेसाठी सर्वंकष प्रयत्न करू या

Share

वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती॥
संत तुकाराम महाराजांनी वनांचं महत्त्व आपल्या या अभंगातून अधोरेखित केलंय. मानव आणि सृष्टीचा परस्पर संबंध आणि सहजीवनाचं महत्त्वच त्यांनी यानिमित्तानं सांगितलं. सध्या जागतिक तापमानवाढीचं-हवामानबदलाचं आव्हान आपल्यासमोर उभं आहे. हवामानाच्या लहरीपणाचा फटका वादळ, पूर, दुष्काळाच्या निमित्ताने विविध देशांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या जैववविधता दिनानिमित्त केलेला उहापोह…

‘पर्यावरण संवर्धन’, ‘जैवविविधता’ (बायोडायव्हर्सिटी) हे शब्द सध्या खूपच परवलीचे झाले आहेत. ‘जैवविविधता’ (बायोडायव्हर्सिटी) या शब्दाचा प्रथम प्रयोग 1968 मध्ये रेमंड एफ. दासमान या वन्यजीव अभ्यासकाने केला. त्यांनी लिहिलेल्या ‘अ डिफरंट काइंड ऑफ कंट्री’ या पुस्तकात हा शब्द विविधता टिकवून ठेवण्यासंदर्भात वापरला. त्यानंतर 1980 मध्ये विज्ञान-पर्यावरण कायद्याचा मसुदा बनवताना हा शब्द चांगलाच रूढ झाला होता. थॉमस लव्हजॉय यानी ‘कॉन्झर्व्हेशन बायॉलॉजी’ या पुस्तकात लिहून तो समोर आणला. यापूर्वी ‘नॅचरल डायव्हर्सिटी-नैसर्गिक विविधता’ अशी संज्ञा 1975 पासून वापरात होती. पण 1980 मध्ये रॉबर्ट ई. जेनिन्स यांनी अमेरिकेत ‘जैविकविविधता’ असा शब्द रूढ करण्याचा प्रयत्न केला. सध्या अमेरिकेत ‘नॅचरल हेरिटेज’ असा शब्द वापरला जातो. या शब्दाची व्याप्ती जैवविधतेहून अधिक आहे. यामध्ये भूगर्भशास्त्र आणि भूप्रदेशाचा समावेश केला आहे.

जगातल्या संपन्न जैवविविधता असलेल्या मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. राजस्थानमधील वाळवंटी प्रदेश, हिमालयाच्या सान्निध्यात असलेल्या सूचिपर्णी वृक्षांची जंगले, तसेच नेपाळच्या सीमेजवळील तराईचे प्रदेश आणि ईशान्येकडील ब्रह्मदेशापर्यंत पसरलेली घनदाट अरण्ये, सागराजवळील खारफुटीची राने आणि अंदमान-निकोबार, लक्षद्विपसारख्या बेटांमुळे भारतात विपुल जैवसंपदा आढळते. पश्चिमघाट किंवा सह्याद्रीच्या डोंगररांगा यापैकीच एक. सागराचं सान्निध्य, कमी-जास्त पर्जन्यमान, मृदाप्रकार, भूशास्त्रीय स्तर यांचा वनांवर झालेला परिणाम व त्यामुळे निर्माण झालेली विविधता याचा एकत्रित परिणाम म्हणून येथे अधिवासांची विविधता आहे. घाटमाथ्यांवरील जांभ्याची पठारे किंवा सडे ही अशीच एक नाजूक परिसंस्था आहे. ‘सिरोपेजीया’सारख्या दुर्मिळ वनस्पती प्रजाती, काही विशिष्ट बेडकांच्या प्रजोत्पादनाची ठिकाणे अशा पठारांवर आढळतात. दुर्दैवाने अशी पठारे लोह, बॉक्साईटसारख्या खनिजसंपत्तीने विपुल असल्याने खाणींची शिकार होत आहेत. आपल्या देशात पिकांच्या, पाळीव प्राण्यांच्या हजारो जाती आढळतात. त्या काही अचानक किंवा अपोआप तयार झाल्या नाहीत. वर्षानुवर्षे स्थानिक जमातींनी किंवा शेतकर्‍यांनी स्थानिक हवामानाला अनुकूल जाती निवडून त्यांची प्रयत्नपूर्वक जोपासना केली. म्हणूनच हा जैवविविधता फुलली. सध्या केवळ उत्पादनवाढ हे एकच ध्येय समोर ठेवल्याने इतर घटकांकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे आर्थिक उत्पादन देणार्‍या वाणांच्या भरमसाट प्रचाराच्या नादात स्थानिक वाण हळूहळू कालबाह्य होत चालले आहेत. विशेषतः रोगप्रतिकारक शक्तीसाठी अधिक उत्पन्न देणार्‍या वाणांचा संकर किंवा जनुकीय संस्करण जुने पारंपरिक वाण वापरून करतात. त्यामुळे असे स्थानिक वाण गमविणे म्हणजे कुर्‍हाडीवर स्वतःहून पाय मारून घेण्यासारखे आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बीजमाता म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘पद्मश्री’ने सन्मानित राहीबाई पोपरे यांनी स्थानिक वाण जपण्यासाठी ‘बीजबँक’ केली. हे काम जैवविविधतेच्या दृष्टीनं फारच महत्त्वाचं होतं.

