Saturday, May 25, 2024

संस्कारक्षम मुलांपर्यंत रामकथा पोहोचवण्याचा प्रयत्न

Share

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र हा प्रत्येक भारतीय माणसाच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचाच विषय. बालकुमार आणि किशोरवयीन मुलांना रामाच्या गोष्टी सांगाव्यात या उद्देशातून ज्येष्ठ साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डाॅ. न. म. जोशी यांनी लिहिलेल्या ‘मुलांचे श्रीराम‘ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी रामनवमीच्या मुहूर्तावर करण्यात आले. स्नेहल प्रकाशनच्या वतीने रहाळकर राम मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात न. म. जोशी यांचे विद्यार्थी, प्राचार्य राम दशरथ आबणे यांना या पुस्तकाचे प्रकाशन करण्याचा बहुमान देण्यात आला. या पुस्तकाच्या निमित्ताने डाॅ. न. म. जोशी यांच्याशी साधलेला संवाद…

रामायण हा विषय निवडण्यामागे तुमची भूमिका काय आहे ?
डॉ. जोशी – मी मूळचा सातारा जिल्ह्यातील कोयनेपलिकडे असलेल्या गारवडे (ता. पाटण) या खेडेगावचा. हे गाव आमच्या घराण्याच्या पूर्वजांना गंगाबाई पेशवे यांच्याकडून चरितार्थासाठी इनाम मिळाले होते. आमच्या जोशी घराण्याचे एक लहानसे पण, सुंदर राममंदिर या गावामध्ये आहे. माझ्या बालपणी रामजन्म उत्सव थाटामाटात होत असे. पंचक्रोशीतील आबालवृद्ध गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत उत्सवात राममय होऊन सहभागी होत असत. आम्ही मुलेही या उत्सवामध्ये आनंदाने आणि भक्तिभावाने सहभाग घेत असू. त्यामुळे बालपणापासूनच मी रामाचा भक्त आहे.

‘मुलांचे श्रीराम’ या पुस्तकाचे वेगळेपण काय आहे ?
डॉ. जोशी – रामायण या विषयावर अनेक विद्वान, मान्यवर लेखकांनी लिहिले आहे. महर्षी वाल्मीकी यांच्या रामायण या महाकाव्यावर विविध भाषांत अनेक ग्रंथ निर्माण झाले. तुलसी रामायण हे तर जगप्रसिद्ध आहे. मराठीमध्ये ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेल्या ‘गीतरामायणा’ने तर इतिहासच घडविला. गेली सात दशके गीतरामायणाचे गारुड मराठी मनांवर अधिराज्य करून आहे. आता अयोध्येमध्ये राममंदिराची उभारणी झाल्यापासून संपूर्ण देशात चैतन्यमय वातावरण आहे. त्याचा लाभ घेण्यासाठी नव्हे, तर ही संधी मानून रामकथा अधिकाधिक लोकांपर्यंत आणि त्यातही खास करून संस्कारक्षम मुलांपर्यंत पोहोचावी, ती घराघरात आणि मनामनात असावी या भूमिकेतून मी ‘मुलांचे श्रीराम’ हे पुस्तक लिहिले. मी लिहिले असे म्हणण्यापेक्षा स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे यांनी मला ही रामकथा लिहिण्यासाठी उद्युक्त केले.

या पुस्तकाच्या लेखनासाठी अभ्यास आणि संशोधन कशा स्वरूपाचे केले ?
डॉ. जोशी – ही रामकथा लिहिताना प्रामुख्याने भारताचार्य चिं. वि. वैद्य यांच्या ‘रामायण कथासार’ या पुस्तकाचा आधार घेतला आहे. मुलांवर संस्कार करण्यासाठी सुलभ भाषेत ही रामकथा सांगून आबालवृद्धांसाठी वाचनीय करण्याचा प्रयत्न केला आहे. हे लेखन करताना मूळ रामायणातील काही पारिभाषिक शब्द मात्र तसेच ठेवले आहेत. त्याचा संदर्भ वाचन करताना सहज लागेल.

पुस्तकांच्या अंतरंगाबद्दल काय सांगाल ?
डॉ. जोशी – या छोटेखानी पुस्तकामध्ये दहा प्रकरणे असून त्यांना गीतरामयणाच्या गीतांची शीर्षके दिली आहेत. पुस्तक वाचताना गदिमांची काव्यपंक्ती असलेल्या लोकप्रिय शीर्षकाचा उपयोग करून पुस्तक हाती घेतलेल्या लोकांना वाचनासाठी प्रवृत्त करावे एवढाच माफक उद्देश ही शीर्षके देण्यामागे आहे. रामायणातील एखादा प्रसंग प्रामुख्याने चितारून त्याच्या अवतीभवती मजकूर सलगपणे साधला आहे.

आपला आगामी लेखन संकल्प काय आहे ?
डॉ. जोशी – भारतीय राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचा वेध घेणाऱ्या ‘द्रष्टे विद्रोही’ या पुस्तकाचे लेखन सुरू आहे. यापूर्वी मी आंबेडकर यांच्यावर पुस्तकाचे लेखन केले आहे. पण, ते केवळ माहितीपर या स्वरूपाचे आहे. डॉ. आंबेडकर यांनी विद्रोह तर केलाच. पण, या विद्रोहातही त्यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. या परिप्रेक्ष्यातून विश्लेषणात्मक पद्धतीने पुस्तकाची मांडणी केली आहे.

जयश्री कुलकर्णी
(लेखिका सांस्कृतिक विषयांच्या अभ्यासक आहेत.)

Table of contents

अन्य लेख

संबंधित लेख