Tuesday, September 17, 2024

पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

Share

मुंबई : भारतीय हवामान खात्याने पुणे (Pune) आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला असून आज जोराचा पाऊस होत आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, औषधे, आरोग्य सुविधा इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.

पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प, रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

संपूर्ण प्रशासनाने या काळात अलर्ट राहावे. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी सर्व सुविधांची उपलब्धता करून देणे यासाठी सर्व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. हवामान खात्याकडून येणाऱ्या विविध सूचनांची दखल घेऊन त्याची लोकांना त्वरित माहिती देण्यात यावी. सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

अन्य लेख

संबंधित लेख