Saturday, March 14, 2026

ब्राझिलच्या प्राध्यापकाने ६ महिन्यांत आत्मसात केले संस्कृतचे ज्ञान; ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’चे यश!

Share

पुणे : संस्कृत भाषेतील बौद्ध ग्रंथ समजून घेण्याच्या ध्यासाने ब्राझिलमधील एका प्राध्यापकाला पुण्याच्या ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’पर्यंत पोहोचवले आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या ‘भाषाङ्कुरः’ (स्तर १) या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून या परदेशी अभ्यासकाने संस्कृत श्लोकांचे शुद्ध पठण आणि पदच्छेदासारखी कठीण कौशल्ये आत्मसात करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

संस्कृतमधील बौद्ध साहित्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी हे प्राध्यापक योग्य मार्गदर्शकाच्या शोधात होते. यादरम्यान त्यांचा संपर्क पुण्यातील ‘संस्कृत सेवा फाऊंडेशन’शी आला. त्यांनी संस्थेच्या ‘भाषाङ्कुरः’ या प्राथमिक स्तरावरील अभ्यासक्रमात प्रवेश घेतला. केवळ सहा महिन्यांत त्यांनी संस्कृत व्याकरणाची मूलभूत तत्त्वे, श्लोक म्हणण्याची पद्धत आणि शब्दांचे योग्य विभाजन करणे यात प्राविण्य मिळवले. विशेष म्हणजे, अभ्यासक्रमाच्या शेवटी घेण्यात आलेल्या कठीण बहुपर्यायी (MCQ) परीक्षेत यशस्वी झालेल्या ५ विद्यार्थ्यांपैकी ते एक आहेत.

या अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या तुकडीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ रविवार, १५ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला विशेष स्मृतीचिन्ह म्हणून ‘ताम्रपट’ देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे सहसंस्थापक डॉ. रोहन कुलकर्णी यांनी दिली.

परदेशी नागरिकही आता भारतीय ज्ञानपरंपरा आणि संस्कृत भाषेकडे मोठ्या आशेने पाहत आहेत, याचे हे एक उत्तम उदाहरण ठरले आहे. होणाऱ्या या सत्कार सोहळ्याबद्दल संस्कृत प्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

अन्य लेख

संबंधित लेख