भारतातील जैवविविधता पश्चिम घाट, ईशान्य भारतातील वने आणि केरळमधील ‘सायलेंट व्हॅली’मध्ये टिकून आहे. पश्चिम घाटाला विशेष महत्त्व असून अनेक जातींचे प्राणी, पक्षी व असंख्य प्रकारच्या वनस्पती तेथे आढळतात. भारतात उच्च दर्जाच्या सुमारे 27 टक्के वनस्पती (4,000 – 15,000 जाती) आढळतात. त्यांपैकी एक हजार 800 जातींच्या वनस्पती पश्चिम घाटात पाहायला मिळतात. सुमारे पाच हजार फुलझाडांच्या जाती पश्चिम घाट परिसरात असून त्यांपैकी सुमारे 1,600 फुलझाडांचे प्रकार जगात कोठेही आढळत नाहीत. मात्र, लोकसंख्यावाढ, जंगलतोड, प्रदूषण, जागतिक हवामान बदलामुळे भारतातील जैवविविधतेचे प्रमाण घटत आहे. परिसंस्थेतील बाह्यजातींचे उच्चाटन करणे, कीटकनाशकांच्या वापरात घट करणे, जैवविविधता राखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदे करणे, जनुक पेढी तयार करणे इत्यादी उपायांमुळे जैवविविधता राखता येऊ शकते. संपन्न जैवविविधता असलेल्या देशात भारताचा समावेश असणे अभिमानास्पद आहे. पण हे जैववैविध्य टिकविण्यासाठी आपल्याला कसून प्रयत्न करायला हवेत. अनेक प्रकारची झाडे-झुडपे, वेलींनी समृद्ध असे जंगल टिकून राहिले, तर फळमाशा, मधमाशा, फुलपाखरे, पक्षी, प्राणी तर वाढतीलच; पण त्यामुळे परागीभवन होऊन आपल्या नारळी, पोफळी, आंबा, काजू यांसारख्या बागाही टिकून राहतील. टेकड्या, डोंगर यावर हिरवे आच्छादन असल्यास पाण्याचे झरे, डोह, विहिरी लवकर आटत नाहीत.

आपल्याकडे देवराया आहेत. त्याला ‘पवित्र उपवन’ म्हणूनही ओळखले जाते. हे भारतीय संस्कृतीत पवित्र मानले जाणारे जंगलांचे पट्टे आहेत. ‘देवराई’ हा शब्द दोन शब्दांपासून आला आहे. ‘देव’ आणि ‘राय’ म्हणजे जमिनीचा तुकडा. देवराई म्हणजे देवाला अर्पण केलेली जमीन. हे पवित्र उपवन संपूर्ण भारतात पश्चिम घाटापासून हिमालयापर्यंत आढळतात आणि देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. ते विशेषत: मंदिरांजवळ स्थित आहेत आणि स्थानिक देवतांचे निवासस्थान मानले जातात. ते स्थानिक संस्कृतीत खोलवर रुजलेल्या पारंपरिक श्रद्धा आणि प्रथांशी देखील संबंधित आहेत. असा समृद्ध नैसर्गिक वारसा पिढ्यान् पिढ्या जतन केला गेला आहे. या प्रदेशातील जैवविविधतेच्या संवर्धनात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यांचं पावित्र्य देवराईत गेल्यावर अनुभवायला मिळते. वृक्षवेलींची गर्द दाटी, वैशिष्ट्यपूर्ण प्राणिपक्ष्यांची उपस्थिती, पाण्याचा स्रोत, देवदेवता, वीरगळ अशी काही वैशिष्ट्ये पाहावयास मिळतात.

