महाराष्ट्र : राज्यात आज मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभेच्या जागांसह राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील (Maharashtra) धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाण्यातील (Thane) पाचपाखाडी येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघामधून एकनाथ शिंदेंचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यावेळी, श्रीकांत शिंदे यांचे आईने औक्षण केले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी सह कुटुंबाने पाचपाखाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी देखील संवाद साधला.
मतदान केल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “श्रीकांत शिंदे यांनी केलेले काम लोकांसमोर आहेत. मतदारसंघात झालेले विकासाचे काम, तेथील लोकांसाठी घेतलेले निर्णय यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने विजयी होऊन ते आपल्या विजयाची हॅट्रिक करतील.
“लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावं. आपलं एक मत इतिहास घडवणारं आहे, राष्ट्र घडवणारं आहे. त्यामुळे सर्वांनी मतदान करावं. देशभरातील नागरिक नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक आहेत. महाराष्ट्रातील प्रतिक्रिया तशाच आहेत. त्यामुळे नागरिकांनी ऊन होण्याआधी घराबाहेर पडून मतदान करावं,” असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदारांना केल.