परंतु, सध्या विविध कारणांमुळे, विकासाच्या रेट्यामुळे, होत असणार्‍या नैसर्गिक र्‍हासाच्या पार्श्वभूमीवर या देवरायांना धोका निर्माण झाला आहे. त्या-त्या प्रदेशांतील जैवविविधता तिथे दिसली तरी तिथे होत असलेला नाशसुद्धा पाहण्यात येतो. देवरायांभोवतीचा प्रदेश उघडाबोडका झाल्याने आतील प्राणी पक्ष्यांना ये-जा करण्यासाठी लागणारे हरितपट्टे (कॉरिडॉर्स) नाहीसे झाले आहेत. देवराईचे क्षेत्रही हळूहळू घटत चालले आहे. अशा वेळी त्या राखून त्यांना पुनरुज्जीवित करणं गरजेचं आहे. त्याचे शास्त्रीय महत्त्व व उपयुक्तता पटवून देऊन त्याचे जतन करणे स्थानिक लोकांमार्फत शक्य होईल. भूजल पुनर्भरण, वर्षभर वाहणारे झरे, अनेक रोगांवर औषध पुरविणार्‍या वनस्पती, शेतातील किडे, उंदीर यांवर नियंत्रण ठेवणारे साप व घुबड यांसारखे प्राणी, भात खाचरांसाठी लागणारा पालापाचोळा इत्यादी अनेक फायदे मानवाला या देवरायांमुळे होत असतात. तापमान नियंत्रणाचे अत्यंत महत्त्वाचे काम देवरायांमुळे शक्य होते. इतकी वर्षे जतन केलेला वारसा यापुढेही शास्त्रीय आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून जपावा, यांसाठी चर्चा व बैठका, शिबिरे भरविण्यात यावीत, रोपवाटिका तयार करण्यात याव्यात. जैवविविधता कायद्याद्वारे देवराई हे वारसा स्थळ (हेरिटेज साईट) म्हणून घोषित करावे. असे झाल्यास देवराईतील प्राणी, पक्षी, दुर्मीळ वनस्पती, औषधी वनस्पती आणि इतर घटक यांना अभय मिळेल. देवराईत उत्सवात मानवनिर्मित कचरा होऊ न देणे अथवा तो वेळच्या वेळी काढून टाकणे देवराईतील वनस्पतींच्या पुननिर्मितीसाठी गरजेचे आहे. अशा तर्‍हेच्या सोप्या पद्धती वापरून लोकसहभागातून देवराईचे पुनरुज्जीवन करता येऊ शकते. त्यामुळे देवराईचा होत असलेला र्‍हास थांबेल.

मात्र, भारतातील सर्व जीवसंपदा अशा देवराया, काही राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यातच फक्त सुरक्षित ठेवता येणार नाही. गेल्या 25 वर्षांत जगातील जैवविविधतेचे 15 टक्के नुकसान झाले आहे व अशा जाती नष्टप्राय होण्याच्या मार्गावर आहेत. पश्चिम घाटही त्याला अपवाद नाही. जाती नष्ट होण्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे जातींच्या नैसर्गिक अधिवासात झालेली घट. विशेषतः पश्चिम घाटात शहरीकरणामुळे जंगलाचे प्रमाण 50 टक्क्यांपेक्षा जास्त नष्ट झाले आहे. त्यामुळेच माणसे आणि वन्यप्राण्यांतील संघर्ष वाढला आहे. जुन्नरजवळ बिबट्या, भीमाशंकरजवळ रानडुकरे, सिंधदुर्गात हत्ती मनुष्यवस्तीत, बागायतीत धुडगूस घालत आहेत. त्यासाठी संरक्षित केंद्रांचं विकेंद्रीकरण आवश्यक आहे. देवराया, शेती, नद्यातील डोह, पाणवठे एवढेच नव्हे, तर पुण्यासारख्या अनेक शहरांत (टेकड्या, शैक्षणिक संस्थांचे परिसर) जीवसंपदा आहे आणि त्याचेही संरक्षणाची आवश्यकता आहे. लोकांपर्यंत चळवळ नेण्याच्या प्रयत्नांतून जीवसंपदेचे-जैवविविधतेचं रक्षण होणार आहे.

प्रतिनिधी
(महाराष्ट्र नॉलेज सेंटर)

अन्य लेख

संबंधित लेख